नैसर्गिक रित्या मोहाची झाडे जंगलात उगवत असत. कोणत्याही प्रकारच्या मातीत मोह उगवतो. वाळूमिश्रित पोयटा मातीत मात्र तो अधिक जोमदारपणे वाढतो. पठार, माळरान, गाळाच्या व चिकण मातीतही मोह वाढतो.
मोहाची झाडे बियांपासून निर्माण केली जातात. मातीखाली झाकलेल्या बिया पावसाळ्यात उगवतात. रोपांची वाढ खूप संथ असते. बियांची उगवण क्षमता खूप मंद असते. बिया उगवल्यावर पहिल्या वर्षात रोप ८ सेंटीमीटर वाढते. दुसर्या वर्षात ते फक्त १ फुट उंच होते. चौथ्या वर्षी ४ फुट उंच होते. तीस वर्षात त्याची उंची ३० फुट होते. त्याचा घेर २० इंच होतो.
मोहाच्या मूळ्या जमिनीलगत जास्त पसरतात. ते थंडी व उष्णता सहन करू शकते. पाण्याच्या दुष्काळात ही झाडे वाढतात. मात्र दुष्काळ खूप तीव्र असला आणि लांबला तर मात्र मोहाचे झाड मरते. दात गवतात व झुडुपात उगवलेले मोहाचे रोपही कालांतराने मरते. कारण त्याचे पोषण नीट होत नाही. त्याचे अन्न आणि पाणी चिवट गवत व झुडुपे हडप करतात, मोहाच्या रोपांना अन्न- पाणी मिळू देत नाहीत. म्हणून रोपे मरतात. कोंब फुटलेल्या मोहाच्या बियांवर किडे-कीटक व बुरशीजन्य जंतू हल्ला करतात. त्यामुळे रोपांचा नाश होतो. वन्य प्राणी, पाळीव गुरे मोहाची रोपे खातात, जंगलात वणवे लागतात, त्यात रोपांचा नाश होतो.
जंगलात मोहाची झाडे नैसर्गिकरित्या उगवून त्यांची वाढ होते. आदिवासींना आर्थिक स्थैर्य देणारा मोह हा महत्वाचा वृक्ष आहे. म्हणून त्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्याची योजना राष्ट्रीय शेती विकास समितीने आखली होती त्यानुसार १९७६ साली रस्ते, कालवे यांच्या कडेने मोहाची झाडे लावण्यास प्रारंभ झाला. व्यापारी दृष्ट्या मोहाची झाडे लावण्यास प्रारंभ झाला. व्यापारीदृष्ट्या मोहाची झाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला. आदिवासी भागात मोहाची लागवड करण्याच्या दृष्टीने सामाजिक वनीकरण खात्यास खूप वाव आहे. परंतु हळू वाढणारा वृक्ष म्हणून मोहाकडे आपले दुर्लक्ष झाले आहे. जलद गतीने वाढणाया निलगिरी, सुबाभूळ व ऑस्ट्रेलियन बाभूळ या झाडांकडेच जास्त लक्ष दिले आहे. मोह संथ गतीने वाढत असला तरी दीर्घ काळ तो उत्पन्न देतो. म्हणूनच ब्रिटीश काळात बहुविध उपयोगी मोहाच्या झाडांची लागवड करण्यात आली. आज जी मोहाची झाडे भारतात आढळतात ती ब्रिटीश काळात लावण्यात आलेली आहेत. सामाजिक वनीकरण खात्याने खेडयापाडयांत मोहाच्या झाडांच्या रोपवाटीका उभारून मोठया प्रमाणात मोहाची झाडे लावली पाहिजेत. शिवाय आदीवासींना रोपांचा पुरवठा केला पाहिजे.
मोहाची रोपे तयार करण्यासाठी बियांचा उपयोग करणे सोपे असते. मोहाची फांदी लावून किंवा कलम करून रोप लागवड यशस्वी होत नाही. फांदीवर डोळा भरून रोपांची लागवड श्रीलंकेत यशस्वी झाली आहे. एक वर्षाच्या रोपांपासून स्टंप तयार केले जातात. त्यात रोपे जगण्याचे प्रमाण जास्त असते.
मोठया प्रमाणात रोपे हवी असल्यास मोहाचे बी पेरूनच रोपे तयार करणे योग्य ठरते. सामान्य शेतकरी आदीवासींना बियांपासून रोपे तयार करणे सहज शक्य असते. रानावनात फिरणारे आदीवासी मोहाच्या बिया गोळा करतात. त्यांच्याकडून बिया विकत घ्याव्यात. त्याचा साठा कोरडया जागी करावा. प्रत्येक बी मध्ये कमी जास्त प्रमाणात तेल असते. त्यानुसार त्या कमी जास्त दिवस टिकतात. बियांना बुरशी व कीड लागण्याची शक्यता असते. बियांचा रंग बदलायला लागला की बियांना बुरशीची सुरूवात झाली असे समजावे. म्हणून बिया अधिक काळ न ठेवता त्या लगेच लावणे उत्तम. प्रथम गादीवाफे तयार करावेत. मातीत 2 सेंटिमीटर खोल बिया गाडाव्यात. बिया लावल्यावर लगेच पाणी द्यावे. दहा दिवसांनी बियांना अंकूर फुटतात. टोपल्या, पॉलिथिनच्या बंद पिशव्या व कुंडयातही बिया लावून रोपे तयार करता येतात. रोप एक महिन्याचे झाल्यावर गादीवाफ्यातून काढून ते पॉलिथिन बॅग व कुंडयांत लावावे. त्यात माती, वाळू व सेंद्रीय खत ३ : २ : १ या प्रमाणात भरावे.
ज्या जमिनीत रोपे लावायची त्या जमिनीची प्रथम पाहणी करावी. मोहाच्या झाडास तशी कुठलीही जमीन चालते. उजाड जमिनीच्या हरितीकरणासाठी मोहाची झाडे खूप उपयुक्त आहेत. कडक उष्णता असलेल्या डोंगरी भागात मात्र मोहाची रोपे लावू नयेत. कारण त्यांची मुळे जमिनीच्या पृष्ठभागालगत पसरतात. त्या मुळांना अतिउष्णता सहन होत नाही. त्यामुळे मुळांना धक्का बसून रोपे मरण्याची शक्यता जास्त असते. रोपांना हवेतला कोरडेपणा व धुके सहन होत नाही. रोप वाढल्यावर थंडी व उष्णता सहन करण्याची त्याची ताकद वाढते. परंतु रोप लहान असताना त्यांना खुप थंडी व खुप उष्णता सहन होत नाही. म्हणून रोपे लावताना मोठी वाढलेली रोपे लावणे चांगले.
मोहाचे रोप लावण्यासाठी 2 फूट खोल, 2 फूट रूंद व 2 फूट लांब खडडा खणावा. दोन खडडयांत 10 मिटर अंतर असावे. जमिनीच्या कठिणपणानुसार खडडे कमी-जास्त खोल खणावेत. तसेच जमिनीच्या उपलब्धतेनुसार दोन झाडांत कमी-जास्त अंतर राखावे. खड्डे खणताना भोवतालची झुडूपे काढून टाकावी. जमीन स्वच्छ करावी. खड्डयात वाळूमिश्रीत माती, पालापाचोळा व शेणखत भरावे. त्याचे प्रमाण ३ : २ : १ असे ठेवावे. रोप लावल्यावर त्याला पाणी द्यावे. त्याच्या योग्य वाढीसाठी योग्य अंतराने पाणी देत जावे. खड्डयाभोवती तण उगवले तर दोन वर्ष ते ठेवायला हरकत नाही. कारण उन्हाळयात रोपांना गारवा मिळतो. खड्डयातले तण मात्र काढावे. खुरपणी करून माती ढिली करावी. म्हणजे मुळांना हवा मिळते, मुळे कुजत नाहीत.
मोहाची झाडे एका रांगेत किंवा गटवार पध्दतीने लावता येतात. जमिनीच्या मगदुरानुसार ४५ x ६०x ३० सेंटीमिटर खड्डे रांगेत घ्यावेत. त्यात ४-५ बिया लावू शकता. अथवा रोपवाटिकेत वाढलेली रोपेही लावू शकता. दोन झाडांच्या खडडयात जागेच्या उपलब्धतेनुसार अंतर सोडावे. अंतर ८ मीटरपेक्षा कमी नसावे.
इतर झाडांच्या बरोबर मोहाची झाडे मिश्र लागवड करून लावता येतात. निलगीरी बरोबर मोहाची लागवड खूपच फायदेशीर ठरते. अडीच एकरांत मोहाची 100 झाडे लावता येतात. निलगीरीची 1500 झाडे लावता येतात. अडीच एकरांत मोह आणि निलगिरीची मिश्र लागवड केल्यास शेतकरी व आदिवासींन चांगले उत्पन्न मिळते. आठव्या वर्षी निलगिरी पासून २० हजारांचे उत्पन्न मिळते. सोळाव्या वर्षी १० हजार उत्पन्न मिळते. निलगिरीचे वर्षातून दोन वेळा उत्त्पन्न घेता येते. मोहाचे झाड दहाव्या वर्षापासून उत्पन्न द्यायला सुरवात करते. मोहाच्या झाडाची फळे, फुले, पाने, बिया आणि लाकूड हे सर्व भाग विकले जातात. याशिवाय बियांपासून तेल निघते. त्यांचेही चांगले उत्पन्न येते. मोहाची झाडे दीर्घायुषी आहेत. काही झाडे १०० वर्षापर्यंत जगतात. मोहाचे सरासरी आयुष्य आपण ६० वर्षे धरले तरी मोहाचे एक झाड आपल्या आयुष्यात सर्व मिळून दीड ते दोन लाख रुपयांचे उत्पन्न देऊ शकते.
मोहाची झाडे वाढेपर्यंत रोपांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यांच्या वाढीसाठी वेळेवर पाणी घालणे महत्वाचे आहे. ऑक्टोबर ते नोव्हेंबर या काळात दर १५ दिवसांनी पाणी द्यावे. एका झाडास साधारण एक बादली पाणी (१५ लिटर) पुरेसे होते. पाणी सकाळी व संध्याकाळी घालावे. पावसाळ्यात झाडाला पाणी देण्याची आवश्यकता नसते. परंतु १० दिवस पाऊस पडला नाही तर पाणी घालावे.
मोहांच्या रोपांवर अनेक प्रकारचे रोग पडतात, कीड लागते. पानांवर पडणारे काळे डाग हे कोणत्यातरी रोगाचे लक्षण असते. लारवा या आळ्या झाडांची पाने खातात. फुले व पानांना कीड लागली की त्यांची वळकुटी होते. बिया व फळांना बुरशी (फंगस ) लागते. फंगी झाड पोखरतात. पोखरलेले झाड खाली कोसळते. रोपवाटीकेतील रोपांवर व लागवड केलेल्या रोपांवर ‘लीफ रस्ट’ (Leaf Rust) व करपा हे रोग पडतात. हे रोग रोपांना नाश करणारे अति धोकादायक आहेत. कीड व रोग पसरू नये यासाठी वेळोवेळी रोग व कीड प्रतिबंधक औषधे फवारावीत. बांडगुळामुळेही (पॅरासाईटस्) मोहाचे खूप नुकसान होते.
माहिती लेखन : वनराई संस्था
अंतिम सुधारित : 6/25/2020
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...