कोणत्याही शेतीपूरक व्यवसायाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि बाजारपेठेची माहिती असेल, तर तो व्यवसाय निश्चितपणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरतो. असाच काहीसा अनुभव नागपूर येथील सहेजादखान पठाण यांचा आहे. नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयात कुक्कुटपालनाचे प्रशिक्षण आणि नागपूर परिसरातील बाजारपेठेचा अभ्यास करून त्यांनी आता कुक्कुटपालनात चांगला जम बसविला आहे.
डॉ. मुकुंद कदमनागपूर येथील जाफरनगर येथील सहेजादखान पठाण यांनी बारावी पास झाल्यानंतर आयटीआय डिप्लोमा कोर्स केला; परंतु बराच काळ प्रयत्न करून म्हणावी तशी नोकरी मिळाली नाही, त्यामुळे नोकरीऐवजी काही स्वयंरोजगार करता येईल का, याची चर्चा मित्रांच्या बरोबरीने सुरू केली. या चर्चेमध्येच त्यांना नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या कुक्कुटपालनाच्या विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या मांसल कोंबडीपालन प्रशिक्षणासंबंधी माहिती मिळाली. येथील तज्ज्ञांशी चर्चा करून सन 2011 मध्ये अल्प मुदतीचे मांसल कोंबडीपालन प्रशिक्षण पूर्ण केले. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून पक्ष्यांच्या जाती, पक्ष्यांचे आरोग्य व्यवस्थापन, लसीकरण, खाद्य व्यवस्थापनाची तांत्रिक माहिती मिळाली. याच बरोबरीने कुक्कुटपालनासाठी बॅंक तसेच सरकारी योजनांची माहिती मिळाली. या प्रशिक्षणातून सहेजादखान पठाण यांच्या मनात पोल्ट्री व्यवसायाबद्दलची अधिक उत्कंठा निर्माण झाली. पोल्ट्री फार्म सुरू करण्यापूर्वी त्यांनी नागपूर शहरालगतचे सर्व कोंबडी फार्म पिंजून काढले. लोकांशी व्यवसायाच्या आर्थिक गणिताबाबत चर्चा केली. त्यानंतरच स्वतःचा पोल्ट्री फार्म सुरू करण्याचा निर्णय घेतला.
1) स्वतःची जमीन नसल्याने सहेजादखान पठाण यांना पोल्ट्री फार्म सुरू करण्यामध्ये अडचण होती; परंतु नोकरीऐवजी स्वतःचा उद्योग सुरू करण्याचा निर्णय पक्का असल्याने त्यांनी पहिल्यांदा कोंबडी विक्रीचा व्यवसाय करण्याचे ठरवले. त्यासाठी नागपूर शहरात नातेवाइकांच्या जागेवर कोंबडी विक्रीचे लहानसे दुकान सुरू केले. यामुळे कोंबडी खरेदी-विक्रीचा अंदाज आला. यातील आर्थिक व्यवहार कळाला. ग्राहकाला किती वजनाची कोंबडी लागते, नेमक्या कोणत्या महिन्यात मागणी असते हे समजले. पोल्ट्रीमध्ये पक्ष्यांचे व्यवस्थापन कसे केले जाते हेसुद्धा लोकांच्या चर्चेतून समजले.
2) पहिले सहा महिने जवळपासच्या पोल्ट्री फार्ममधून कोंबड्यांची खरेदी करून दुकानात विक्री सुरू केली.
3) याचदरम्यान मित्रांच्या कडून नागपूरपासून 12 किलोमीटर अंतरावरील गोमतळा गावात एक पोल्ट्री फार्म रिकामा असल्याचे समजले. त्या मालकाशी चर्चा करून दरमहा आठ हजार रूपये भाडे तत्त्वावर पोल्ट्री फार्म चालवण्यास घेतला. कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये सहेजादखान पठाण यांना दोन्ही भाऊ आणि वडिलांची चांगली मदत मिळते.
पक्ष्याच्या खाद्य व्यवस्थापनाबाबत सहेजादखान म्हणाले, की खाद्य घटकात ज्याने बचत केली तो या व्यवसायात नफा कमवितो. खाद्य हा मांसल कोंबडीपालनातील महत्त्वाचा घटक असल्यामुळे खाद्य गुणवत्तेमध्ये कुठल्या प्रकारची कमतरता पक्ष्यांची वाढ खुंटवण्यास कारणीभूत ठरू शकते. खाद्य आणि आरोग्य व्यवस्थापनासाठी तज्ज्ञांचा सातत्याने सल्ला घेतला जातो, त्यामुळे कोंबड्यांचे आरोग्य चांगले राहते. खर्चात बचत होते.
1) सध्याच्या परिस्थितीत बाजारात उपलब्ध असलेले चांगल्या प्रतीचे खाद्य पक्ष्यांना दिले जाते. सुरवातीच्या 14 दिवसांपर्यंत प्री स्टार्टर, 28 दिवसांपर्यंत स्टार्टर आणि त्यानंतर पक्षी विक्री होईपर्यंत फिनीशर खाद्य पक्ष्यांना दिले जाते.
2) दिवसातून साधारण दोन ते तीन वेळा पक्ष्यांना खाद्य दिले जाते. उन्हाळ्यात पक्षी दिवसा कमी खात असल्यामुळे रात्रीच्या वेळी खाद्य दिले जाते. खाद्य भांडे दोन तृतीयांश भरले जाते. जेणे करून पक्षी खाद्य खाताना वाया जात नाही.
4) पोल्ट्री फार्मजवळ विहीर आहे. या विहिरीचे पाणी टाकीत घेऊन निर्जंतूक करून पक्ष्यांना दिले जाते. पक्ष्यांना लागणारी औषधे पाण्यातूनच दिली जातात. जेणे करून सर्व पक्ष्यांना पिण्याच्या पाण्यातून ते योग्य प्रमाणात उपलब्ध होतात. पाण्यासाठी स्वयंचलीत ड्रींकर बसविले असल्याने पक्ष्यांना गरजेप्रमाणे पाणी उपलब्ध राहते.
सहेजादखान पठाण - 9326487071
डॉ. मुकुंद कदम - 8149051060
(लेखक नागपूर पशुवैद्यक महाविद्यालयामध्ये कुक्कुटपालनशास्त्र विभागात सहायक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत)
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
गणेश घोरपडे यांनी जिल्ह्यातील सातारा, वाई आणि खंडा...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...