অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

दोन गुरू (अपमान आणि भूक)

दोन गुरू (अपमान आणि भूक)

दोन गुरू (अपमान आणि भूक)

वयाच्या तेराव्या वर्षी,1963 ला नोकरीला लागलो. दुपारी शाळा संपली की घरी असेल-नसेल ते खाऊन दोनच्या सुमारास आठ किलोमीटर चालत जायचं.रात्री नऊ-साडेनऊ ते दहा वाजता पुन्हा आठ किलोमीटर चालत यायचं. घरी पोहोचायला साडेअकरा, कधीकधी बारा वाजायचे. पुन्हा सकाळी पावणेसहाला उठून शाळेला. नोकरीचे महिन्याला 35 रुपये आणि रात्रीचं एक वेळचं जेवण मिळायचं. जाताना एकदा आणि येताना एकदा असं दोन वेळा स्मशान लागायचं. कधीच भूत दिसलं नाही. पोटातली भूक भुतापेक्षा भयाण होती.

कुठल्याही शाळेत न मिळणारा धडा, परिस्थिती शिकवत होती. हळूहळू कशाचीच भीती वाटेनाशी झाली. मरायचं नव्हतं. येणाऱ्या दुखऱ्या क्षणांना बेदरकार होऊन सामोरा जात होतो, पर्याय नव्हता. रात्रीचं एक वेळचं जेवण गिळताना भाऊ आणि आई- वडिलांची आठवण यायची. ‘त्यांनी काही खाल्लं असेल का?’ असा वांझोटा विचार मनात यायचा आणि भुकेच्या वावटळीत भिरकावला जायचा.

अपरात्री परतत असताना रस्ता निर्मनुष्य आणि भयाण असायचा. तेव्हाची मुंबई वेगळी होती. एखादा दारुडा झिंगत माझ्या आडवा आला, तर त्याला चुकवून पुढे सरकताना मागून शिवी ऐकू यायची आणि मग मीसुध्दा मागे वळून आई-बहिणीवरून शिव्या द्यायचो. तो वळून पुन्हा शिवी द्यायचा. त्याचा तोल जात असायचा. अंतर राखून मी परतफेड करत असायचो. एखाद वेळी रस्त्यावरचा दगड कुठलाही विचार न करता भिरकावत असायचो. परिणामाची भीती नव्हती. उद्याचा विचार नव्हता. आला क्षण जगायचा होता, जसा जमेल तसा. कधी काळी कुणी मागे धावला, तर जमेल तसा पळूनसुध्दा जात असायचो. नंतर खूप अंतरावरून शिव्यांची उजळणी. नकळत मरणाची भीती धूसर होत गेली. समोरच्याला जोखण्याची ताकद रुजली डोळयात. तेराव्या वर्षी तिशीची समज आली. कधीतरी अपरात्री घरी परतत असताना फुटपाथवर चाललेला शृंगार पाहताना किळस आणि शिरशिरी एकाच वेळी येत होती. मुलींच्या चेहऱ्यावरून नजर छातीकडे सरकायला लागली होती. पण का कोण जाणे, पोटातली भूक कधी खाली घरंगळली नाही. भर दुपारच्या उन्हातून चालताना उडप्याच्या हॉटेलमधल्या वासाने चाल मंदावायची. क्षण दोन क्षण रेंगाळून पुन्हा चालायला लागायचो.

एकदा जरा जास्त रेंगाळलो, तेव्हा आतून एका मुलाने दोन इडल्या ठेवल्या हातावर आणि मी ओरडलो होतो, ”मी भिकारी नाही.” तिथून निघाल्यावर पुढचा रस्ता धूसर झाला होता. रात्री झोपेतसुध्दा खूप रडलो, असं सकाळी आई म्हणाली. खूप खोदून विचारल्यावर मी खरं काय ते सांगितलं आणि शाळेत गेलो. दुपारी घरी आल्यावर खिडकीतून डोकावलं तर आई- वडील रडत होते. मी थोडा वेळ बाहेर फिरून मग घरी गेलो. तोपर्यंत पाऊस ओसरला होता. मुलांसाठी काही करता येत नाही म्हणून वडील खूप खंतावायचे. बोलायचे नाहीत, पण आतून खूप खूप तुटायचे. त्या मानानं आई धीराची. मला वडिलांची खूप काळजी वाटायची. हळवे होते. माळकरी, कुठलंही व्यसन नाही, मांसाहार नाही. ही कमी पुढे मी पुरी केली. वडिलांचा व्यवसाय चांगला चालत असताना आम्हाला खूप नातेवाईक होते.

सुटीच्या दिवशी रात्रीचं जेवण घरच्यांसोबत. दोन चपात्या आणि डाळ. हिरवी मिरची खायचो. मग खूप पाणी. पोट भरायचं. आजही तिखटाची सवय सुटलेली नाही. चपातीच्या वासाची सर जगातल्या कुठल्याही फुलाच्या सुवासाला नाही. सणावाराला शेजारच्या घरातून गोडाचा वास यायचा. खावंसं वाटायचं. आज गोडाचा तिटकारा आहे. माणसंसुध्दा गोड वागली की संशय येतो. अगदी जेवणाच्या वेळी ”कसं आहे?” अशी वांझोटी चौकशी करण्यासाठी मी कितीतरी वेळा मित्रांच्या घरी गेलेलो आहे. माझी सगळयात गोड मैत्रीण भूक काय नाही दिलं या मैत्रिणीनं? त्या वयातला तो अप्रतिम प्रवास. पावला पावलागणिक किती शिकवलं तिनं! सारी शिकवण पोटातून. माझ्या पौडांगवस्थेत माझ्यासोबत कायम झोपलेली ही एकमेव मैत्रीण. खरं तर मी शिणून झोपायचो. ती कायम जागी असायची. माझ्या जिवंतपणाची खूण म्हणून. माझी खात्री आहे, न कळत्या वयात ज्यांना म्हणून ही मैत्रीण लाभली, ती मंडळी खूप सुखावली असतील पुढील आयुष्यात.

खूपदा कुणीतरी खात असताना मी आवंढे गिळलेत. आपण खातोय ही कल्पनाच सुखद होती त्या वेळी. अभिनय म्हणजे काय सरतेशेवटी? कल्पनाच की! पुढे होऊ घातलेल्या नटाच्या ढुंगणावर परिस्थिती दुगाण्या झाडत होती. गळयात दप्तर, पोटात भूक आणि पायात पेटके घेऊन वर्गात गेल्यावर खोडया काढणं हा एकमेव उपाय होता भूक विसरण्याचा. गुरुजींनी कायम ओणवा उभा केल्यामुळे फळयावरचे सुविचार मी उलटे वाचले. आजही या वयात कमरेचं दुखणं नाही. त्या गुरुजनांचा मी आभारी आहे, ज्यांनी मला पायाचे आंगठे धरायला शिकवले. डोळयाजवळचा दुसरा अवयव कुठला? असा प्रश्न विचारला तर सामान्यत: नाक, तोंड, कान असं लोक म्हणतील. पण शालेय जीवनात माझ्या डोळयाजवळचा अवयव माझ्या पायाचे अंगठे होते.

आजसुध्दा व्यायाम करताना पायाचे अंगठे पकडतो, पण त्या वेळची गंमत न्यारी होती. माझ्या भुकेचे मला लाड नाही करता आले. सारखं काहीतरी मागायची खायला, पण मी तिला शेफारू दिलं नाही. खपाटीला गेलेल्या पोटात निपचित पडून असायची. नंतर नंतर तिला अर्धपोटी राहायची सवय झाली. गोडाधोडाकडे परक्यासारखं पाहायला लागली ती. आपले डोळेच बुजवून टाकले तिने. त्याचा फायदा असा झाला की, मी वेतासारखा शिडशिडीत झालो. गालाची हाडं वर आल्यामुळे बालपणीच्या अब्राहम लिंकनसारखा लुक आला थोडासा. गळयाजवळचा कंठमणी टकमक टोकासारखा बाहेर आला. सारखं पाणी पिण्याची सवय लागली. त्यामुळे किडनीचे विकार दूर पळाले. पाणी पिताना कंठमणी गमतीदार हलायचा. डोळे खोल गेल्यामुळे चेहऱ्याला वेगळीच खुमारी आली.

भुकेचा एक मित्र होता. ‘अपमान’ त्याचं नाव. हा आला की खबदाडात गेलेल्या डोळयांना पाझर फुटायचा. त्यामुळे डोळे स्वच्छ. कुठलाही विकार नाही. खूप दूरचं लख्ख दिसायला लागलं. रोजच्या चालण्यामुळे आरोग्य उत्तम. मित आहारामुळे पचनेंद्रियांना योग्य तो आराम. या सगळयाचा परिणाम म्हणजे सतत कूस बदलणारी उत्तम झोप, त्यामुळे मेंदू सतर्क. माझ्या या मैत्रिणीला मी कुठेही घेऊन गेलो की तिथे अपमान हमखास टपकायचा. सुरुवातीला घाबरलो त्याला. नंतर वारंवार भेटल्याने सवय झाली. त्यानं मला चिंतन करायला शिकवलं. बरं, हा सर्वव्यापी. कुठेही, कधीही आणि कसाही पाठीराखा असल्यासारखा. पुढे यायचा कमी झाला, पण त्या आधी खूप शिकवून गेला. (भूक आणि अपमान यांची खूप गट्टी. सगळीकडे बरोबरीनं जाणार. खूप दिवस मुक्काम होता माझ्याकडे यांचा. एकदा का जुळवून घेतलं या जोडगोळीबरोबर, की योगसिध्दी प्राप्त झाल्याचा साक्षात्कार होतो.)

अपमान हा कुठल्याही प्रसंगाकडे त्रयस्थपणे पाहायला शिकवतो तुम्हाला. सकाळ- संध्याकाळ अपमान पाण्याबरोबर गिळल्यास भूक शमते. असा स्थितीत कुठल्याही अंमली पदार्थाचं सेवन न करता उत्तम ग्लानी येते. एका वेगळयाच विश्वाचा फेरफटका घडून येतो. अपमान गिळताना सुरुवातीला थोडा त्रास होतो, डोळयातून पाणी येतं. पण एकदा सवय झाली की मात्र गोंडस कोडगेपणा येतो. एकदा तो आला की अपमान पचवता येतो आणि अपमान पचायला लागला की एक प्रकारची मेणचट, लोचट तुकतुकी येते चेहऱ्यावर. दिवस सरले. ‘अपमान आणि भूक’ विद्यापीठातून उच्च शिक्षण प्राप्त करून बाहेर पडलो. जगातली कुठलीही गोष्ट आता मला भिवडवू शकत नव्हती. कितीही उंचावरून फेकलं तरी चार पायावर पडणाऱ्या मांजरासारखा झालो मी.

एक बेधडक निर्लज्ज हसू उगवलं माझ्या चेहऱ्यावर. माजुर्डी रग आली हालचालीत. मूठ वळण्यासाठीच असते, याची जाणीव झाली. समोरच्याला सुध्दा आपल्याइतक्याच वेदना होतात, ही उमज आली. प्रत्येकाच्या आतडयात भूकेची वसवट आहे, याचा साक्षात्कार झाला. अपमानाला जात नसते, याचा उलगडा झाला. उभं राहण्याआधी प्रत्येक जण रांगतो, हे उमगलं. उत्कर्षाच्या अलीकडच्या पायऱ्या आहेत भूक आणि अपमान. आता मी पलीकडच्या तिरावर पोचलोय. ही गुरू मंडळी अलीकडच्या तिरावर. आता दुसऱ्यांची शिकवणी चाललीय. अजून पुढचा तीर असेल कदाचित. आज इथं एकटाच बसलो असताना मी या माझ्या गुरूंकडे पाहत असतो. माझ्या वाटेला येत नाहीत आता. ओळख नसल्यासारखे वागतात. पण मी त्यांना विसरलो नाही.

..... नाना पाटेकर......

संकलन - सुनिल बाप्‍ते

स्त्रोत - साप्ताहिक विवेकच्या गुरुपौर्णिमा अंकात प्रकाशित, नाना पाटेकर यांचा लेख 'दोन गुरू'.

अंतिम सुधारित : 7/23/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate