অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

भिंग भाषेचे : जाहिराती आणि आपली (?) भाषा

भिंग भाषेचे : जाहिराती आणि आपली (?) भाषा

सभ्य भाषा. असभ्य भाषा. खळाळती भाषा. लवणारी
भाषा.‘हरकती’ घेत प्रवाही राहणारी भाषा... भाषा हा
विषयच रोचक आणि चिंतनाला उद्युक्त करणारा.
मराठी भाषेचा विविध अंगांनी वेध घेत, त्यात होणारे
बदल टिपत,त्यावर आपले मत नोंदवत
आपल्याला विचारप्रवृत्त करणारं हे सदर.

आपली इच्छा असो वा नसो, जाहिरातींपासून सुटका नाही, अशी आज परिस्थिती आहे. अशावेळी जाहिरातींच्या भाषेचा विचार बारकाईने करावा लागतो. आपल्याकडील कुपोषणाच्या समस्येबाबत जागरूकता निर्माण करणार्‍या दूरदर्शनवरील एका जाहिरातीत मुलींना लहानपणापासून चांगला आहार द्यायचा संदेश दिला होता. त्यातील हेतू स्तुत्य होता. पण त्यात भर होता तो ‘तुमच्या होणार्‍या बाळांसाठी’ या शब्दांवर! ते ऐकताना वाटलं, मुलींवर आतापासून या विचारांचं ओझं लादणं योग्य आहे का? त्यापेक्षा ‘आपल्या उद्याच्या पिढीसाठी’ असंही म्हणता आलं असतं!

आजकाल जाहिराती जिथूनतिथून आपल्या डोळ्यांवर आदळतात आणि कानांवरही आदळतात. त्यातील लेखनविषयक नियमांविषयीचा अनास्था आणि संकरित भाषाप्रयोग यामुळेही बर्‍याच जाहिराती मनात प्रश्‍न उपस्थित करतात. जाहिराती या आजच्या बदलत्या युगाचा एक घटक असल्यामुळे हे प्रश्‍न दृष्टिआड करता येत नाहीत.

बाह्य सौंदर्याला प्राधान्य देणार्‍या आणि सौंदर्यप्रसाधनांची विक्री वाढावी म्हणून झटणार्‍या अनेक जाहिराती भाषेच्या सहज सौंदर्याकडे पाठ फिरवताना दिसतात. ‘डोक्यावर नैसर्गिक केस उगवा’, हे जाहिरातीतील शब्द वाचताना अंगावर काटा येतो! आपल्या उत्पादनामुळे होणारा फायदा सांगताना ‘तिप्पट केस कमी गळतात’ हे शब्द वाचून करमणूक होते. ‘केस गळण्याचे प्रमाण तिपटीने कमी होते.’, अशा सुबोध भाषेचे जाहिरातदारांना वावडे असावे! ‘सुंदर केस मिळवण्यासाठी, आता जा तुमच्या डोक्याच्याही पुढे’ हे एका जाहिरातीतले शब्द वाचतान ‘म्हणजे कुठे?’ असा प्रश्‍न पडून मी बसल्या जागी स्वतःला सावरले! केसांच्या आरोग्यासाठी शरीरांतर्गत आरोग्य सुधारणारे त्यांचे औषधी उत्पादन वापरावे, असे त्यांना सांगायचे होते. पण जाहिरातीच्या बेंगरूळ भाषाशैलीमुळे वाचक गोंधळात पडण्याचीच शक्यता वाटते. ‘अनुभवा एक बळकटी, केशमुळांपासून ते केसांपर्यंत’ अशी आज्ञा देणारी जाहिरात वाचताना त्यांच्या भाषेच्या कमकुवतपणाची खात्रीच पटते.

जाहिरातींमध्ये अनेकदा मजकूर भाषांतरित स्वरूपाचा असतो. अस्सल मराठी बाज असलेली शब्दकला दूर ठेवून यांत्रिकपणे भाषांतर झालेले असते. त्यामुळे ‘जागोे, ग्राहक जागो’ चे ‘जागा, ग्राहक जागा’ हे मराठी भाषांतर करणारा स्वतः कितपत जागा होता याची शंका येते. काही वेळा भाषांतरात हिंदी वा इंग्रजी शब्द जसेच्या तसे वाचकांच्या गळी उतरवलेले असतात. त्यामुळे अमुक साबण वापरल्यावर त्वचेला ‘झळाळी’ किंवा ‘चमक’ येईल, असे न म्हणता ‘निखार’ हा हिंदी शब्द वापरलेला दिसतो. तर कधी ‘नितळ’ कांती ऐवजी ‘निरागस’ कांती असा शब्दप्रयोग तयार झालेला दिसतो. स्वयंपाकाच्या तेलाची एक जाहिरात वाचनात आली. त्यात सुरूवातीलाच म्हटले होते. ‘हेल्दी भविष्यासाठी व्हा वचनबध्द!’ मनात आले, ‘हेल्दी’साठी मराठीत प्रतिशब्द नाही का? एखादी वेगळी अर्थछटा सुचवणारा इतर भाषेतील शब्द जरूर वापरावा. पण इथे तसेही होत नाही. कसलेही वैचारिक किंवा कलात्मक प्रयोजन नसताना वापरलेली अशी भाषा खरंच ‘आपली’ वाटते का? की आजच्या गिर्‍हाईकांनाच अशी भाषा हवी आहे? तसं असेल तर प्रश्‍न जास्तच गंभीर बनतो.

वस्त्रप्रसाधने ही सुसंस्कृत माणसाची महत्त्वाची गरज असते. त्यामुळे वस्त्रप्रावरणांवर सांस्कृतिक ठसा असतो. आपल्या महाराष्ट्राची दोन हजार वर्षांची परंपरा सांगणारी पैठणी आपण गौरवाने अंगावर मिरवतो. तिच्या जाहिरातीत ‘लोटस पैठणी, मोर ब्रोकेड, पाटली पल्लू, टिश्यू’ अशा प्रकारच्या पैठण्यांचा केलेला उल्लेख वाचताना मनात आलं की मराठीत यासाठी एकही चपखल शब्द वापरताच येणार नाही का? संस्कृतीचे बंध टिकवण्यासाठी वस्त्राचा धागा जसा महत्त्वाचा! भाषा विरली तर संस्कृतीचे वस्त्र कसे टिकेल? या लेखात उदाहरणापुरते ठळक नमुने फक्त दिले आहेत. प्रत्यक्षात जाहिरातींच्या भाषेवर हिंदी-इंग्रजीचा जबरदस्त प्रभाव असून तो अनावश्यक वाटतो. अशावेळी विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी उपस्थित केलेला प्रश्‍न आजही अर्थपूर्ण वाटतो. त्यांनी म्हटले होते की, इंग्लिश भाषेचा आम्ही द्वेष करीत नाही. मात्र ते ज्ञानभांडार आपलेसे करून घेताना ‘आपल्या’ भाषेचे सत्त्व म्हणजे निराळेपण कायम राखले पाहिजे. भाषेत सतत भेसळ होत गेली तर ‘आपल्या भाषेला लाभ झाले’ मधील ‘आपल्या’ या शब्दाला अर्थ राहील काय? (‘निबंधमाला’, जानेवारी १८७४) एकंदरीत सव्वाशे वर्षे उलटून गेली तरी ‘मराठी भाषेची सांप्रतची स्थिती’ तशीच आहे तर.....!
----
डॉ. नीलिमा गुंडी
अन्नपूर्णा, १२५९, शुक्रवार पेठ,
सुभाषनगर, पुणे - ४११००२
स्थिरभाष ः ०२०-२४४८६०१५

स्त्रोत: मिळून साऱ्याजणी

अंतिम सुधारित : 3/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate