राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७’ लागू केली आहे. या योजनेंतर्गत कर्जमाफी व इतर प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी शेतकरी कुटुंब हा निकष विचारात घेण्यात आला आहे. या कर्जमाफीचे स्वरुप काय आहे, या योजनेचा लाभ कसा घ्यावा, या संदर्भातील शासन निर्णय काय आहे आदी विषयांवरील सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमात सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस.एस.संधू यांनी दिली.
शासनाने सर्वात मोठी कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याविषयी काय सांगाल ?
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ ही राज्यातील सर्वात मोठी कर्जमाफी आहे. या योजनेचा ८९ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार असून या कर्जमाफीसाठी ३४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी २००८ मध्ये केंद्र शासनाने कर्जमाफी केली होती. तेव्हाच्या कर्जमाफी योजनेच्या व्याप्तीपेक्षा आत्ताच्या कर्जमाफी योजनेची व्याप्ती मोठी आहे. या कर्जमाफी योजनेत थकबाकीदार तसेच कर्जपुनर्गठन असे विविध फायदे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. म्हणून ही आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी योजना आहे.
छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना २०१७ या योजनेचे स्वरुप काय ?
दीर्घकाळ कर्ज थकीत राहिल्याने शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित राहत होते. जे शेतकरी अनेक वर्षापासून थकबाकीदार आहेत, अशा शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने कर्ज मिळत नाही. २००९ नंतर कर्जमंजूर झाले आहेत आणि ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार आहे, अशा सर्व अल्प आणि मध्यम मुदतीच्या कर्जदारांसाठी ही कर्जमाफीची योजना आहे. मधल्या टप्प्यात दुष्काळी परिस्थितीमुळे पिकाचे नुकसान झाल्यामुळे शेतकरी कर्जाची परतफेड करु शकत नाव्हता. अशा शेतकऱ्यांना शासनाने दिलासा देण्यासाठी, फेरपुनर्गठन करण्यासाठी किंवा ज्यांनी कर्जाचे पुनर्गठन केले आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. ज्या लोकांनी पैसे भरले आहेत अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ म्हणून या कर्जमाफीत समावेश करण्यात येईल. ३० जून २०१६ पर्यंत ज्या शेतकऱ्यांची थकबाकी आहे त्यांनी ३१ जून २०१७ पर्यंत परतफेड केलेली नाही. तसेच ज्यांनी दहा हजार किंवा वीस हजार रक्कम भरलेली असेल थोडक्यात कर्जाच्या रकमेपेक्षा कमी रक्कम भरली आहे. अशा शेतकऱ्यांना (३१ जून २०१७) पर्यंतची रक्कम वजा करून व्याजासह दीड लाखाच्या मर्यादेपर्यंतची कर्जमाफी केली जाणार आहे. शासनाने दीड लाखाच्या वर कर्जाची रक्कम असणाऱ्यांना एकरकमी योजना जाहीर केली आहे. या योजनेत ३१ जून २०१७ पर्यंत व्याजासह थकबाकीची रक्कम असेल दीड लाखाच्या वरची रक्कम शेतकऱ्याने भरावयाची आहे. ती रक्कम भरल्यास शेतकऱ्याला दीड लाख रक्कमेचा लाभ मिळणार आहे. ज्या कुटुंबात पती, पत्नी व त्यांची अठरा वर्षाखालील मुले यांचा कुटुंब या संज्ञेत समावेश होतो. अठरा वर्षावरील मुले ही कुटुंबात धरली जाणार नाहीत.
शेतकरी कर्जमाफीसाठी शेतकरी पहिल्यांदाचा ऑनलाईन अर्ज करीत आहेत. नेमकी ही प्रक्रिया कशा प्रकारे राबविली जात आहे ?
शेतकरी कर्जमाफीचा अर्जाचा नमुना हा सुटसुटीत आहे. कर्जमाफीसाठी माहिती फारशी द्यायची नसून प्राथमिक माहिती मागविण्यात आली आहे. शेतकऱ्यांना अडचण येऊ नये, हा यामागील उद्देश आहे. ऑनलाईन अर्ज पहिल्यांदाच मागविण्यात आले आहेत. या प्रक्रियेसाठीची सर्व माहिती (डाटा) ऑनलाईन असल्यामुळे संग्रहीत असणार आहेत. अनेक योजनांसाठी या कर्जमाफीच्या डाटाचा भविष्यात निश्चितच फायदा होणार आहे. त्यामुळे ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. अंगठा आणि मोबाईल ओटीपीच्या माध्यमातून अर्ज कुणाचा आला आहे, याची शहानिशा होते. खरे शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरतील. बोगस लाभार्थी वगळले जातील. यातून खऱ्या लाभार्थ्यांना फायदा होईल, शासकीय अधिकारी व कर्मचारी यासाठी पात्र नाहीत. मात्र १५ हजारांच्या खाली निवृत्तीवेतन घेणाऱ्यांना ही योजना लागू केली आहे. प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे खोटे अर्ज करता येणे शक्य होणार नाही.
अर्ज भरण्यासाठी शासनाने ई-सुविधा केंद्र तात्काळ सुरू केली आहेत. याविषयी काय सांगाल ?
ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा ही व्यापक पातळीवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. खेड्यापाड्यापर्यंत या यंत्रणांचे मोठे जाळे आहे. आपले सरकार, कॉमन सर्व्हिस सेंटर आदी शासनाच्या ऑनलाईन सुविधा आहेत. अनेक ई-सुविधा केंद्रेही आपल्याकडे आहेत. आज राज्यभरात २६ हजार केंद्रे खेड्यापाड्यात कार्यरत आहेत. शेतकऱ्यांना फार लांब न जाता आपल्या जवळच्या केंद्रात जाऊन अर्ज ऑनलाईन भरता येणे शक्य होणार आहे.
शासनाकडे कर्जमाफी अर्ज भरण्यासाठी सेवा केंद्र सुरू केली आहेत, याविषयाची माहिती द्या ?
शेतकरी कर्जमाफीचे २४ जुलैपासून फॉर्म भरणे सुरू करण्यात आले आहे. मा.मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते या योजनेचा शुभारंभ झाला. गेल्या काही दिवसांपासून आपल्याकडे तीन ते पाच लाख अर्जाची नोंदणी दररोज होत आहे. त्यामुळे सर्व्हरवर प्रचंड लोड येतो. माहिती व तंत्रज्ञान विभागाने याची तातडीने दखल घेतली आहे. १५ सप्टेंबर ही कर्जमाफी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे गर्दी होण्याची शक्यता आहे. मात्र, यंत्रणा सतर्क राहण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे.
शेतकरी कर्जमाफीनंतर छाननी प्रक्रिया कशी केली जाते याविषयी माहिती द्या ?
सर्व शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव आणि बँकेचा खाते क्रमांक अशी प्राथमिक माहिती कर्जमाफी प्रक्रियेसाठी दिली आहे. आणि दीड लाखाची मर्यादाही कुटुंबासाठी आहे. काही लोकांनी चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरली आहे का त्याची छाननी करण्यात येते. त्यानंतर ही माहिती पोर्टलवर टाकण्यात येते. कोणत्या शेतकऱ्यांनी कोणत्या बँकेतून, शाखेतून कर्ज घेतले आहे अशी सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध होते.
३० जून २०१६ पर्यंत किती थकबाकीदार आहेत. किती लोकांनी कर्ज घेतले आहे. कर्जाचे पुनर्गठन किती? किती लोकांचे हप्ते बाकी आहेत. किती लोकांनी विहीत मुदतीपर्यंत कर्ज परतफेड केली आहे. किती शेतकऱ्यांनी आता पर्यंत कर्ज घेतले आहे आणि त्या कर्जाची परत फेड केली आहे का? ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी एक अर्ज तयार केला आहे. शेतकऱ्यांचे अर्ज आल्यानंतर किती अर्ज आधारकार्डला लिंक केले आहे. आणि ज्या अर्जदारांनी लिंक केले नाही. त्यांचे कार्ड लिंक करावे, अशा सूचना बँकांना देण्यात आल्या आहेत.
ऑनलाईन अर्ज भरताना अंगठ्याचा ठसा उमटत नाही अशावेळी काय करावे ?
आधारकार्ड बनवताना आपल्या १० ही बोटांचे ठसे घेतले जातात. त्यामुळे कोणत्याही बोटाचा ठसा घेतला तरी त्या व्यक्तीची ओळख प्रमाणित करण्यात येते. काही वेळा शेतात काम करून हातावरच्या रेषा फुसट होत जातात. मात्र आधारकार्डमुळे ही अडचण दूर करणे सोपे झाले आहे. आधारकार्ड नसल्यास त्या व्यक्तीची तपासणी करून अर्ज भरण्यास मदत केली जाते. कोणीही शेतकरी कर्जमाफीतून वंचित राहू नये, यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे.
शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे. मात्र ज्यांचे नाव यादीतून वंचित राहील तसेच अर्ज नामंजूर होणार त्या अर्जांचे काय केले जाणार ?
कर्जमाफी यादीमध्ये २ ते ३ प्रकारचे वर्गीकरण करण्यात आले आहे. जे शेतकरी कर्जमाफी यादीत येतील त्यांची संपूर्ण माहिती पोर्टलवर टाकण्यात येणार आहे. आपल्या गावात घरबसल्या अर्ज क्रमांक टाकल्यानंतर यादीत असणाऱ्या लोकांची माहिती पोर्टलवर दिसू शकते. ज्यांचे अर्ज नामंजूर झाले आहेत त्यांची नावे देखील यादीत दिसू शकतील. तसेच तालुका पातळीवरही या याद्या उपलब्ध करण्यात येणार आहेत. ओटीपीच्या माध्यमातून तपासणी करून पात्र लोकांची यादी तयार करण्यात येत आहे. ज्या लोकांची नावे यादीमध्ये नाही किंवा जे कर्जमाफीसाठी पात्र नाही अशा लोकांची चौकशी करून स्थानिक पातळीवर परत तपासणी करून ऑनलाईन पोर्टलवर टाकण्यात येणार आहे.
समजा कर्जदाराचा मृत्यू झाला असेल तर त्याच्या कर्जाबाबत काय निर्णय घेण्यात येणार? एकाच कुटुंबातील २ ते ३ लोकांचे खाते असतील अशांना काय माहिती द्याल ?
कर्जदाराचा मृत्यू झाला असेल अशा कुटुंबांनी बँकेत जाऊन त्यांच्या हिश्याची रक्कम निश्चीत करून घ्यावी. रकमेची फोड करून प्रत्येकाच्या वाट्याला किती रक्कम आहे. त्याची माहिती अर्जाद्वारे बँकांना द्यावी. तसेच मयत व्यक्तीचे वारस एकापेक्षा अधिक असेल तर बँकांमध्ये जाऊन प्रत्येकी आपल्या नावे किती हिस्सा येणार हे निश्चित करावे. मयत व्यक्तीच्या नातेवाईकांनी त्याची संपूर्ण माहिती बँकांना द्यावी. त्यात बदल करणे शक्य झाले आहे. त्यातून कर्जदारांना फायदा होऊ शकतो.
सर्व शेतकऱ्यांना काय आव्हान कराल ?
शेतकऱ्यांनी कर्जमाफीचे अर्ज भरावेत. पती – पत्नींनी कर्ज घेतले असेल तर तशा संपूर्ण माहितीचा समावेश अर्जात करावा. १५ सप्टेंबर पर्यंत स्थानिक पातळीवर अधिकाऱ्यांनी मदत करावी. आणि येणाऱ्या अडचणीवर मात करत या कर्जमाफीचा लाभ घेण्यात यावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शासन प्रयत्नशील आहे.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 7/9/2020