অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

मंगेश तेंडुलकर अजातशत्रू व्‍यंगचित्रकार

मंगेश तेंडुलकर अजातशत्रू व्‍यंगचित्रकार

व्‍यंगचित्रकला ही मुळातच आक्रमक कला आहे, कारण ती प्रतिक्रियेतून जन्‍माला येते. कोणत्‍याही कलेचा उद्देश विध्‍वंस करणे हा नसतो, तसाच व्‍यंगचित्रकलेचाही नाही. मात्र, व्‍यंगचित्रे ही सुरंगाप्रमाणे स्‍फोटक तर कधी फुलांप्रमाणे कोमल ठरु शकतात, याचे भान व्‍यंगचित्रकारांनी जपले पाहिजे, अशा स्‍पष्‍ट विचारांचे ज्‍येष्‍ठ आणि श्रेष्‍ठ व्‍यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर आपल्‍या व्‍यंगचित्रांच्‍या रुपातून वाचकांच्‍या सदैव स्‍मरणात राहतील.

व्‍यंगचित्रकारितेत स्‍वत:ची शैली असणारे मोजके व्‍यंगचित्रकार आहेत, त्‍यामध्‍ये तेंडुलकरांचे स्‍थान खूप वरचे होते. सार्वजनिक जीवनातील व्‍यंगावर ते आपल्‍या कुंचल्याचे असे फटकारे मारत की चुकून तशा 'चुका' करणाऱ्याने शरमेने मान खाली घालावी. त्‍यांची व्‍यंगचित्रे गालावर खुदकन हसू उमटवणारी तर दुसऱ्याच क्षणी वाचकाला अंतर्मुख करुन विचार करायला लावणारी असत. राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्‍कृतिक अशा सर्वच क्षेत्रातील घडामोडींवर त्‍यांचा कुंचला लिलया भाष्‍य करायचा. मार्मिक, परखड विवेचन हा त्यांच्‍या व्‍यंगचित्रांचा पाया होता. त्‍यांची अनेक व्‍यंगचित्रे तत्‍वचिंतकाची भूमिका पार पाडणारी होती. चित्रकलेचे कोणतेही औपचारिक शिक्षण न घेता त्यांनी मारलेली भरारी अनेकांना थक्‍क करायला लावणारी आणि चित्रकलेचे प्राथमिक ज्ञान नसताना या व्‍यंगचित्रक्षेत्रात नवे काही करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.

तेंडुलकरांनी आयुष्‍यभर 'कृतीशील व्‍यंगचित्रकार' म्‍हणून भूमिका बजावली. त्यांची शैली नाविन्‍यपूर्ण होती, त्यांनी कोणाच्‍याही शैलीचे अनुकरण केले नाही. त्‍यांची रेषाच 'स्‍वतंत्र' असल्याने इतर कोणाला त्‍यांचे अनुकरण करणे जमले नाही. नवोदित व्‍यंगचित्रकारांनाही ते कोणाचे अनुकरण न करता स्‍वत:च्‍या आवडीप्रमाणे व्‍यंगचित्रे रेखाटण्‍याचा सल्‍ला देत. शब्‍दांचा अचूक वापर, रंगरेषांची नेमकेपणाने मांडणी आणि विषयामागची आंतरिक तळमळ यामुळे त्‍यांची व्‍यंगचित्रे रसिकांच्‍या अंतर्मनाला भिडत असत.

तेंडुलकरांचा जन्‍म 15 नोव्‍हेंबर 1936 ला झाला. बी.एस्‍सीची पदवी घेतल्‍यानंतर त्‍यांनी काही काळ अॅम्‍युनिशन फॅक्‍टरीमध्‍ये काम केले. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर व अर्थतज्ञ सुरेश तेंडुलकर त्‍यांचे बंधू होते. 1954 मध्‍ये त्‍यांनी रेखाटलेले पहिले व्‍यंगचित्र प्रसिद्ध झाले. त्‍यांची व्‍यंगचित्रकला 1995 पासून खऱ्या अर्थाने बहरात आली, ती शेवटपर्यंत. त्‍यांची भूईचक्र, पॉकेट कार्टून्‍स, संडे मूड ही पुस्‍तके प्रसिद्ध आहेत. त्‍यांना पटवर्धन पुरस्‍कार, महाराष्‍ट्र साहित्‍य परिषदेचा चिं.वि. जोशी पुरस्‍कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्‍कार, अखिल भारतीय नाट्य परिषदेचा वि.स. खांडेकर पुरस्‍कार, व्‍यसनमुक्‍तीसाठीचा महाराष्‍ट्र शासनाचा पुरस्‍कार, लायन्‍स क्‍लबचा पुरस्‍कार तसेच इतरही सन्‍मान प्राप्‍त झाले होते.

पुण्‍याची सार्वजनिक वाहतूक व्‍यवस्‍था, पर्यावरणाची समस्‍या हे त्‍यांचे जिव्‍हाळ्याचे विषय. यावर त्‍यांनी आत्मियतेने काम केले. सामाजिक जीवनातील ज्‍वलंत आणि जनमानसाच्‍या जगण्‍यावर परिणाम करणाऱ्या प्रश्‍नांवर ते ठामपणे उभे राहिले. त्‍यांची भूमिका संयत आणि संयमी होती. या प्रश्‍नांवर व्‍यंगचित्रे रेखाटतानाही त्‍यांनी आक्रस्‍ताळेपणा केला नाही. प्रश्‍नाचे गांभीर्य थेटपणे मांडण्‍याचे धारिष्‍ट्य त्‍यांच्यात होते. व्‍यंगचित्राचे माध्‍यम कमी पडतेय असे वाटल्यावर अनेकदा समस्‍यांच्‍या सोडवणुकीच्‍या समर्थनार्थ ते रस्‍त्‍यावर उतरले. दिवाळीच्‍या दिवसात वाहतुकीच्‍या सिग्‍नलला उभे राहून वाहतूक नियम पाळणाऱ्यांना एक व्‍यंगचित्र आणि गुलाबाचे फूल भेट देण्‍याचा नाविन्‍यपूर्ण उपक्रम त्‍यांनी अनेक वर्ष राबवला. त्‍यांच्‍या या उपक्रमास अनेक नामवंतांनी साथ दिली. केवळ प्रबोधन करुन न थांबता 'कृतीतून' त्‍यांनी आपला ठसा उमटवला. यामुळे व्‍यंगचित्रकार म्‍हणून रसिकांच्‍या मनात आणि सामाजिक कार्यकर्ता म्‍हणून सर्वसामान्‍य जनतेच्‍या मनात त्‍यांनी आदराचे स्‍थान मिळवले.

तेंडुलकर हे केवळ व्‍यंगचित्रकारच नव्‍हते तर नाट्यसमीक्षकही होते. व्‍यंगचित्रकाराची उपजत तिरकस नजर असल्‍याने त्‍यांची समीक्षा वेगळा आनंद देऊन जायची. समिक्षेत बोचरी टीका असली तरी ती घायाळ करणारी नसायची. चौफेर वाचन, विषयाची सखोल माहिती करुन घेण्‍याचा ध्‍यास यामुळे लेखन, समीक्षा किंवा भाषणांमधून त्‍यांनी रसिकांना नेहमीच आनंद दिला. व्‍यंगचित्र प्रदर्शन भरवण्‍यामागेही त्‍यांची एक स्‍पष्‍ट भूमिका होती. वृत्‍तपत्र अथवा नियतकालिकांमधून प्रसिद्ध होणाऱ्या व्‍यंगचित्रांबाबत वाचकांची प्रतिक्रिया थेटपणे व्‍यंगचित्रकारास मिळत नाही, मात्र प्रदर्शनातून दुहेरी संवाद साधण्‍याची संधी असते. त्‍यांनी आपल्‍या व्‍यंगचित्रांची 86 प्रदर्शने भरवली होती.

'मृत्‍यू' या विषयाकडे ते तत्‍वचिंतकाच्‍या भूमिकेतून पहायचे. मृत्‍यू म्‍हणजे शेवट नव्‍हे तर चिरंतन प्रवास, असे त्यांचे मत होते. स्‍वत:च्‍या मृत्‍यूवरही त्‍यांनी तटस्‍थपणे व्‍यंगचित्रे रेखाटली. प्रारंभीच्‍या काळात त्‍यांनी 'मृत्‍यू' या विषयावर व्‍यंगचित्रे रेखाटून दिवाळी अंकासाठी दिली होती. मात्र, दिवाळी हा आनंदाचा सण असतो, अशा काळात 'मृत्‍यू' या विषयावरील व्‍यंगचित्रे प्रसिद्ध करणे योग्‍य नाही, असे कारण देऊन त्‍या संपादकांनी छापण्‍यास नकार दिला होता. पण त्‍यावर अजिबात नाराज न होता, तेंडुलकरांनी आपल्‍या पद्धतीने व्‍यंगचित्रे रेखाटणे सुरूच ठेवले.

सन 2008 मध्‍ये बालगंधर्व रंग मंदिराच्‍या कला दालनात माझ्या व्‍यंगचित्रांचे प्रदर्शन पुणे-नगर रोटरी क्‍लबच्‍या वतीने भरवण्‍यात येणार होते. प्रदर्शनाचे उद्घाटन मंगेश तेंडुलकरांच्‍या हस्‍ते करण्‍याची इच्‍छा क्‍लबचे अध्‍यक्ष राजेंद्र दणके यांनी व्‍यक्‍त केली. तेंडुलकरांसारखी मोठी व्‍यक्‍ती उद्घाटनाला येईल का याबाबत मी साशंक होतो. तेंडुलकरांशी दूरध्‍वनीवर संभाषण करुन त्‍यांनी दिलेल्‍या वेळी आम्‍ही दोघे त्‍यांच्‍या निवासस्‍थानी गेलो. 'व्‍यंगचित्रे' हा माझा 'विकपॉईंट' असून या एकाच मुद्यावरुन येणार असल्याचे आवर्जून सांगितले आणि वेळेवर आलेही. कार्यक्रमात सुमारे वीस मिनिटे त्यांनी व्‍यंगचित्रे आणि सद्यस्थिती यावर अभ्‍यासपूर्ण भाषण दिले.

तेंडुलकरांना द्विअर्थी किंवा चावट व्‍यंगचित्रे काढणे आवडत नसत. त्‍यांनी आपल्‍या व्‍यंगचित्रांतून अनेकदा सामान्‍य माणसाच्‍या कोंडमाऱ्याला स्‍थान दिले. राजकीय व्‍यंगचित्रे रेखाटतानाही त्‍यांनी संयत भूमिका सोडली नाही, म्‍हणूनच त्‍यांची व्‍यंगचित्रे वादग्रस्त ठरली नाहीत, आजच्‍या काळात व्‍यंगचित्रकारांना जबाबदारीने व्‍यंगचित्रे रेखाटावी लागतात. कोणाच्‍या भावना कधी दुखावतील याचा भरवसा नसण्‍याच्‍या काळातही तेंडुलकर 'अजातशत्रू' होते, यावरुनच त्‍यांचे अलौकिक महत्‍त्व लक्षात येते.

लेखक: राजेंद्र सरग

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 3/21/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate