অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

ई-रिक्रुटमेन्ट

ई-रिक्रुटमेन्ट

राज्य शासनाच्या दुय्यम सेवेतील गट “क”वर्गीय पदांवरील उमेदवारांची निवड करण्यासाठी जिल्हास्तरीय पदांकरिता जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती कार्यरत असते. याअंतर्गत जिल्हा स्तरावर भरती प्रक्रियेसाठी राज्य शासनाने कालबद्ध कार्यक्रम आखून दिलेला आहे आणि त्यासाठीची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे.
जिल्ह्यात दरवर्षी विविध रिक्त पदानुसार जिल्हा निवड समितीद्वारे भरती प्रक्रिया केली जाते. त्याअंतर्गत हजारोच्या संख्येने अर्ज जिल्हा प्रशसानाकडे येत असतात. भरतीपुर्व कार्यपद्धतीत पदांची जाहीरात प्रसिद्ध करणे, अर्जांची स्वीकृती, छाननी, शासकिय आरक्षण नियमाप्रमाणे पात्र/अपात्र निवड व परिक्षा शुल्काचा ताळेबंद ही अत्यंत किचकट आणि वेळखाउ कामे समाविष्ट असतात. परिक्षेची प्रश्नपत्रिका बनविणे आणि छपाई यासोबतच प्रत्यक्ष परिक्षा घेण्याच्या प्रक्रियेत उमेदवारंच्या संख्येनुसार परिक्षाकेंद्रांचे नियोजन, पात्र उमेदवारांना वेळेत प्रवेशपत्र वाटप करणे तसेच परिक्षेसाठीचे मनुष्यबळ नियुक्ति ह्या बाबींचा समावेष असतो. परिक्षेनंतर उत्तरपत्रिका तपासणी आणि वेळेत निकाल लावण्यासोबतच आवश्यक त्या पदासाठी मुलाखती नंतर अंतिम निवडयादी आणि प्रतिक्षायादी तयार केल्यानंतर भरती प्रक्रिया पुर्ण होते.
जिल्हा प्रशासनावर अनेकवेळा या प्रक्रियेत दोषारोप ठेवले जातात आणि सामान्य नागरिक भरतीप्रक्रियेकडे साशंक नजरेने पाहात असतो. भरती प्रक्रियेतील महत्वाच्या टप्प्यांवर प्रशासनाला माहिती व तंत्रज्ञानाची भक्कम साथ मिळालीतर ही सर्व प्रक्रिया जलदगतीने आणि जास्तीतजास्त पारदर्शक होवू शकते हे नांदेड जिल्हा प्रशासनाने सन-२०१३ भरती प्रक्रियेतून सिद्ध केले आहे. यासाठी स्थानिक पातळीवर टेक-ओएमआर या संस्थेकडून ऑनलाईन संगणक प्रणाली विकसित करण्यात आली. सदर प्रणाली http://nanded.apply2013.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
जिल्हा निवड समिती मार्फत घेण्यात येणार्‍या भरती प्रक्रियीतील अनेक टप्प्यातील कार्यपद्धतीचे स्वयंचलन शक्य झाल्यामूळे जिल्हा प्रशासनाला कमीतकमी मनुष्यबळाचा आणि साधनसंपत्तीचा वापर करून संपुर्ण प्रक्रिया जलदगतीने पारदर्शक करण्यात यश आले आहे.
याप्रणालीमध्ये अर्जदारांच्या सोयीचा प्रामुख्याने विचार करून भरतीची जाहीरात प्रसिद्ध झाल्या पासून ठरावीक मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्विकारण्याची सुविधा देण्यात आली आहे. अर्जदाराने संबंधित पदासाठीची माहिती भरतांनाच आवश्यक कागदपत्रांची माहिती अर्जामध्‍ये नमूद करावयाची आहेत, अर्जदार अपात्र असेल तर त्याचा अर्ज दाखल करतांनाच त्याला त्याबद्दल माहिती मिळते आणि त्याचा अर्ज दाखल करण्यात येत नाही. ऑनलाईन छाननी करून फक्त पात्र उमेदवारंचे अर्ज प्रणालीत स्विकारण्यात येत असल्यामूळे छाननीसाठी लागणारा स्वतंत्र वेळ आणि मनुष्यबळाची बचत झाली आहे. तसेच ऑनलाईन असल्यामूळे ही प्रक्रिया पारदर्शक झाली आहे. अपात्र उमेदवारांचे अर्जाचे कागदपत्र, संचिका जतन करणे आणि त्यांचे परिक्षा शुल्काचे धनाकर्ष बँकेत जमा करून घेणे काम राहीले नाही. जे अर्जदार संकेतस्थळावर अर्ज भरल्यानंतर निघालेल्या चालानद्वारे नेमून दिलेल्या बँकेमध्ये रक्कम विहित वेळेत रक्कम भरतात अशा उमेदवारांना पात्र करण्यात येऊन सदर रक्कम न भरणा-या अर्जदारांना अपात्र करण्‍यात येऊन त्‍यांची नावे अपात्र यादीत संकेतस्‍थळावर प्रसिद्ध करण्‍यात येतात. पात्र उमेदवारांचे परिक्षा शुल्क बॅंकेत चालानच्‍या माध्यमातून परस्पर जिल्हा निवड समितीच्या खात्यावर जमा होते त्यामूळे डीमांड ड्राफ्ट फाटणे, गहाळ होणे किंवा कालबाह्य होण्याचा धोका राहिलेला नाही.
ऑनलाईन अर्ज कसा भरावा यासाठी जिल्हा प्रशासनाने भरतीच्या कालावधीत हेल्पलाईन उपलब्ध करून दिली होती. तसेच याच संकेतस्थळावर एक ट्युटर कार्यान्वीत केले आहे. पात्र उमेदवारांना याच प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने परिक्षा केंद्र आणि परीक्षा क्रमांक देण्यात येऊन प्रवेशपत्र उपलब्ध होते.
या प्रणालीत एस.एम.एस. गेटवेचा अंतर्भाव असून ऑनलाईन अर्जस्विकारताना साठवीलेल्या अर्जदाराच्या मोबाईल क्रमांकावर महत्वाच्या सूचना पाठवून अर्जदारास भरती प्रक्रीयेसंबंधी विविध नवीन माहिती जसे, तो पात्र ठरला असल्‍याचे कळविणे, लेखी परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन उपलब्‍ध झाल्‍याचे कळविणे, शक्‍य होते.
लेखी परिक्षा ओ.एम.आर. उत्तरपत्रिकेवर घेण्यात आल्या आणि या संगणक प्रणालीच्या एका स्वतंत्र स्वयंपुर्ण भागातून ओ.एम.आर. स्कॅनरद्वारे तपासण्यात आल्या. निकालाची प्रक्रिया संपुर्ण स्वयंचलीत असून आरक्षणाप्रमाणे स्वतंत्र निवडयादी आणि प्रतिक्षायादी तयार होते.
या संकेतस्थळाच्या मुखपृष्ठावर “महत्वाच्या लिंक्स”, “प्रश्नपत्रिका व उत्तरे”, “परिक्षा शुल्क” आणि “भरती प्रक्रियेचे वेळापत्रक” हे चार विभाग आहेत. महत्वाच्या लिंक्समध्ये पदाची जाहिरात, अर्ज कसा करावा आणि अर्जाची पात्रता या माहितीशिवाय जिल्हा प्रशासनातर्फे भरती संबंधी वेळोवेळी देण्यात येणार्‍या सूचना, जसे कागदपत्र तपासणीसाठी पात्र उमेदवारांची यादी, गुणांची यादी, मुलाखतीबाबत सूचना, अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी तसेच पदस्थापना, ही माहिती प्रसिद्ध केली जाते. प्रश्नपत्रिका व उत्तरांच्या विभागात लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका आणि त्याचे बरोबर उत्तरे लेखी परिक्षेच्या दिवशी परिक्षा संपल्यावर प्रसिद्ध केली जातात. भरती प्रक्रियेचे वेळापत्रक महत्वाच्या दिनांकासह ठळकपणे प्रसिद्ध केले जाते. अर्ज सादर करणे, चालन प्रिंट करणे, पोचपावती, प्रवेशपत्र आणि निकाल यासाठी स्वतंत्र विभाग केलेले आहेत.
नांदेड जिल्हा प्रशासनाने जानेवारी २०१३ मध्ये तलाठी आणि लिपिक संवर्गातील पदासाठी या प्रणालीचा प्रथम उपयोग करून १६४८२ अर्जांचे परीक्षा केंद्र निश्चित करणे आणि प्रवेशपत्र उपलब्ध करण्याची प्रक्रिया केवळ २४ तासात एकही तक्रार न येता पूर्ण केली तर पाचव्या दिवशी परिक्षा घेवून सहाव्या दिवशी निकाल प्रसिद्ध केला. या सर्व प्रक्रियेत प्रत्यक्ष परिक्षेच्या दिवशीचे मनुष्यबळ वगळता केवळ चार शासकिय कर्मचार्‍यांचा सहभाग होता.
लेखक : सुनिल पोटेकर

स्त्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 1/28/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate