অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

उस्मानाबादच्या कोरडवाहू शेतीत फुलतोय ‘सिंचनाचा मळा..!’

उस्मानाबादच्या कोरडवाहू शेतीत फुलतोय ‘सिंचनाचा मळा..!’

दुष्काळाला हमखास बळी पडणारे, दुष्काळाचे चटके सातत्याने सोसणारे या जगाच्या पाठीवर जे जिल्हे आहेत त्यात उस्मानाबाद हे नाव ठसठशीत असावं. त्यामुळेच दुष्काळ आणि उस्मानाबाद हे नातेही घट्ट. निसर्गाच्या अवकृपेपुढे शासकीय योजनांचा निभाव लागणेही कठीणच. तरीही राज्य सरकारने जलयुक्‍त शिवार ही योजना हिमतीने व नेटाने राबवून उस्मानाबादच्या कोरडवाहू शेतीत सिंचनाचा मळा फुलविला आहे. ही योजना भविष्यात शेतकर्‍यांना साह्यभूत ठरणारी आहे.

उस्मानाबाद जिल्हा हा बालाघाट डोंगररागांत वसलेला पण दुष्काळाच्या छायेत असलेला. त्यामुळेच जिल्ह्याच्या पाचवीला पुजलेल्या दुष्काळाचे संकट शेतकर्‍यांना नेहमीच त्रासदायक ठरत आलेलं. जिल्ह्यात जास्तीत कोल्हापुरी बंधारे, साठवण तलाव, पाझर तलावांच्या कामांमुळे दोन टक्के असलेले सिंचनाखालील क्षेत्र 17 टक्के झाले. जिल्ह्यात केवळ एका कारखान्यावर उसउत्पादकांची असलेली भिस्त पुढे 15 साखर कारखान्यांमुळे कमी झाली. या सकारात्मक परिणामामुळे जिल्ह्यात उसाचे क्षेत्र प्रचंड वाढले. केवळ बेभरवशी पावसामुळे अधेमधे झटके बसत असले तरी आता जलयुक्‍त शिवार योजनेमुळे त्याचेही आणखी सकारात्मक चित्र समोर येणार आहे. ही योजना सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या व दुसर्‍या वर्षीच्या आकडेवारी नजर टाकली तर ही योजना भविष्यात फलदायी ठरु शकते याचेच संकेत मिळत आहेत.

2015 - 16 या आर्थिक वर्षात जिल्ह्याचे सरासरी पेरणी क्षेत्र 3872 हेक्टर असताना पेरणी झाली ती 2980 हेक्टरवर; दुसर्‍या वर्षी लगेच (2016-17) वर्षात 3972 हेक्टर पेरणीक्षेत्र असताना 4773 हेक्टर लागवडीखाली आले. गेल्या वर्षी पावसाने जाता जाता जोरदार हजेरी लावली. तसेच जलयुक्‍त योजनेतून झालेल्या कामांमुळे पाणी जागोजागी आडले. त्याचा परिणाम जलसाठे समृध्द होण्यात झाला. या दोन वर्षांत 122 कोटींचा खर्च या कामांवर झाला आहे. जलयुक्‍त शिवारांतर्गत गावातील पाणी शिवारातच आडविणे, भूगर्भातील पाणीपातळीत वाढ करण्यासाठी उपक्रम राबविणे, सिंचन क्षेत्रात वाढ करुन शेतीसाठी संरक्षित पाण्याच्या कार्यक्षमतेत वाढ करणे, जलस्त्रोतातील गाळ लोकसहभागातून काढणे, वृक्ष लागवडीत प्राधान्य, पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जागृती करणे यांसह असंख्य कामे हाती घेण्यात येत आहेत. यात आता अनेक स्वंयसेवी संस्थाही पुढकार घेत आहेत. संवेदनशील अभिनेता आमिर खान यांच्या नेतृत्वाखाली सुरु असलेली वॉटरकप स्पर्धा ही गावागावांना जागृत करण्यासाठी पूरक ठरत आहे. या योजनेतल सहभागी गावांचा उत्साह पाहता हे दोन्ही वर्षी सिध्द झाले आहेत. भूम, परंडा आणि कळंब तालुक्यांतील गावे यात अग्रेसर राहिली आहेत.

ज्या गावांना दुष्काळाचा सर्वाधिक फटका सहन करावा लागला, अशा गावांमध्ये प्राधान्याने ही जलयुक्‍तची योजना राबविली जात आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचे उदाहरणच पाहायचे म्हटले तर दोन वर्षांत साधारण 408 गावांमधून जवळपास 35 हजार कामे झाली आहेत. त्यातून जिल्ह्याची पाणीपातळी वाढण्यास व जलसाठे समृध्द होत असल्याने शेतकर्‍यांना त्याचा थेट फायदाही होत आहे. नद्या, विहिरींमध्ये वर्षानुवर्षे साठलेला गाळ काढला जात आहे. तर दोन्ही तेरणा प्रकल्पांतील पाणीसाठाही गाळ काढल्यामुळेच वाढला आहे. नाले, ओढ्यांची पात्रे सरळ व खोल केली जात आहेत.

आता 2017 - 18 मध्ये 178 गावांची निवड झाली आहे. त्यात आता नव्याने 10 हजार 579 कामे प्रस्तावित आहेत. या कामांच्या प्रकल्प आराखड्यांना दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभेत मान्यता मिळाली की पुढे तालुका व जिल्हा पातळीवरील समितीची मान्यता, प्रशासकीय मान्यता व शासकीय सोपस्कर झाले की पुढील कामे सुरु होतील.

मागेल त्याला शेततळे या योजनेंतर्ग जिल्ह्याला 3 हजार 700 शेततळ्यांचे उद्दीष्ट आहे. पैकी 2 हजार 224 शेततळी पूर्ण ?झाली आहेत. 462 शेततळ्यांची कामे प्रगतीपथावर आहेत. यातील 1 हजार 472 शेततळ्यांचे अनुदान वाटपही झाले आहे. यासाठी 596.15 लाखांचा निधीही वितरीत झाला आहे. कामाचा हा झपाटा पाहता सरकारने कृषीच्या मुलभूत समस्यांकडे किती गांभिर्याने लक्ष दिले आहे याची प्रचिती येते.

एकूणच दुष्काळ या संकटाकडे सरकारसह स्थानिक नागरिकांनीही संधी म्हणून पाहिल्याने हाच दुष्काळ भविष्यात काहीसा सुसह्य होणार आहे. त्यासाठी प्रत्येक गावाने पुढे येऊन प्रत्येक नागरिकाने स्वत:पासून जलसाक्षरतेबाबत सजगता दाखविली तर ते सहज शक्यही होणार आहे.

मुख्यमंत्र्यांचे विशेष लक्ष-

उस्मानाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या अधिक झाल्याने सरकारने या दोन जिल्ह्यांत अनेक पथदर्शी प्रकल्प राबविले आहेत. जलयुक्‍त शिवारच्या कामांची पाहणी करण्यासाठी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन वेळा जिल्ह्याचा दौरा केला आहे. या शिवाय इतर संबंधित अधिकारी सातत्यने यावर लक्ष ठेवून हा प्रयोग यशस्वी करण्यासाठी धडपडत आहेत. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. प्रशांत नारनवरे असोत की विद्यमान जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे असोत, या दोन्ही अधिकार्‍यांनी गावातले पाणी शिवारात अडविण्याचे नियोजन केले आहे.

लेखक - भीमाशंकर वाघमारे,

उस्मानाबाद. (लेखक श्रमिक पत्रकार आहेत)

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 3/24/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate