राज्यातील वापरायोग्य पाण्याची उपलब्धता मर्यादित असून गरजेपेक्षा कमी आहे. वाढती लोकसंख्या, वाढते उद्योग व अनियमित पर्जन्यमान यामुळे भविष्यात उपलब्ध पाणी साठ्यावरील ताण आणखी वाढणार आहे. उपलब्ध पाणी, नागरिकांना त्यांच्या गरजेच्या प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी पाण्याचा वापर अत्यंत काटेकोरपणे व नियोजनपूर्वक करण्याची आवश्यकता आहे. यासाठी समाजात जलजागृती व जलसाक्षरता निर्माण होण्याची गरज आहे. मागील काळात राज्यात राबविलेल्या जलजागृती सप्ताहास जनतेचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या प्रतिसादाची दखल घेऊन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 2016 सालच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यात कायमस्वरुपी जलसाक्षरता केंद्र निर्माण करण्याची घोषणा केली होती. जलसाक्षरता केंद्राची रचना व कार्यपद्धती पुढीलप्रमाणे आहे.
संकल्पना :-
पाण्यासंबंधी काम करणाऱ्या शासकीय विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी आणि पाण्याचा वापर नियोजनपूर्वक, काटकसरीने करण्यासाठी जनतेचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे. यासाठी राज्यात कायमस्वरुपी जलजागृती अभियान राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. जलजागृतीसाठी विविध उपक्रम तयार करणे व ते जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था जलसाक्षरता केंद्रामध्ये करण्यात येईल. जलजागृती उपक्रम जनतेपर्यत पोहोचविण्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तर व ग्रामस्तरावर अनुक्रमे जलनायक, जलकर्मी व जलसेवक अशा उत्स्फूर्त स्वयंसेवकांची संरचनात्मक शृंखला निर्माण करण्यात येणार आहे. राज्यामध्ये राबवल्या जाणाऱ्या जलसाक्षरता उपक्रमांमध्ये समन्वय व सुसंगतपणा ठेवण्यासाठी राज्यस्तर, जिल्हास्तर, तालुकास्तरावर समन्वय समित्या निर्माण करुन त्यांच्याद्वारे जलसाक्षरतेचा कार्यक्रम राज्यात कायमस्वरुपी राबविला जाईल. यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा) पुणे येथे कायमस्वरुपी मुख्य जलसाक्षरता केंद्र आणि वन अकादमी-चंद्रपूर, जल व भूमी व्यवस्थापन संस्था (वाल्मी)-औरंगाबाद व डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ विकास प्रशासकीय प्रशिक्षण प्रबोधिनी - अमरावती येथे विभागीय केंद्र स्थापन करण्यात येणार आहे.
जलसाक्षरता केंद्राची कार्यकक्षा व कार्यपद्धती :
जलसाक्षरता केंद्रामार्फत प्रशिक्षण, संशोधन व प्रलेखन तसेच अनुषंगिक सहाय्यकारी कामे करण्यात येतील. यामध्ये जलसाक्षरतेचा पाच वर्षाचा व वार्षिक प्रशिक्षण आराखडा, जलसाक्षरता विषयक प्रशिक्षणाच्या गरजांची निश्चिती करणे, प्रशिक्षणासाठी विविध मोड्यूल निश्चित करणे, विविध स्तरांवरील जलनायकांची निवड करणे, विविध पाणी वापरकर्ते/लाभाधारक/जलनायक/जलकर्मी/जलसेवक यांना प्रशिक्षण देणे, विभागीय प्रशिक्षणाचे नियोजन करणे व मार्गदर्शन करणे, जलसाक्षरतेबाबत राज्यात कार्यशाळा आयोजित करणे व मार्गदर्शन करणे.
संशोधन व प्रलेखन :-
राज्यातील पूर्ण झालेले व बांधकामाधिन प्रकल्पांचे जलसाठे, जलसंधारणाची कामे, सिंचन प्रकल्प, लोकसहभागातून पूर्ण झालेल्या योजना व त्याचा जनमाणसावर झालेला परिणाम, पाण्याचे प्रदूषण व उपाययोजना, पाण्याचा पुनर्वापर याबाबत संदर्भ साहित्य निर्माण करणे. जनतेला ते सहजपणे उपलब्ध करून देणे, त्यासाठी संकेतस्थळ निर्माण करणे.
जलसाक्षरता प्रसार व प्रसिद्धी:-
राज्यात जलसाक्षरता व जलजागृती निर्माण करण्यासाठी प्रसार व प्रसिद्धीचे धोरण तयार करणे, त्यासाठी साहित्य निर्मिती करणे. शासनाच्या धोरणानुसार राज्यात जलजागृती सप्ताह राबविण्यासाठी प्रशिक्षण देणे व त्यासाठी आवश्यक साहित्याची निर्मिती करणे.
जलसाक्षता केंद्राची संरचना :-
यशदा, पुणे येथे राज्यस्तरीय जलसाक्षरता केंद्राचे प्रमुख म्हणून संचालक नियुक्त करण्यात येणार आहे. त्यांच्यासोबत सहयोगी/सहाय्यक प्राध्यापक, कार्यकारी संचालक, सहाय्यक प्राध्यापक/ सहयोगी प्राध्यापक, संशोधन अधिकारी नियुक्त करण्यात येणार. विभागीय जलसाक्षरता केंद्रामध्ये विभागीय संचालक व इतर अधिकारी नियुक्त करण्यात येतील.
जलसाक्षरता, जलजागृतीचा उपक्रम लोकसहभागातून व स्वयंस्फूर्तीने पुढे येणाऱ्या स्वयंसेवकाद्वारे राबविण्याचे शासानाचे धोरण आहे. त्यासाठी जलसेवक, जलनायक, जलकर्मी यांची संरचनात्मकफळी निर्माण करण्यात येणार आहे.
ग्रामस्तर व स्थानिक संस्थास्तरावर जलसाक्षरतेचे काम करणाऱ्या प्रशिक्षीत व्यक्तीस ‘जलसेवक’ असे संबोधण्यात येईल. प्रत्येक ग्रामपंचायतस्तरावर एक जलसेवक असेल. पाण्याबाबतचे उपक्रम राबविणारे, शासनाच्या तसेच शासनास सहाय्यकारी संस्थातील विविध विभागांचे, जनतेशी थेट संपर्क असणारे प्रशिक्षीत क्षेत्रिय कर्मचारी/अधिकारी यांना ‘जलकर्मी’ असे संबोधण्यात येणार आहे. विविधस्तरांवर प्रशिक्षण देण्याचा व जलक्षेत्रातील कामाचा अनुभव असणाऱ्या प्रशिक्षकांना ‘जलनायक’ असे संबोधण्यात येणार आहे. जलसेवक, जलकर्मी व जलनायक यांच्या निवडीचे निष्कर्ष, त्यांची संख्या व कार्यपद्धती याबाबत यशदा, पुणे मार्फत वेळोवेळी मार्गदर्शक सूचना देण्यात येणार आहेत.
राज्यात जलजागृती निर्माण करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांचे समन्वय करण्यासाठी प्रधान सचिव (जलसंपदा) यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय जलसाक्षरता समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत विविध विभागातील जलसाक्षरतेबाबतचे विषय, धोरण व अडचणींवर निर्णय घेण्यात येईल. जलसाक्षरतेबाबतची प्रचार व प्रसिद्धीसाठी माध्यमे व धोरण समितीमार्फत ठरविण्यात येणार आहे.
जलजागृती व जलसाक्षरतेचे उत्कृष्ट काम करणाऱ्या जलनायक, जलकर्मी व जलसेवकांचा दरवर्षी गौरव करण्यात येणार आहे. 6 ऑगस्ट,2017 रोजी यशदा येथील जलसाक्षरता केंद्राचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते झाले. आपल्या समाजाची मानसिकता ही उत्सवी आहे. हा उत्सवाचा उत्साह चिरकाल टिकण्यासाठी त्याला संस्थात्मक स्वरुप देणे आवश्यक होते. जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून राज्यभर सुरु असणारा जलोत्सवाचा जागर चिरकाल टिकेल, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. जलसाक्षरता केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र दुष्काळमुक्त व जलयुक्त होण्यास मदत होणार असल्याचे मुयमंत्री यावेळी म्हणाले.
जलसाक्षरता केंद्र जलजागृतीचा स्रोत म्हणून भविष्यात नावारुपाला येईल एवढे नक्की !
लेखक: जयंत कर्पे
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/4/2020