অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

राष्ट्रकुल अभ्यासवर्ग आणि वेळेचे नियोजन

राष्ट्रकुल अभ्यासवर्ग आणि वेळेचे नियोजन


पैसा किंवा अन्य बाबी गेल्या तरी परत मिळविता येतील परंतु एकदा गेलेली वेळ परत मिळवता येत नाही. यासाठी आयुष्यात प्रत्येक गोष्टीच्या नियोजनाला महत्त्व देण्याची नितांत गरज आहे, या विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या वाक्याला विधिमंडळाच्या सभागृहांचे कामकाज सुरू होताना प्रत्येक मिनिटाची वेळ आवर्जून पाळली जाते या वाक्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुजोरा दिला. विशेष म्हणजे हे सांगितले जात असतानाच विधानसभेतील कामकाज सुरू होण्याच्या पाच मिनिटे आधी वाजणारी बेल घणानू लागली आणि सर्वांचे कान आपोआपच टवकारले गेले…. मान्यवरांचे हे वक्तव्य 9.55 वाजता वदवून नियतीनेही योगायोग साधला आणि जणू वेळेचे नियोजन सर्वात महत्वाचे असण्याला आपलीही सहमती व्यक्त केली....
सनईचा मंद सूर… विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरची उत्सुकता, आनंद, अभिमान असे संमिश्र भाव अशा वातावरणात राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या 44 व्या अभ्यासवर्गाचे नागपूर विधिमंडळाच्या विधानपरिषद सभागृहात सोमवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. त्यावेळी हा योग जुळून आला आणि व्याख्यानांबरोबरच प्रात्यक्षिकाचेही दर्शन घडून आले.
नागपूर येथे होणाऱ्या महाराष्ट्र विधानमंडळाच्या अधिवेशन कालावधीत राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेच्या वतीने 1964 पासून दरवर्षी राज्यातील विविध विद्यापीठांतील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन या विषयांचा पदव्युत्तर अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘संसदीय कार्यप्रणाली व प्रथा’ या विषयांबाबत अभ्यासवर्ग आयोजित केला जातो.
विधानसभाध्यक्षांनी आज आपल्या भाषणातही वेळेचे नियोजन केले. मोजक्याच शब्दांत ते विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवताना त्यांनी इतर सामाजिक प्रश्नांवरही आपले मत व्यक्त केले. राज्यात वाढत असलेल्या पाण्याच्या संकटावर काटकसरीने मात करण्याचा आणि स्वच्छतेचे आचरण करण्याचा सल्ला त्यांनी दिला. तसेच इतरांच्या प्रगतीने विचलित न होता स्वत:मधील उणिवा शोधून त्या दूर करून उन्नती साध्य करण्याचा वडीलकीच्या नात्याने कानमंत्रही विद्यार्थ्यांना दिला. नागपूर कराराअंतर्गत येथे विधिमंडळाचे एक अधिवेशन घ्यावे, या अधिवेशनाचा उपयोग भावनात्मक ऐक्य निर्माण करण्यासाठी होईल, असे राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी म्हटल्याची आठवण श्री. बागडे यांनी यावेळी आवर्जून सांगितली. विधानपरिषद सभापती शिवाजीराव देशमुख यांनी राष्ट्रकुल संघटनेचा इतिहास आणि आवश्यकता स्पष्ट केली. आपला केंद्रबिंदू सर्वसामान्य माणूस आहे, त्याला सुदृढ करण्यासाठी विविध माध्यमातून सर्वांनीच प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.
संविधान हे सर्वोच्च असून संसदीय लोकशाहीची रचना आणि कार्यपद्धती ही अत्यंत उपयुक्त असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. कायदे तयार करणे आणि राज्याचे वित्तीय व्यवस्थापन करणे हे विधिमंडळाचे मूळ काम असून कार्यकारी मंडळ हे विधिमंडळाला उत्तरदायी आहे. विधिमंडळाच्या परवानगीशिवाय शासनाला एक पैसाही खर्च करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. विधिमंडळात राज्यातील विविध घटकांतील लोक प्रतिनिधित्व करतात, त्यामुळे समाजातील सर्व घटकांच्या प्रश्नांवर येथे चर्चा घडवून आणली जाते. त्यादृष्टीने या सभागृहांमधील कामकाजाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्याची आणि अभ्यासवर्गाच्या निमित्ताने आमदार न होता देखील सभागृहात बसण्याची संधी मिळत असल्याने विद्यार्थ्यांनी लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी योगदान द्यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रकुल संसदीय मंडळाची स्थापना 1911 मध्ये एम्पायर पार्लमेंटरी असोसिएशन या नावाने प्रथम इंग्लंडमध्ये झाली. या मंडळाने 1948 मध्ये ‘राष्ट्रकुल संसदीय मंडळ’ असे नाव बदलले. याचे मुख्यालय लंडन येथे आहे. संसदीय मंडळ आज राष्ट्रीय, राज्य, प्रांतिक प्रादेशिक स्वरूपात 175 शाखांमध्ये कार्यरत असून या मंडळाचे जवळजवळ 17 हजार पेक्षा जास्त संसद, विधानमंडळ सदस्य सभासद आहेत. राष्ट्रकुल संसदीय मंडळाची राज्य पातळीवर शाखा स्थापन करून त्याद्वारे उपयुक्त उपक्रम राबविणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. 1952 सालापासून राष्ट्रकुल संसदीय मंडळाची महाराष्ट्र शाखा आपल्या राज्यात कार्यरत आहे. विधान परिषदेचे सभापती आणि विधानसभेचे अध्यक्ष हे या संस्थेचे पदसिद्ध सह-अध्यक्ष असून विधानमंडळाचे प्रधान सचिव हे पदसिद्ध सचिव आहेत.
संयुक्त राष्ट्र संघ (UNO) आणि अलिप्त राष्ट्र संघ (NAM) या खालोखाल राष्ट्रकुल संसदीय संघटना (CPA) ही एक मोठी जागतिक संघटना म्हणून ओळखली जाते. संसदीय शासन प्रणालीमध्ये संसदीय शासन अधिक समृद्ध व बळकट करून सर्वसामान्य जनतेमध्ये संसदीय शासन पद्धतीबाबत जागृती, प्रेम आणि आदर निर्माण करण्यासाठी विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न करणे, परस्परांतील विविध संसदीय प्रथांचा, पद्धतीचा अभ्यास करून प्रत्येक राष्ट्राला आपापली संसदीय शासन प्रणाली अधिकाधिक समृद्ध करण्यास प्रवृत्त करणे, संसद सदस्यांची कर्तव्ये, त्यांचे अधिकार व जबाबदारी यामध्ये येणाऱ्या अडचणींच्या संदर्भात विविध विषयांवर विचारांची देवाण-घेवाण हे कार्य देखील या मंडळामार्फत केले जाते.
या अभ्यासवर्गात संसदीय लोकशाहीशी संबंधित विविध विषयांची माहिती देणारी मान्यवर आणि तज्ज्ञ व्यक्तींची व्याख्याने आयोजित करण्यात येतात. यामध्ये सत्ताधारी तसेच विरोधी पक्षांतील मान्यवरांसह प्रशासनामधील अधिकाऱ्यांचाही समावेश असतो.
आजचे मान्यवरांचे बोल ही विद्यार्थ्यांसाठी मेजवाणी होती. तथापि पुढील पाच दिवस मिळणारी पंचपक्वान्ने पाहता विद्यार्थ्यांना आकाश ठेंगणे होणार आहे, यात शंका नाही. अभ्यासवर्गाच्या उद्घाटनानंतर सर्व मान्यवरांसोबत ग्रूप फोटो आणि आजपासून विधिमंडळाचे प्रत्यक्ष काम पाहण्याची विद्यार्थ्यांना मिळणार असलेली संधी याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होता. पाच दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमांमधली अनुभवायला मिळणारी एकही संधी सोडायची नाही यादृष्टीने वेळेचे नियोजन करण्यामध्ये विद्यार्थी आपापल्या मार्गदर्शकांसोबत आतापासूनच गुंतून गेले होते.

-ब्रिजकिशोर झंवर

- माहिती स्रोत: महान्यूज, मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate