অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने...

राष्ट्रीय ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने...

भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्त (12 ऑगस्ट) राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने वाचनसंस्कृती टिकावी आणि दिवसेंदिवस ती वृध्दींगत व्हावी यासाठी ग्रंथालयाचे असलेले महत्व आणि डॉ.रंगनाथन यांचे कार्य याविषयी घेतलेला आढावा...

ग्रंथालयशास्त्राचे पितामह म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या जयंतीनिमित्ताने राष्ट्रीय ग्रंथपाल दिन साजरा केला जातो. ग्रंथालयांचा विकासात डॉ.शियाली रामामृत रंगनाथन यांचा फार मोठा वाटा आहे. देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची कवाडे विनामूल्य खुली करण्याचा विचार सर्वप्रथम डॉ.रंगनाथन यांची रूजवला. नंतर तो जोपासण्यासाठीही आपले संपूर्ण आयुष्य झिजवले.

सुसंस्कृत समाजनिर्मितीसाठी शालेय शिक्षणासोबतच निरंतर शिक्षणदेखील किती आवश्यक असते, याचे महत्त्व डॉ.रंगनाथन यांनी सर्वप्रथम पटवून दिले. त्याकरिता ग्रंथालयांचा विकास, प्रसार होऊन देशातील सर्वसामान्यांना ज्ञानाची दारे विनामूल्य खुली करून द्यायला हवी, यासोबत वाचनसंस्कृती रुजविण्यासाठी जनतेला प्रवृत्त केले पाहिजे, हा विचार डॉ.रंगनाथन यांनीच देशात रुजविला.

शिक्षण मिळविणे सोपे आहे, पण शिक्षण देणे हे एक शास्त्र आहे, हे लक्षात आल्यानंतर त्या शास्त्राचा अभ्यास करण्याचे ठरवून अध्यापन शास्त्राची ‘एल. टी.’परीक्षा उत्तीर्ण केली आणि गणिताचे प्राध्यापक झाले. नंतर एक गणिततज्ज्ञाने आपली प्राध्यापकाची नोकरी सोडून ग्रंथपाल झाला. मद्रास विद्यापीठात ग्रंथपाल म्हणून काम पाहिले. ग्रंथालय शास्त्राच्या शिक्षणाकरिता मद्रास विद्यापीठाने आपल्या स्वखर्चाने त्यांना ‘स्कूल ऑफ लायब्ररीयनशिप’साठी लंडनला पाठविले होते. लंडन विद्यापीठाचा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून ते पुन्हा मायदेशी परतले. सार्वजनिक ग्रंथालयाची गरज ओळखून 30 जानेवारी 1928 रोजी त्यांनी 'मद्रास ग्रंथालय संघाची' स्थापना केली.

ग्रंथालय ही एक सामाजिक संस्था असून समाजाच्या हितासाठी ग्रंथालयाचे संवर्धन करणे आवश्यक आहे. ग्रंथालयाचे जतन करणारा ग्रंथपालही महत्वाचा घटक आहे. ज्याप्रमाणे वाचकांच्या गरजा वाढतात, बदलतात त्याचप्रमाणे ग्रंथपालनाच्या कक्षाही वाढत जाणे आवश्यक आहे. भारतीय ग्रंथालयात साधारणत: 1965 नंतर संगणकाने प्रवेश केला. सर्वप्रथम Indian National Sicentific Documentation Center (INSDOC) मुंबई, Bharat Automic Reserach Center (BARC), BHEL आदी ठिकाणी ग्रंथालयात संगणकाचा वापर झाला. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी जागेच्या प्रश्नाला पर्याय दिला खरा पण यामुळे ग्रंथालये नष्ट तर होणार नाहीत ना, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली. मात्र, जुने सोडायचे नाही पण नवेही स्वीकारायचे, या धोरणावर ग्रंथपाल संगणकाचे ज्ञान अवगत करू लागला. ई-रिसोर्सेसमध्ये ई-बुक, ई-जर्नल्स, सीडी, डीव्हीडी, मायक्रोचिप, मायक्रोफॉर्म, कार्ड रिडर आदींचा समावेश होतो. तर पारंपरिक साधनांमध्ये लिखिते, हस्तलिखिते, ग्रंथ, नियतकालिके, नकाशे, गॅजेट्‍स आदींचा समावेश होतो. पुस्तकांच्या विश्वात काम करणारा ग्रंथपाल (लायब्ररियन) हा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. या दोन्हीचा समन्यय राखण्‍यासाठी ग्रंथपालाला नेहमी प्रयत्नशील राहावे लागते.

सार्वजनिक वाचनालयांचा ग्रामीण महाराष्ट्रात मोठा विस्तार होत आहे. वाचक ग्रंथालयाभिमुख होण्यासाठी नवे प्रयोग हाती घेऊन त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची गरज आहे. ग्रंथामुळे स्वत:ची माहिती व ज्ञान यात भर पडून माणूस बहुश्रुत आणि समृद्ध होतो. ग्रंथालयांमुळे त्याचे व्यक्तिमत्त्व व जीवनमान बदलते आणि परिणामी आर्थिकदृष्ट्या अधिक समृद्ध जीवनाकडेही तो प्रगती करू शकतो, हे वाचकांच्या लक्षात आणून देण्याची मोठी गरज आहे. धावपळीच्या जीवनात इच्छा असूनही ग्रंथालयात जाणे शक्य होत नाही. यामुळे ऑनलाइन ग्रंथालयांचे महत्त्व वाढत आहे. त्यादृष्टीनेही नव ग्रंथपालांना ई -लायब्ररीची देखील नवी संधी उपलब्ध झाली आहे.

सध्या बाजारात विविध प्रकारचे लायब्ररी सॉफ्टवेअर्स उपलब्ध झाले आहे. त्यामुळे वाचकांसाठी ग्रंथालयात विविध प्रकारची ग्रंथ-संपदा उपलब्ध झाली आहे. अलिकडे ग्रंथालयांना व्यावसायिक स्वरुप प्राप्त झाले आहे. ज्याप्रमाणे शेतीची मशागत करायला शेतकरी लागतो. अगदी त्याचप्रमाणे बुद्धीरुपी शेतीची मशागत करण्यासाठी योग्य ग्रंथपाल आवश्यक असतो. पुस्तक हे ज्ञानाच्या कक्षा रुंदावत असतात. व्यक्तीचा वैचारीक विकास करण्याचे काम त्यामुळे होते. स्थायी भाव म्हणून ग्रंथालय चळवळ जिवंत ठेवली पाहिजे. ग्रंथपालाने जबाबदारीने काम करुन एक आदर्श निर्माण करणे आवश्यक आहे.

लेखिका: वर्षा फडके

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/1/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate