অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

आधुनिक माध्यमांच्या युगातही वर्तमानपत्र अग्रगण्य

आधुनिक माध्यमांच्या युगातही वर्तमानपत्र अग्रगण्य

आजही लोकांना सकाळचा पहिला चहा हा वर्तमानपत्राबरोबरच घ्यायला आवडतो. भारतीय पत्रकारितेचा उदय ब्रिटीश राजवटीच्या काळात झाला. व्यावसायिकतेच्या उद्दिष्टाने ही पत्रकारिता सुरु झाली नव्हती. तर पाश्चात्य शिक्षणातून आधुनिकतेची झालेली ओळख आपल्या समाजाला करुन देण्याचे ध्येय त्यामागे होते.

मराठीतील पहिले वर्तमानपत्र ‘दर्पण’. या वृत्तपत्राची सुरुवात बाळशास्त्री जांभेकरांनी 6 जानेवारी 1832 रोजी केली. हे वृत्तपत्र इंग्रजी व मराठीमध्ये होते. त्याचे इंग्रजी नाव दि बॉम्बे दर्पण होते. या वृत्तपत्राची पाक्षिक म्हणून सुरुवात होऊन मे 1832 रोजी ते साप्ताहिकात रुपांतरित झाले. मात्र आर्थिक समस्येमुळे 1840 साली ते बंद पडले. 4 जुलै, 1840 रोजी ‘मुंबई अखबार’ या वृत्तपत्राची सुरुवात झाली. संपूर्णपणे मराठीतील पहिले वृत्तपत्र म्हणून या वृत्तपत्राचा उल्लेख होतो. दर शनिवारी हे पत्र प्रकाशित केले जात असे. मात्र वर्षभरातच हे वर्तमानपत्र बंद पडले. ‘प्रभाकर’ या वृत्तपत्राची 24 ऑक्टोबर 1841 रोजी भाऊ महाजन यांनी सुरुवात केली. या वृत्तपत्रातून प्रकाशित केलेली लोकहितवादीची शतपत्रे मोठ्या प्रमाणात गाजली. याशिवाय भाऊ महाजनांनी 1853 साली ‘धुमकेतू’ नावाचे साप्ताहिक 1854 साली ज्ञानदर्शन नावाचे त्रैमासिक सुरु केले.

या वृत्तपत्रांप्रमाणे कृष्णशास्त्री चिपळूणकर यांनी ज्ञानप्रकाश हे वृत्तपत्र काढले. ते 100 वर्षांपेक्षा अधिक काळ चालले. 1862 साली सुरु झालेल्या इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे मराठी विभागाचे संपादक जनार्दन सखाराम गाडगीळ हे होते. सुबोध पत्रिका हे प्रार्थना समाजाचे मुखपत्र होते. 1873 मध्ये या पत्राची सुरुवात झाली. समाज व धर्मासंबंधी सुधारणाविषयक चर्चा या पत्रातून झाली. प्रार्थना समाजाचे धर्मासंबंधीचे विचार प्रसृत करणे आणि त्यावरील आक्षेपांना उत्तर देणे हा यामागील हेतू होतो.

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांनी 1874 साली निबंधमालेची सुरुवात केली. यातून त्यांनी हिंदू धर्मातील प्रथा, परंपरा, रुढी यांचे पुनरुज्जीवन करणारे लेखन केले. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने कृष्णराव भालेकर यांनी 1877 साली पुण्यात दीनबंधू पत्राची सुरुवात केली. विचार जागृतीची, समतेची प्रेरणा मिळावी या उद्देशाने त्यांनी स्वत:च्या खर्चाने हे पत्र सुरु केले. बहुजनवादी वृत्तपत्रांमध्ये दीनमित्र, विटाळ-विध्वंसक, सत्यप्रकाश, मूकनायक, बहिष्कृत भारत, जनता इत्यादी वृत्तपत्रे प्रसिद्ध झाली.

लोकमान्य टिळकांनी जनतेला स्वातंत्र्य चळवळीस उद्युक्त करण्याच्या व समाज परिवर्तनासाठी -जनजागृतीचा एक महत्वाचा भाग या विचारांनी 4 जानेवारी 1881 मध्ये केसरी हे वृत्तपत्र सुरु केले. केसरीचे प्रथम संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी 1887 पर्यंत काम केले. त्यांनी प्रारंभीच्या काळात जनतेच्या विचार परिवर्तनविषयक लिखाणावर भर दिला. समाजसुधारणांच्या मूलगामी विचारातून सामाजिक सुधारणा वेग धरु शकतील याबाबत त्यांनी जागरुकतेने सामाजिक सुधारणावर आग्रही राहून केसरीत लिखाण केले. आगरकरांचा सडेतोडपणा, वैविध्य यामुळे केसरीची लोकप्रियता वाढली खरी परंतु पुढे टिळक व आगरकर यांच्यात वैचारिक मतभेद वाढत गेल्यामुळे 1888 पासून केसरीचे काम लोकमान्य टिळक पाहू लागले. केसरीने राज्यातील जनतेच्या विविध प्रश्न व समस्यांना वाचा फोडण्याचे कामही केले.

आज मराठी पत्रकारितेमध्ये खूप बदल झाले आहेत. एकेकाळी ज्या प्रक्रियेने वृत्तपत्र छापले जात होते. त्या प्रक्रियेत विद्युत यांत्रिकीकरणामुळे प्रचंड बदल झालेला आहे. वर्तमानपत्रांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. लोकशाही समाज व्यवस्थेतील चार स्तंभापैकी पत्रकारिता हा एक स्तंभ आहे. समाज प्रबोधनाचे काम करणारे वर्तमानपत्र हे आगामी शतकानो शतक आपले स्थान टिकवून ठेवणार आहे. यात काही शंका नाही.

- शैलजा पाटील-देशमुख

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate