অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

साखर आयुक्तालय - संकेतस्थळ

साखर आयुक्तालय - संकेतस्थळ

साखर आयुक्तालय यांचे संकेतस्थळ

कृषी प्रधान भारत देशात साखर उद्योग हा एक अतिशय महत्वाचा उद्योग आहे. देशाच्या एकूण साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्राचा वाटा सुमारे 35 टक्के इतका आहे. साखर आयुक्तांमार्फत शासन या उद्योगावर नियंत्रण करते. साखर आयुक्त यांची या उद्योगाच्या विकासासाठी तसेच नियमनासाठी जबाबदारी आणि कर्तव्ये निर्धारित केलेली आहेत.

महाराष्ट्रातील साखर उद्योगाशी निगडीत सर्व यंत्रणा आणि साखर उत्पादक शेतकरी यांच्यावर नियंत्रण ठेवण्याचे महत्वपूर्ण कार्य साखर आयुक्तालयाकडून होत असते. ऊस विकास कार्यक्रम, साखर कारखाने उभारणे, वीज सहनिर्मिती, ऊस क्षेत्राच्या विकासासाठी प्रयत्न करणे तसेच साखर कारखान्यांच्या माध्यमातून अपारंपरिक ऊर्जा स्त्रोतांच्या विकासाला चालना देण्यासाठी निर्धाराने प्रयत्न करणे की कामे या विभागाकडून होत असतात.

राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांचे सांविधिक लेखापरीक्षण करवून घेणे, त्यांच्या भांडवली खर्चाला मंजुरी देणे यासोबतच शेतकऱ्यांना द्यावयाच्या ऊसाच्या अंतिम दराला मंजुरी देणे आणि दरवर्षी गाळप परवाने जारी करणे या कामात साखर आयुक्तांची भूमिका महत्वाची असते.

ई-गव्हर्नन्सच्या प्रकल्पाअंतर्गत साखर आयुक्तालय कार्यालयाने केपीएमजी आणि महाऑनलाईन या संस्थेच्या मदतीने या विभागाची संपुर्ण लोकोपयोगी आणि प्रशासकीय माहिती प्रदर्शित करणारे एक सर्वांगीण संकेतस्थळ विकसीत केले असून ह्या संकेतस्थळाचा पत्ता www.mahasugarcom.gov.in असा आहे.

महाराष्ट्र शासनाच्या डाटा सेंटरवर स्थापीत केलेल्या ह्या संकेतस्थळाने ए.के.एस.इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सर्वीसेस प्रा.लिमीटेड या संस्थेकडून सायबर सुरक्षा परीक्षण (सायबर सेक्यूरीटी ऑडीट) पुर्ण केले आहे. तसेच GIGW, WCAG 2.0 आणि W3G या तिन्ही तांत्रिक पात्रता पूर्ण केल्या आहेत.

मोबाईलद्वारे या संकेतस्थळावरील माहिती होण्यासाठी महाऑनलाईन या संस्थेद्वारे आयओएस, अन्ड्रॉईड आणि विन्डो या प्रणालीतून वापरण्याजोगे अप्लीकेशनही या प्रकल्पाअंतर्गत विकसीत केले आहे. पुश-पुल एसएमएस गेटवे, जीआयएस आणि आउटलूक वेबईमेल या अद्ययावत बाबींचा अंतर्भाव या संकेतस्थळावर करण्यात आलेला आहे. सदर संकेतस्थळ महाराष्ट्र शासनाच्या ईमेल गेटवेशी संलग्न आहे.

सर्वसाधारणपणे उस उत्पादक शेतकरी, राज्यातले सर्व सहकारी आणि खासगी साखर कारखाने, साखर आयुक्त कार्यालयातील आणि संलग्न कार्यालयातील सर्व कर्मचारी, साखर उद्योगातील तज्ज्ञ आणि सल्लागार मंडळी, संशोधन संस्था, कृषी विद्यापीठे, सर्व सामान्य नागरीक आणि सर्व राजकीय कार्यकर्ते यांना नजरेत ठेऊन या संकेतस्थळाची रचना आणि विकास करण्यात आला आहे.
ह्या संकेतस्थळावर मुख्यत्वे दोन भाग असून पहिल्या भागात आमच्या विषयी, उप-उत्पादने, अभिप्राय, निविदा, नेहमीचे प्रश्न आणि महत्वाचे कार्यक्रम हे विभाग करण्यात आलेले आहेत तर दुसऱ्या भागात आयुक्तालयाची माहिती, महत्वाच्या व्यक्ती, संस्था, अद्ययावत बातम्या, इतर माहिती आणि महत्त्वाचे दुवे हे विभाग करण्यात आलेले आहेत.

'आयुक्तालयाची माहिती' या सदरात विभागाची संघटनात्मक संरचना तसेच 'मान्यवर' या सदरात माननीय मंत्री, माननीय राज्यमंत्री, माननीय सचिव, साखर आयुक्त, संचालक वित्त, संचालक प्रशासन यांची दुरध्वनी क्रमांकासहीत संपूर्ण माहिती दिली आहे. साखर आयुक्तालयातील प्रशासन शाखा, विकास शाखा, उपपदार्थ शाखा, लेखा परिक्षण शाखा, तांत्रिक शाखा, लेखा शाखा आणि सांख्यिकी शाखा या विभागांच्या विभाग प्रमुखांची त्यांची भुमिका आणि दुरध्वनी क्रमांकासहित माहिती 'विभाग' या सदरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

प्रादेशिक सहसंचालकाची जबाबदारी आणि कर्तव्ये आणि कोल्हापूर, अमरावती, नांदेड, नागपुर, औरंगाबाद, अहमदनगर आणि पुणे येथील प्रादेशिक सहसंचालकाची संपुर्ण माहिती 'प्रादेशिक सहसंचालक' या विभागात देण्यात आली आहे. साखर आयुक्तालयाच्या संदर्भात वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले विविध न्यायालयीन आदेश, शासन निर्णय, परीपत्रके, विधी/ उपविधी/ अधिनियम/ राजपत्रे आणि आयुक्तालय आदेश संकेतस्थळाच्या 'शानि/ परीपत्रके/ न्यायालयीन आदेश' या सदरात नियमीत प्रसिद्ध केले जातात.

या विभागाशी संबंधीत राज्यातील सर्व महत्वाच्या अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक आणि ई-मेल ची माहिती 'दूरध्वनी निर्देशिका' या सदरात तर 'साखर सांख्यिकी माहिती' या सदरात मागील दहा वर्षातील उस गळीत हंगामाविषयी व साखर उत्पादनाविषयी विभागनिहाय आणि कारखानानिहाय सांख्यिकीय माहिती, आलेखांसह देण्यात आलेली आहे. ऊस विकास योजने अंतर्गत केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार साखर कारखाने निहाय साखर निर्यात उद्दीष्ट आणि प्रत्यक्ष निर्यात केलेल्या साखरेचे प्रमाण (ला.मे.ट.) याची माहिती 'साखर आयात/ निर्यात' या विभागात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या विभागाशी संबंधीत विविध दस्तऐवज, जसे रंगराजन समितीचा अहवाल, थोरात समितीचा अहवाल, तुतेजा समितीचा अहवाल व महाजन समितीचा अहवाल 'समिती अहवाल' या भागात तर 'साखर वितरणाचे आदेश' या भागात वेळोवेळी पारीत केलेले साखर वितरणाचे आदेश पीडीएफ फॉरमॅट मध्ये उपलब्ध आहेत.

'साखर योजना' या भागात ऊसविकास योजनेची माहिती तर माहितीचा अधिकार अधिनियम २००५ साठीचे माहिती अधिकारी/ अपिलीय अधिकारी यांचे तपशील 'माहितीचा अधिकार' या भागात प्रसिद्ध केला आहे. सामान्य नागरिकांना या विभागाकडून देण्यात येणाऱ्या विविध सेवांबाबतची माहिती 'नागरिकांची सनद' या भागात तसेच एफआरपी म्हणजे काय? तो कसा परिगणित करतात?, हवाई अंतर प्रमाणपत्राबाबत माहिती, दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील साखर उद्योग व मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतील अंशदान याबद्दल माहिती 'संकीर्ण माहिती' या शिर्षकाखाली उपलब्ध करण्यात आलेली आहे.

सहकार कायद्यातील घटना दुरुस्ती, साखर कारखान्यांचा तपशील, नवीन उपक्रम, मंत्री समितीच्या बैठकीचे इतिवृत्त, साखरेचे सध्याचे आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत दर व पुरस्कार आणि कामगिरी ही माहिती 'इतर माहिती' या भागात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

वसंतदादा साखर संस्था (व्ही.एस.आय.), साखर संघ, मुंबई, राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ, भारतीय साखर कारखाने संघटना ISMA, व्हॅम्नीकॉम (VAMNICOM) आणि सहकारी साखर कारखान्यांचा राष्ट्रीय महासंघ (NFCSF) संस्थांच्या थोडक्यात माहितीसह त्या संस्थांच्या स्वतंत्र संकेतस्थळाची लींक 'संस्था' या भागात देण्यात आली आहे.

भारत सरकार, अन्न आणि सार्वजनिक वितरण विभाग आणि महाराष्ट्र शासन या संकेतस्थळाच्या लिंक 'महत्वाचे दुवे' या भागात देण्यात आलेल्या आहेत.

'जलद दूवे' या भागातील 'नकाशे आणि ठिकाणे' या भागात राज्याच्या नकाशावरून कोणत्याही जिल्ह्याच्या ठिकाणी क्लीक केल्यास त्या जिल्ह्याचा नकाशा दर्शविण्यात येतो. जिल्ह्याच्या नकाशावर त्या जिल्ह्यातील सहकारी आणि खासगी साखर कारखान्यांचे स्थळ दर्शविण्यात येते. संबंधीत स्थळावर क्लीक करून त्या साखर कारखान्याची मूलभूत माहिती छायाचित्रासह पाहाता येते. 'छायाचित्र दालन' या भागात छायाचित्रपुस्तक प्रदर्शित केलेली आहेत तर साखरेच्या निर्मिती बद्दल संपुर्ण माहिती व साखरेचे प्रकार ही माहिती 'साखरेविषयक माहिती' या भागात सचित्र देण्यात आली आहे.

'गाळप अहवाल' या भागात महिन्याची दिनदर्शिका देण्यात आली असून गाळप प्रक्रिया चालू असलेल्या दिनांकास हिरव्या रंगाने अधोरेखीत करण्यात आलेले आहे. त्या ठराविक दिनांकास क्लीक केल्यास त्या दिनांकाच्या गाळप प्रक्रियेची माहिती पीडीएफ फॉरमॅट मध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 'प्रदूषण नियंत्रण उपक्रम' या भागात साखर निर्मिती प्रक्रियेतून निर्माण होणारे सांडपाणी, वायु प्रदूषण आणि त्यावर शिफारसी यांची माहिती देण्यात आलेली आहे.

'ऑनलाईन गाऱ्हाणी' या भागात सर्वसामान्य नागरीकांची तक्रार नोंदविली जाते. त्यात तक्रारकर्त्याचा मोबाईल क्रमांक आणि ईमेल पत्ता स्वीकारण्यात येतो, ज्या आधारे तक्रारकर्त्यास संपर्क करून तक्रारनिवारण करण्यात येते तर 'अभिप्राय' या भागात याच पद्धतीने अभिप्राय नोंदविण्याची सोय करण्यात आलेली आहे. 'डाऊनलोड' या भागात अंतिम गाळप अहवाल व लेखा परीक्षण या सारख्या अनेक विषयांवरील दस्तावेजांची प्रत पीडीएफ फॉरमॅट मध्ये डाउनलोड करून घेता येते.

'आमच्या विषयी' या भागात संघटनेविषयी साखर आयुक्तांची विकासाभिमुख आणि नियामक भूमिका विस्तृत स्पष्ट करण्यात आलेली असून 'उप-उत्पादने' या भागात सह वीज निर्मिती माहितीसह राज्यातील सह वीज निर्मिती प्रकल्पांचा तपशील तसेच आसवनी, इथेनॉल, चिपाड, जैव मृदा या उप-उत्पादना विषयी माहिती देण्यात आलेली आहे. 'निविदा' या भागात या विभागातर्फे जाहीर केलेल्या सर्व निविदांची माहिती व निविदा सूचना दिनांक निहाय प्रदर्शित केलेली आहे. सामान्य नागरीकांना असणाऱ्या नेहमीच्या प्रश्नांची उत्तरे प्रश्नोत्तर स्वरूपात 'नेहमीचे प्रश्न' या भागात दिलेली आहेत तर प्रसार माध्यमातील वृत्त विविध कार्यक्रम यांची माहिती 'महत्वाचे कार्यक्रम' आणि 'अद्ययावत बातम्या' या शीर्षकाखाली उपलब्ध आहे.

साखर आयुक्त कार्यालयासंदर्भातील इत्यंभूत माहिती सोबतच राज्यातील २०९ साखर कारखान्यांची २३ भिन्न मापदंडानुसार माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध असून आजपर्यंत १२९८१६ अभ्यागतांनी या संकेतस्थळास भेट दिल्याची नोंद या संकेतस्थळावर झालेली आहे. या विभागातील सर्वच आवश्यक माहिती प्रदर्शित झाल्याने माहिती अधिकाराच्या अंतर्गत येणाऱ्या अर्जात लक्षणीय घट झाली आहे. साखर आयुक्तांना साखर कारखान्यांवर नियंत्रण करण्यास उपयुक्त असे विविध प्रकारचे व्यवस्थापन अहवाल या प्रणालीतून प्राप्त होतात तसेच साखरकारखान्यांची कार्यक्षमता दर्शिविणारे अनेक प्रकारचे अहवाल तयार करण्यात येतात.


लेखक : - सुनिल पोटेकर

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate