অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तावरजा नदी पुनर्जीवित

तावरजा नदी पुनर्जीवित

ग्रामस्थांच्या सहकार्याने "आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेचा उपक्रम


शासकीय योजनांवर अवलंबून न राहता, गावच्या पाण्याची गरज गावच पूर्ण करू शकते. याकरिता परिसरातील नैसर्गिक स्त्रोतांचे पुनर्जीवन झाले पाहिजे, हे लक्षात घेऊन "आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेने पुढाकार घेतला. त्यातूनच पुढे ग्रामस्थांच्या लोकसहभागातून लातूर जिल्ह्यात सुमारे 25 किलोमीटर अंतराच्या तावरजा नदीला पुनर्जीवित केले जात आहे. लोकसहभागातून एखाद्या नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रयोग असावा.


सरंपच परिषदेने दाखविला मार्ग


मराठवाड्याला सातत्याने दुष्काळाला सामोरे जावे लागत आहे, हे लक्षात घेऊन गेल्या वर्षी बंगळूर येथे श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत "आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेच्या वतीने सरपंच परिषद घेण्यात आली. त्याला मराठवाड्यातील अडीच हजार सरपंच उपस्थित होते. या परिषदेत काळाच्या ओघात नाहीसे होत चाललेले जलस्त्रोत किंवा मृत पावू लागलेल्या नद्या, नाले जिवंत करण्याचा संदेश देण्यात आला, अन्‌ त्या माध्यमातून कामाला सुरवात झाली.


ग्रामस्थांची बदलली मानसिकता


लोकसहभागातून काम झाले तर त्याला अधिक महत्त्व प्राप्त होते, हे लक्षात घेऊनच आर्ट ऑफ लिव्हिंग संस्थेने लोकसहभागातून चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेतला. गावा-गावांत जाऊन त्यांनी प्रथम ग्रामस्थांचे प्रशिक्षण घेतले. ग्रामस्थांत कोणतेही मतभेद होणार नाहीत व त्यांच्यात एकी टिकून राहील, असा प्रयत्न झाला. यातून ग्रामस्थांची मानसिकता बदलण्याचे काम झाले.


ग्रामस्थच ठेवतात हिशोब


नदीचे रुंदीकरण, खोलीकरण करण्याच्या कामांसाठी जे गाव होणाऱ्या कामाच्या 50 टक्के खर्च करण्यास तयार आहे, त्याच गावात जलसंधारणाचे काम होईल, अशी भूमिका "आर्ट ऑफ लिव्हिंग'ने घेतली. लोकसहभाग हा त्यामागील उद्देश होता. यातून होणाऱ्या कामांवर देखरेख व झालेल्या खर्चाचा हिशोब ठेवण्याचे काम ग्रामस्थांवरच सोपविण्यात आले. ग्रामस्थदेखील मोठ्या पुढाकाराने हे काम करू लागले.


अकरा गावांचा सहभाग


गेल्या वर्षी कातपूर येथे नाला, बाभळगाव येथे गावतळे व घरणी येथे नदीतील गाळ काढण्याचे यशस्वी काम करण्यात आले. या वर्षी तावरजा नदीला पुनर्जीवित करण्याचे काम हाती घेतले आहे. शिऊर गावापासून कामाला सुरवात करण्यात आली आहे. यात आतापर्यंत शिऊर, अलमला, बुधोडा, पेठपर्यंत बारा किलोमीटरचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पुढे भुसणी, शिवणी, बाभळगाव, शिरसीधानोरा, कव्हा, हिप्परसोगा, उंबडगा, चांडेश्‍वर, हसाळा जमालपूर, गंगापूर, सिंदाळा या गावांचा सहभाग घेण्यात येणार आहे.


"तावरजा' "मांजरा'ला मिळणार


शिऊरला तावरजा मध्यम प्रकल्प आहे. येथून नदीच्या रुंदीकरण व खोलीकरणाच्या कामाला सुरवात झाली आहे. सुमारे 25 किलोमीटरचे काम पूर्ण झाल्यानंतर ही नदी भुसणी येथे मांजरा नदीला मिळणार आहे. आत्तापर्यंत बारा किलोमीटरपर्यंतचे काम झाले आहे. त्यामुळे दोन्ही नद्यांचे पाणी वाढण्यास मदत होणार आहे.


नदीला ओढ्याचे स्वरूप


गेल्या काही वर्षांत काळाच्या ओघात तावरजा नदीचे पात्र ओढ्यासारखे झाले होते. नदीच्या पात्रात झाडेझुडपे वाढल्याने अनेक ठिकाणी नदी कोठे आहे, हे शोधण्याची वेळ येत होती. त्यामुळे पावसाळ्यात नदीत पाणी फारसे राहत नव्हते. पावसाळ्याचे पडलेले पाणीही वाहून जात होते. परंतु झालेल्या कामांमुळे आज नदीचे विशाल पात्र दिसू लागले आहे.


एक कोटीचे काम केवळ बारा लाख रुपयांत


काही महिन्यांपूर्वी शासनाच्या अधिकाऱ्यांनी भुसणी ते शिवणी या पाच किलोमीटर अंतराचे चार कोटी 60 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. शासनाच्या माध्यमातून हे काम झाले असते, तर एक किलोमीटरच्या कामासाठी साधारणतः एक कोटी रुपयांपर्यंत खर्च गेला असता. मात्र सध्या लोकसहभागातून एक किलोमीटरचे काम केवळ दहा ते बारा लाख रुपयांपर्यंत होत आहे. विशेष म्हणजे हे काम दर्जेदार होत आहे.


लोकप्रतिनिधी, शासकीय यंत्रणेची मदत


लोकसहभागातून होत असलेल्या या कामांची माजी मंत्री दिलीपराव देशमुख, राज्यमंत्री अमित देशमुख यांनी पाहणी करून या कामांच्या पाठीमागे उभे राहण्याचे आश्‍वासन संबंधितांना दिले आहे. तसेच या कामात जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी नामदेव ननावरे यांच्या पुढाकारातून नदीवर गॅबियन बंधारे, कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरुस्ती करून देण्यात येणार आहे. त्याचाही फायदा या कामांत होणार आहे.


शेती मोठ्या प्रमाणात सिंचनाखाली येणार


तावरजा नदीचे बारा किलोमीटरचे रुंदीकरण व खोलीकरण झाले आहे. नदीची रुंदी साठ मीटर करण्यात आली आहे. खोली 2.5 मीटर आहे. सुमारे 18 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. झालेल्या कामांतून 252 कोटी लिटर पाणी संकलित होईल. सुमारे एक हजार आठ कोटी लिटर पाणी जमिनीत मुरेल. त्यातून पाच हजार एकर शेती सिंचनाखाली येईल. आणि सुमारे 22 हजार लोकसंख्येला या कामांचा फायदा होणार आहे, असे हे आश्‍वासक चित्र आहे.


चौदा जिल्ह्यांत काम करणार


पुढील वर्षी तावरजा नदीचे शिल्लक राहिलेले काम, रेणा नदीचे रुंदीकरण व खोलीकरण व 50 गावांतील नाल्याचे रुंदीकरण व सरळीकरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात सुरू असलेले काम पाहून दहीवडी (जि. सातारा) येथे एक किलोमीटर लांब नाल्याचे तीस मीटर रुंद व दीड मीटर खोलीचे काम व गॅबियन बंधाऱ्याचे काम केवळ दहा लाख रुपयांत करण्यात येत आहे. जालना, परभणी, उस्मानाबाद, बीड, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, वर्धा या जिल्ह्यांतील अनेक व्यक्तींनी प्रत्यक्ष भेटीद्वारा हा उपक्रम पाहिला आहे. पुढच्या वर्षी या जिल्ह्यात जलसंधारणाची कामे सुरू होणार आहेत. यात ग्रामस्थांसोबतच सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतला, तर कामे अधिक सुलभ होणे शक्‍य होईल. 
मकरंद जाधव-8275005491 
राज्य प्रकल्प प्रमुख, आर्ट ऑफ लिव्हिंग संस्था


लोकचळवळीचे स्वरूप यावे


लातूर जिल्ह्यात नदीचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचा पहिलाच प्रयोग होत आहे. लोकसहभागातून तो यशस्वी होत आहे. गेल्या वर्षी नदीतील गाळ काढणे, तलाव व नाल्याचे खोलीकरण करण्याचा प्रयोग यशस्वी झाल्याने या प्रयोगाला प्रतिसाद मिळत आहे. भविष्यात या कामाला लोकचळवळीचे व्यापक स्वरूप यावे, हा आमचा प्रयत्न आहे. 
ऍड. त्र्यंबकदास झंवर-9881515111) 
सदस्य, राज्य कृषी परिषद.


सहभागातूनच कामांना चालना


तावरजा नदीचे काम करताना सुरवातील अडचणी आल्या. गावा-गावात जाऊन आम्ही मानसिकता बदलली. या जलसंधारणाच्या कामात ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळत गेला. गावातील प्रत्येकाने आपल्या परीने या लोकसहभागाच्या चळवळीत आपले योगदान देण्याचा प्रयत्न केला. यात सहभाग जेवढा वाढेल, तेवढी कामाला अधिक गती येण्यास मदत मिळणार आहे. 
महादेव गोमारे-9403011000 
स्वंयसेवक, आर्ट ऑफ लिव्हिंग, लातूर

 

लेखक : हरी तुगावकर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate