অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मराठी विश्वकोश ॲप

मराठी विश्वकोश ॲप

'अंक ते आतुर चिकित्सा' या खंडापासून सुरू झालेला मराठी विश्वकोशाचा प्रवास विसाव्या खंडापर्यंत येऊन पोहचला आहे. आता तर हाच मराठी विश्वकोश मोबाईल ॲपवरही उपलब्ध झाला आहे. मराठी विश्वकोश आणि या ॲपविषयी ...

ब्रिटानिका एनसायक्लोपीडियाच्या धर्तीवर मराठीतून ज्ञानाचा खजिना उघडणाऱ्या विश्वकोशाची सुरुवात तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी केली होती. मराठी विश्वकोशाचे आतापर्यंत एकूण 20 खंड प्रकाशित झाले आहेत. 20 वा खंड पूर्वार्ध आणि उत्तरार्ध अशा दोन भागात प्रकाशित झाला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत विश्वकोशाचे सर्व खंड विश्वकोश संकेतस्थळावर यापूर्वीच वाचकांना उपलब्ध करुन देण्यात आले होते. आता एक पाऊल पुढे जाता विश्वकोश आता मोबाईल ॲपद्वारे वाचकांना उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.

भारतीय भाषांमधील ग्रंथ रुपात असलेल्या अनेक विश्वकोशापैकी केवळ मराठी विश्वकोश संपूर्ण रुपात जनतेस marathivishwakosh.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेच. आता बदलत्या तंत्रज्ञानाची जोड देत “ जेथे जेथे मराठी तेथे तेथे उभा विश्वकोश तुझ्यासाठी “ असेच जणू ज्ञानाचे भांडार पुढे करीत विश्वकोश विश्वातील मराठी माणसांना सांगत आहे. कारण आता मराठी विश्वकोश ॲपमध्येही उपलब्ध झाला आहे. सुरुवातीला संगणकावर, त्यानंतर सी-डॅकच्या माध्यमातून संकेतस्थळावर हे ज्ञानकोश उपलब्ध करण्यात आले. पुढे या सर्व खंडाच्या सीडी निघाल्या तसेच पेन ड्राइव्हच्या माध्यमातून उपलब्ध करण्यात आले आहेत. बदलत्या काळातील तंत्रज्ञान आणि नवीन पिढीचा विचार करीत आता हे सर्व ज्ञानाचे भांडार केवळ एका क्‍लिकवर ‘मोबाईल ॲप’वर पाहण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

मराठी विश्वकोश मोबाईल ॲप कसे डाऊनलोड कराल ?

विश्वकोशाच्या २० खंडांमध्ये संपादित व संकलित केलेली माहिती कोणाही व्यक्तीला सहजपणे उपलब्ध व्हावी, यासाठी हे ॲप बुकगंगा डॉट कॉम या संस्थेने सामाजिक जाणिवेतून विनामूल्य उपलब्ध करुन दिले आहे. मराठी विश्वकोश मोबाईल ॲपमुळे जगभरातील लोकांच्या हातात मराठी विश्वकोशाचे खंड देणे शक्य झाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मराठी विश्वकोशाच्या वीस खंडांतील माहिती या ॲपमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. हे ॲप गुगल प्ले स्टोअर वरून विनामूल्य डाऊनलोड करता येईल. ॲन्ड्राँइड, आय फोन झिंगल या प्रमुख मोबाईल प्रणालींमध्ये हे ॲप वापरता येणे शक्य आहे. या ॲपमुळे जगभरातील मराठी भाषेचे वाचक व अभ्यासकांना याचा फायदा होणार आहे.

माहितीचा खजिना एका क्लिकवर उपलब्ध – विनोद तावडे

मराठी विश्वकोशाचे वीस खंड तयार झाले आहेत. हे सर्व खंड आता मोबाईल ॲपद्वारे वाचकांना ऑनलाइन उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ‘विश्वकोशा’तील ज्ञान व माहितीचा खजिना जगातील सर्व वाचकांना व मराठी भाषेचा अभ्यास करणाऱ्यांना एका क्‍लिकवर उपलब्ध होणार आहे. मोठ्या आकाराचे विश्वकोश ग्रंथ हाताळणे, त्यातील माहितीचा शोध घेणे हे वाचकांना कठीण जात होते. माहिती तंत्रज्ञानात जसजसे बदल होत गेले, तसे हे मराठीतील हे संचित नव्यानव्या माध्यमातून वाचकांपुढे यावे यासाठी मराठी विश्वकोशाचे 20 खंड ॲपदवारे वाचकांना उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत करण्यात आला आहे. मराठी विश्वकोश खंडाच्या अद्ययावतीकरणाचे कार्य मंडळाने हाती घेतले असून, त्यासाठी विविध विद्यापीठे, शैक्षणिक, संशोधन संस्था यामध्ये विषयनिहाय ज्ञानमंडळाची स्थापना करण्यात आली आहे. हे ग्रंथभांडार त्या त्या क्षेत्रातील, विषयातील तज्ज्ञ लेखक, समीक्षकांच्या प्रयत्नातून समृद्ध केले जात आहे. इथल्या नोंदी पुन्हापुन्हा तज्ज्ञांकडून तपासून तंत्रज्ञानाच्या वापराने अद्ययावत नोंदी वाचकांपर्यंत तत्काळ पोचविण्याची व्यवस्था केली जात आहे. माहितीची अधिग्राह्यता, प्रत्येक नोंदीला प्राथमिक संदर्भमूल्य आणि नेमक्‍या आणि वस्तुनिष्ठ शब्दात मांडलेले हे लेखन झालेले आहे. हा मराठी भाषेचा मोठा वारसा असून, आता हा ॲपच्या रूपाने तो जगभरातील वाचक व अभ्यासकांसमोर येत आहे हे विशेष. आधुनिक तंत्रज्ञानाने समाजात मोठी क्रांती घडवून आणली आहे. तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात होणारे हे बदल स्तिमित करणारे आहेत. तंत्रज्ञानातील हे बदल येथेही लागू करीत या बदलांचा स्वीकार करीत विश्वकोश ॲपद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

बुकगंगा डॉट कॉमने तयार केले मोबाईल ॲप

बुकगंगा डॉटकॉम या ग्रंथक्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेने हे ॲप तयार केले आहे. मराठी विश्वकोश या नावाचे हे ॲप गुगल प्ले स्टोअरवरून वाचक व अभ्यासकांना विनामूल्य डाउनलोड करता येणार आहे. या नव्या तंत्रामुळे विश्वकोशाचे वीस खंड, १५१ विषय, ३१२ सूची, १८ हजार १६३ लेख असलेले हे ज्ञानभांडार आता मोबाईलच्या एका क्‍लिकवर लोकांना सहज उपलब्ध होणार आहेत. विषय, शीर्षक, खंड आदीनुसार या माहितीचा शोध घेता येणार आहे. हा खजिना मराठी वाचकांबरोबरच मराठी भाषेवर काम करणाऱ्या जगभरातील अभ्यासकांना उपयुक्त ठरेल. माहिती तंत्रज्ञानातील बदलानुसार मराठी भाषेतील ज्ञानाचा खजिना नव्या पिढीला त्यांच्या माध्यमात उपलब्ध व्हावा, यासाठी हे ॲप तयार केले आहे. यापुढे ऑडिओ बुक स्वरूपात माध्यमातून श्रवण हे विश्वकोश उपलब्ध करून देण्याचा मानस असून, त्यादृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर मराठी भाषेचा विकास व संवर्धनासाठी राज्य शासनाने राज्य साहित्य संस्कृती मंडळाची स्थापना केली. या मंडळाचा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम म्हणजे मराठी विश्वकोश निर्मिती करणे. या कार्यासाठी एक डिसेंबर १८८० रोजी महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ स्थापन केले. राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामार्फत विश्वकोशाचे एक ते २० खंड प्रकाशित करण्यात आले आहेत. या खंडात अंक ते ज्ञेयवाद अशा सुमारे १८ हजार नोंदी, लेख प्रकाशित करण्यात आले आहेत. येणाऱ्या काळात अधिकाधिक वाचकांनी हे ॲप डाऊनलोड करुन मराठीचा वापर वाढवावा यासाठी मराठी विश्वकोश मंडळ काम करीत आहे.

- वर्षा फडके

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate