इंटरनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व स्वयंसहाय्यता बचत गटांची माहिती, त्यांचे कार्य व व्यवसाय तसेच त्यांची एकूण वाटचाल यांची परस्पर देवाणघेवाण व्हावी, व त्या अनुषंगाने बचतगटांच्या चळवळीच्या वाढीसाठी संपूर्ण जगाचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे या महत्वाकांक्षी विचारातून कोल्हापूर जिल्हापरिषदेने जिल्ह्यातील सर्व बचतगटांची ऑनलाईन जोडणी करण्याचा अभिनव उपक्रम हाती घेतलेला आहे. या उपक्रमांतर्गंत जिल्ह्यातील सर्व बचत गटांनी ऑनलाईन बांधणी करण्याची प्रक्रिया जिल्ह्यात सुरु असून जिल्हा ते ग्रामस्तर अशी बचतगटांची जोडणी अंतिम टप्प्यात आली आहे.
अलिकडच्या काळात कोल्हापूर जिल्ह्याची बचतगट चळवळीमुळे राज्यात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. या चळवळीने ग्रामीण भागातील प्रगतशील विशेषत: महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची भूमिका बजावलेली आहे. जिल्ह्यात एकूण 42 हजार 698 बचतगटांनी नोंदणी असून या बचतगटांच्या माध्यमातून विशेषत: महिलांना आत्मविश्वास, आत्मनिर्भयता, आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी शासन प्रयत्न करीत आहे. त्यासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील सर्व महिला स्वयंसहाय्यता बचतगटांच्या सक्षमीकरणाचे धोरण स्विकारले आहे. या धोरणाअंतर्गंत जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यात महिला बचतगटांची पुणर्बांधणी करणे, त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देणे, व त्या अनुषंगाने आर्थिकदृष्ट्या बचत गटांना सक्षम करणे हा जिल्हा परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.
तथापि महिला बचतगटाच्या मजबूतीकरणाबरोबरच जिल्ह्यातील सर्व बचतगटांना व्यावसायाभिमुखतेच्या दृष्टीने इंटरनेटसारख्या अत्याधुनिक प्रसार माध्यमाची जोड उपलब्ध करुन देणेही तितकेच महत्वाचे आहे हे लक्षात घेवून जिल्हा परिषदेच्यावतीने जिल्ह्यातील सर्व बचतगटांची ऑनलाईन जोडणी करण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. त्यानुसार या उपक्रमांतर्गंत जिल्हा परिषदेने www.mahilasakshamikarankop.com या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे.
या संकेतस्थळावर लॉगीन करण्यासाठी बचतगटांना तालुका व ग्रामपातळीवर युजरनेम व पासवर्ड देण्यात आला असून त्यानुसार बचतगटांची संपूर्ण माहिती भरुन घेण्याचे काम सुरु आहे. एप्रिलपासून सुरु झालेली ही प्रक्रिया सध्या अंतिम टप्प्यात सुरु आहे. या माहितीत बचतगटाचे नाव, बचत गटाचे कार्य,त्यांना पुरविल्या जाणाऱ्या सुविधा, बचतगटाला दिलेले कर्ज, बचतगटाची व्यक्तीगत माहिती, मार्गदर्शन आदी बाबींचा समावेश आहे. याशिवाय ग्रामीण भागातील बचतगटांच्या प्रगतीचा दैनंदिन अहवाल डाटा अपडेट करण्याच्या सुचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कार्यालयात जिल्ह्यातील बचतगटांचा डाटा एकत्रित करुन ही सर्व माहिती संकेतस्थळावर अपलोड केली जात आहे. याशिवाय या संकेतस्थळावर विविध योजनांची, शासनाच्या अध्यादेश यांची माहितीही अपलोड करण्यात आली आहे. एकूणच इंटरनेटच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व बचतगटांची माहिती, त्यांचे कार्य, योजना, व्यवसाय, आर्थिक फायदा या सर्वांची माहिती आता आपणास सहज उपलब्ध होणार आहे. बचतगटांच्या ऑनलाईन जोडणीमुळे जिल्ह्यातील बचतगटांना आधुनिकतेचे स्वरुप प्राप्त झाले असून बचतगटांच्या सक्षमीकरणासाठी ही बाब नक्कीच उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळेच पुणे विभागीय आयुक्तांनी जिल्हा परिषदेच्या या अभिनव उपक्रमाच्या कार्याची दखल घेऊन असा उपक्रम राज्यभर राबवावा अशी शिफारस केली आहे.
स्त्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 8/2/2020
रत्नागिरी जिल्ह्यात सह्याद्रीच्या रांगेत वसलेले मु...
खातेदार किंवा गिऱ्हाईक हे कर्ज घेण्यासाठी नेहमीच इ...
टसर कोषाचे उत्पादन हे अतिशय कष्टाचे आणि जोखमीचे का...
दारिद्रयाचे दुष्टचक्र नष्ट करण्यासाठी आपणास एका पर...