অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

फडणवीस सरांचा तास !

फडणवीस सरांचा तास !


शहापूर तालुक्यातील दुर्गम आदिवासी आणि डोंगरी भागातील निसर्गरम्य परिसरात वसलेले किन्हवली गांव. या भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी म्हणून विद्याप्रसारक शिक्षण मंडळाने या परिसरात अनेक शाळा, महाविद्यालय सुरु केली. त्यामुळे या भागातील हजारो आदिवासी आणि इतर विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ होत आहे. ज्या संस्थेने या भागात शिक्षणाची सोय केली त्या संस्थेला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत. दशकपुर्तीच्या निमित्ताने संस्थेने नुकताच एक कार्यक्रम आयोजित केला. त्या दशकपूर्ती सोहळ्याचे उद्घाटक होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस !
कार्यक्रमाचा एक भाग म्हणून या संस्थेने मुख्यमंत्री आणि विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला. जवळपास 40 मिनिटे हा तास चांगलाच रंगला. कारण शिक्षकाच्या भुमिकेत होते मुख्यमंत्री फडणवीस !
कार्यक्रम सुरु झाल्यावर प्रारंभीच मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना म्हटले की, भारत हा तरुणांचा देश आहे. आपले महाशक्ती बनण्याचे स्वप्न युवकांमुळेच शक्य होणार आहे. भारत हा जगाच्या पाठीवरील सर्वात तरुण देश आहे. इ.स.2020 साली भारताचं वय 29 वर्ष असेल. त्याचवेळी जपान 48, चीन 37, अमेरिका 39 आणि युरोपचे वय 41 वर्षांचे असेल.
म्हणूनच मित्रांनो ! आपल्या नजिकच्या काळात जागतिक पातळीवर महासत्ता म्हणून राज्य करण्याची मोठी संधी आहे. भविष्यात जगाला मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार आहे. जगाच्या अर्थव्यवस्थेवर कब्जा करता येणार आहे. हे खरं आहे की, आपल्या देशात गरीबी आहे. आर्थिक विषमता आहे. तरीही परिस्थितीवर मात करुन पुढे जायला शिकले पाहिजे. कला, क्रीडा, उद्योग, संशोधन क्षेत्रात पुढे जाता येणे शक्य आहे. प्रत्येकाने माझ्या देशासाठी काहीतरी करायचं ही गोष्ट मनात बाळगली पाहिजे. समाजासाठी काहीतरी करायचंय हे स्वप्न पाहिले पाहिजे. भारताचे वर्तमान आणि भविष्य तरुणाईच्या हातात आहे.
या मार्गदर्शनानंतर टाळ्यांचा कडकडाट झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारले. पहिलाच प्रश्न चांगला होता. युवापीढी व्यसनाच्या बंधनात अडकतेय, त्यावर शासन कडक उपाय का करीत नाही ? यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, मित्रांनो ! व्यसनापासून दूर राहण्यासाठी मनाची बैठक पक्की पाहिजे. व्यसनामुळे होणारे शारीरिक, आर्थिक नुकसान हे कधीही भरुन निघत नाही. व्यसनामुळे आरोग्य संपते. म्हणूनच शाळा-महाविद्यालयातून कौन्सलिंग होणे गरजेचे आहे. पालकांनीही अधिक जबाबदारीने लक्ष देण्याची गरज आहे. शासनाने अनेक कायदे केले आहेत. शाळा- महाविद्यालयाने ठरविले पाहिजे की, एकही विद्यार्थी व्यसनाधीन होणार नाही !
दुसरा प्रश्न होता ग्रामीण भागातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा कधी देणार ? या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी शासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. शासन आता क्लाऊड कॉम्प्युटिंग सिस्टिम राबवित आहे. त्यामुळे रोगाचे निदान लवकर कळून अत्यंत कमी खर्चात उपचार होऊ शकतात. लवकरच टेलिमेडिसिन सेवा सुरु करीत आहोत. त्यामुळे डॉक्टरांकडून चांगले उपचार मिळतील. ग्रामीण भागातील लोकांना शहरी भागाप्रमाणे सर्व सोयी, उपचार अत्याधुनिक पद्धतीचे मिळतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
आश्रमशाळा कधी सुधारणार? हा प्रश्न एका विद्यार्थीनीने विचारला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी आश्रमशाळांना अद्ययावत शिक्षण सुविधा देण्यासाठी सरकार बांधिल असल्याचे सांगितले. आश्रमशाळा, आदिवासी भागातील शाळांपर्यंत अत्याधुनिक यंत्रणा पोहोचवून उत्तम दर्जा राखण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. अभ्यासक्रमातही अमुलाग्र बदल करणार असल्याचेही ते म्हणाले.
शेवटचा प्रश्न फारच महत्वाचा होता. एका नऊ वर्षाच्या विद्यार्थ्याने विचारले, की आपण शाळेत असताना भविष्यात कधी मुख्यमंत्री होऊ असे वाटलं होत का? या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीस हसले. विद्यार्थ्यांनी जोरात टाळ्या वाजवल्या. ते म्हणाले, मित्रांनो ! शाळेत असताना मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहिले नव्हते. आमदार झालो तेंव्हाही पाहिले नव्हते. आता माझ्यावर जबाबदारी सोपवली ती मी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा टाळ्यांच्या कडकडक झाला आणि फडणवीस सरांचा हा तास संपला. 

-डॉ. संभाजी खराट
जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे

माहिती स्रोत: महान्यूज, गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०१५.

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate