অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भिंग भाषेचे : बहुढंगी क्रियापदे

भिंग भाषेचे : बहुढंगी क्रियापदे

सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा. लवणारी भाषा. ‘हरकती’ घेत प्रवाही राहणारी भाषा... भाषा हा विषयच रोचक आणि चिंतनाला उद्युक्त करणारा. मराठी भाषेचा विविध अंगांनी वेध घेत,त्यात होणारे बदल टिपत, त्यावर आपले मत नोंदवत विचारप्रवृत्त करणारं हे नवं सदर. अभ्यासू लेखिका आणि कवयित्री नीलिमा गुंडी यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेलं...

मराठीतील काही क्रियापदे बहुढंगी आहेत. आपले रूप न बदलता ती नवनवा अर्थ व्यक्त करू शकतात. पाहा नाः मराठीत केवळ ठेचच लागत नाही, तर भूकही लागते आणि लॉटरीही लागते. माणसे अन्न तर खातातच, शिवाय ती वेळही खातात नि डोकेही खातात! आपले लोक फटके मारूनच थांबत नाहीत, तर उड्याही मारतात आणि मिठ्याही मारतात! इथे घंटा वाजते (ठीक आहे. ऐकू येते!) पण थंडीही वाजते!

अशा बहुढंगी क्रियापदांपैकी एक क्रियापद आहे ‘पडणे’. या लेखात मराठीतील पडण्याचे नाना प्रकार पाहू या-‘‘रस्त्यावर भलामोठा खोल खड्डा पडला होता. रात्री त्या खड्ड्यात एक माणूस पाय घसरून पडला. बिचार्‍याचा चेहराही पडला. रस्ता निर्मनुष्य असल्यामुळे तो विचारात पडला. तोच त्याच्या कानी शब्द पडले. त्यासरशी त्याचा जीव भांड्यात पडला.’’
अशी पडण्याची मालिका एखाद्याच्या वाट्याला येऊ शकते. किती वेगवेगळ्या अर्थछटा व्यक्त करण्यासाठी हे क्रियापद वापरले जाते! पाहा ना -
१. त्या चर्चेत ती अगदी एकटी पडली. (म्हणजे तिच्या विचारांना इतरांचा पाठिंबा मिळाला नाही.)
२. तिची केवढी इस्टेट पडून आहे! (म्हणजे तिची इस्टेट वापराशिवाय राहिली आहे.)
३. दर महिन्याला पगारातली ठरावीक रक्कम फंडात पडते. (येथे पडते म्हणजे जमा होते.)
४. वेळ पडली तर मी येईन की तुझ्याबरोबर! (वेळ पडली तर म्हणजे गरज लागली तर)
५. प्रतिस्पर्ध्यापेक्षा कमी मते पडल्यामुळे (म्हणजे मिळाल्यामुळे) निवडणुकीत तो उमेदवार पडला. (म्हणजे पराभूत झाला.)
६. सध्या कांद्याचे दर पडले आहेत. (म्हणजे दर कमी झाले आहेत.)
७. गनीम तुटून पडला. (म्हणजे शत्रू आक्रमकपणे चालून आला.)
८. दात नीट घास, नाहीतर ते पिवळे पडतील. (पिवळे पडतील म्हणजे पिवळे होतील.)
९. भीष्म धारातीर्थी पडला. (म्हणजे मृत्यू पावला.)
१०. झाडावरून खाली पडलेले फळ पाहून न्यूटनला गहन प्रश्‍न पडले. (प्रश्‍न पडले म्हणजे प्रश्‍न निर्माण झाले.)
अशी अनेक उदाहरणे सुचतील.

निसर्गात घडणार्‍या काही घटनांचे वर्णनही मराठीत ‘पडणे’ या एकाच क्रियापदातून केले जाते. उदा.ः ऊन पडते, थंडी पडते, काळोख पडतो, पाऊस पडतो आणि इंद्रधनुष्यदेखील पडते. मात्र ‘वारा पडतो’, ‘तेव्हा‘वारा कमी होतो’, असा अर्थ असतो. ‘पडणे’ हे एकच क्रियापद अगदी टोकाच्या भावना व्यक्त करू शकते. एखादी आई आजारी मुलाला प्रेमाने म्हणेल, ‘अरे, पड.’ (म्हणजे विश्रांती घे.) आणि खट्याळ मुलाला रागाने उपरोधाने म्हणेल, ‘जा! पावसात भीज! धाव! पड!’ येथे दोन्ही ठिकाणी ‘पड’ असे म्हणताना वेगवेगळे अर्थ अभिप्रेत आहेत. भाषा वाच्यार्थाने घेणार्‍यांना ते कसे कळणार?
भाषा नव्याने शिकणारी मंडळीदेखील आपल्या भाषेच्या या स्वभावामुळे बुचकळ्यात पडतात. ‘माणूस उंचावरून पडतो,’ हे त्यांना समजते. पण ‘स्वप्नही पडते.’ हे कसे काय? मात्र प्रत्येक भाषेत अशा गंमती असतातच.
भाषेमधली सूक्ष्म अलंकरणक्षमता वाक्प्रचारांमध्ये दिसतेच, तशीच ती शब्दप्रयोगांमध्येही दिसते. विशेषतः ‘प्रेमात पडणे’ आणि ‘धंद्यात पडणे’ हे शब्दप्रयोग आपल्या सामाजिक मानसिकतेचे तर दर्शन घडवीत नाही ना? या दोन्ही अनुभवांमधला संभाव्य धोका गृहीत धरून आपली ‘रोखठोक’ मानली जाणारी भाषा जणू क्रियापदातूनच आपल्याला गर्भित इशारा देत नाही ना?
आपल्याकडच्या सांकेतिक कथांमध्ये मुलगी प्रेमात पडते. मग तिचे नातेवाईक काळजीत तरी पडतात किंवा संकटात तरी पडतात. नायकनायिकेच्या मीलनासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांवर खलनायकामुळे पाणी पडते. नायकनायिकेचे जीवन सुरळीत होईपर्यंत असे पडण्याचे नाट्य रंगत राहते.

भाषेची अर्थदृष्ट्या असलेली समृद्धी अशी वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होत असते. त्यामुळे आपले भाषेचे आकलन भरभक्कम पायावर उभे राहण्यासाठी भाषेतला हा पडण्याचा बहुढंगी खेळ नीट जाणून घ्यावा लागतो.
----
डॉ. नीलिमा गुंडी
अन्नपूर्णा, १२५९, शुक्रवार पेठ, सुभाषनगर,
गल्ली क्र. ५, पुणे - ४११००२
स्थिरभाष ः ०२०-२४४८६०१५
nmgundi@gmail.काम

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 8/3/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate