प्रामुख्याने मानवामध्ये जस्त व लोह या अन्नद्रव्यांच्या कमतरता दिसून येत असून, त्याचा जमिनीतील या अन्नद्रव्यांच्या कमतरतेचा परस्पर संबंध ठळकपणे दिसून येत आहे.
सध्या अनेक कारणांमुळे मानवाच्या आहारातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरता वाढताना दिसून येत आहेत. अन्नपदार्थामधील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतामुळे जागतिक लोकसंख्येचा मोठा भाग प्रभावित झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जवळपास दोन अब्ज लोकसंख्येमध्ये लोह कमतरता दिसून येते. त्यानंतर जस्ताची कमतरतादेखील मानवी आरोग्यातील महत्त्वाची अडचण ठरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जागतिक स्तरावर जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता ही त्या ठिकाणच्या सर्व चारा पिकांत, अन्नधान्यात पर्यायाने अनुक्रमे जनावरांत व मानवात दिसून येत आहे. जमीन, पिके, जनावरे व मानव यांच्यातील सूक्ष्म अन्नद्रव्यांचा परस्पर अभ्यास हा अधिक दर्जेदार कृषी उत्पादन व मानवी आरोग्याची गुरुकिल्ली ठरतो.
कारणे अशी आहेत...
पीक व मानव पोषणासाठी स्फुरद, पालाश, कॅल्शियम, मॅग्नेशियम, गंधक, मंगल, लोह, जस्त, तांबे, मोलाब्द ही सर्व अन्नद्रव्ये आवश्यक आहेत.
- अनेक विविध कारणांपैकी गरीब जनतेमध्ये गरजेपेक्षा कमी पोषण, एकाच प्रकारच्या आहारामुळे विशिष्ट अन्नद्रव्यांची कमतरता, कमी पोषणमूल्य असलेल्या अन्नपदार्थांचा आहार आणि ठराविक अन्नद्रव्ये कमी असलेल्या जमिनीतून वारंवार अन्नधान्यांचे उत्पादन व त्यांच्या आहारात समावेश ही मानव आहारातील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतांची प्रमुख कारणे आहेत.
- हरितक्रांतीनंतर केवळ मुख्य अन्नद्रव्येयुक्त खतांचा वापर वाढला असून, अधिक उत्पादन देणाऱ्या वाणांमुळे जमिनीतून या घटकांचे शोषणही वाढले आहे. पर्यायाने शेतीमालाचे उत्पादन व उत्पादनाची गुणवत्ता ही देखील जमिनीतील सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे प्रभावित होत असल्याचे आढळून आले आहे.
लोहाची कमतरता :
मानवाच्या आरोग्यात शारीरिक व बौद्धिक विकासाकरिता लोह अत्यंत महत्त्वाचे अन्नद्रव्य आहे.
- लोह हे सूक्ष्म अन्नद्रव्य प्रत्येक सजीव पेशीमध्ये आढळून येते. मानवाच्या शरीरात फुफ्फुसांपासून सर्व शरीरात प्राणवायूंचे वहन करणे, विविध विकारांचा घटक म्हणून ऊर्जा निर्मितीचे कार्य करणे, अपायकारक विषाणू, जिवाणू पासून होणाऱ्या रोगांचा अटकाव होण्यासाठी प्रतिकारक क्षमता तयार करणे, ही लोह अन्नद्रव्यांची प्रमुख कार्य आहेत.
- शरीरामध्ये दोन-तृतीयांश लोह हे प्रामुख्याने हिमोग्लोिबिन व लाल रक्त पेशीमध्ये आढळून येते. शरीरातील लोहाची कमतरता रक्तामधून आढळून येते. रक्तक्षयाचे प्रमुख कारण हे लोहाची कमतरता हेच आहे.
- रक्तक्षय ही विकसनशील राष्ट्राची प्रमुख समस्या आहे. विकसित राष्ट्रामध्ये मका व गहू पीठ, मीठ, साखर आणि दूध यासारख्या अनेक खाद्यपदार्थांमध्ये लोहयुक्त पदार्थांचा समावेश केला जातो.
- आहारातील लोह कमतरतेमुळे रक्तक्षय, पंडूरोग, कमी रोगप्रतिकारक क्षमता, थकवा, शरीर विकास थांबणे व सर्वांगीण कमी उत्पादकता हे अपाय संभवतात. विशेषतः लोह कमतरतेमुळे स्त्रियांमध्ये प्रजनन क्षमतेवर अनिष्ट परिणाम होतो.
- विशेषतः चुनखडीयुक्त जमीत व जमिनीचा सामू अल्कधर्मी असल्यास लोहाची कमतरता आढळते. पिकांमध्ये नवीन पानावर शिरा हिरव्या राहून पिवळेपणा असणे, पिकांची वाढ खुंटणे, विविध रोगांची प्रतिकारक क्षमता कमी होणे, उत्पादनात घट होणे ही जमिनीतील लोह कमतरतेची लक्षणे आहेत.
जस्ताची कमतरता
भारतातील जवळपास ५० टक्के जमिनीमध्ये जस्ताची कमतरता आढळून येते, तसेच जास्त स्फुरदयुक्त खतांच्या वारपामुळे देखील जमिनीत, अल्कधर्मी व चुनखडीयुक्त जमिनीत जस्ताची उपलब्धता कमी असते.
- विकसनशील देशामध्ये तृणधान्य पिकांचा मुख्य आहारात समावेश असतो. (उदा. गहू, भात व मका) ज्यामध्ये जस्त कमी प्रमाणात आढळून येते.
- विशेषतः लहान मुले जस्ताच्या कमतरतेमुळे प्रभावित होत आहेत. उदा. मागील दशकात लहान मुलांचा अर्धवट विकास, हगवण, शारीरिक वाढ खुंटणे व कमी रोग प्रतिकार क्षमता या बाबी पोषणातील जस्ताच्या कमतरतेमुळे होत असल्याचे आढळून आले आहे. गरोदर स्त्रियांमध्ये जस्त कमतरतेमुळे अयोग्य वाढीच्या बाळांचा जन्म असे अनिष्ट परिणाम दिसून येत आहेत.
- हरियाना व आंध्र प्रदेशातील प्रयोगांच्या आधारे असे सिद्ध झाले आहे, की तृणधान्य पिकांना जस्तयुक्त खतांच्या जमिनीद्वारा व फवारणीद्वारा वापरामुळे उत्पादनात वाढ व अन्नधान्यात जस्ताचे अधिक प्रमाण असते. संशोधनाआधारे जस्त व लोह या सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे गहू, मका व भात पिकांचे उत्पादन व उत्पादनात जस्ताचे व लोहाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
- अशा प्रकारे कृषी क्षेत्रात सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या वापरामुळे पीक उत्पादनवाढी सोबतच उत्पादनाच्या दर्जात सुधारणा होऊन सोप्या पद्धतीने व आर्थिक दृष्ट्या परवडणाऱ्या पर्यायाने सूक्ष्म अन्नद्रव्यांचा अन्नधान्यात व मानवांच्या आहारात समावेश करता येईल .
पिके ---- लोहाचे प्रमाण (शुष्कभागात प्रतिदहा लक्ष भाग) ---- जस्ताचे प्रमाण (शुष्क भागात प्रतिदश लक्ष भाग)
भात ---- २ ते १० ---- १७ ते ५२
गहू ---- २४ ते ६१ ---- २५ ते ६४
मका ---- १६ ते ३० ---- ११ ते ९५
डॉ. हरिहर कौसडीकर
(लेखक मृद विज्ञान व कृषी रसायन शास्त्र विभाग, वसंतराव नाईक, मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे कार्यरत आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------