অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

यशोगाथा जलयुक्त शिवाराची

यशोगाथा जलयुक्त शिवाराची

जलयुक्त शिवार हा आजकाल सर्वांना परिचित झालेला विषय आहे. आणि लोकचळवळीत रुपांतरीत झालेला शासकीय उपक्रम आहे. गडचिरोली सारख्या जिल्हयात सिंचनासाठी मोठे प्रकल्प उभारणे येथील वनांमुळे शक्य नाही. त्यामुळे सर्व बाबतीत हक्काचं सुक्ष्म सिंचन क्षमता वृध्दी देणारा उपक्रम म्हणून देखील याला लोकाश्रय लाभलेला आपणास दिसतो.

सन 2015-16 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून जलयुक्त शिवार साकारायला सुरुवात झाली. आरंभी 152 गावांची निवड यामध्ये विविध निकषांच्या आधारे करण्यात आली होती. यात गडचिरोली तालुक्यातील 22, धानोरा 20, चामोर्शी 7, मुलचेरा 15, वडसा 8, आरमोरी 8, कुरखेडा 10, कोरची 27, अहेरी 7, एटापल्ली 7, भामरागड 6 आणि सिरोंचा 10 अशा 152 गावांना जलयुक्त अर्थात "वॉटर न्यूट्रल" करण्यात आले.

केवळ शेतीमधील तळ्यांचा विचार न करता यामध्ये वनविभाग आणि लघुसिंचन विभागांची मदत घेण्यात आली. वन विभागानेही यात वनतळ्यांची निर्मिती केली ज्यामुळे जंगली जनावरांना भेडसावणारे पाण्याचे दुर्भिक्ष्य कमी झाले. परिणामी लोकवस्तीत येणाऱ्या श्वापदांचे प्रमाण कमी झालेले आहे. या स्वरुपाचे 9 वनतलाव आणि 3 वनतळे यात आरंभी करण्यात आले.

2015-16 अंतर्गत झालेल्या कामांमुळे 152 गावांमध्ये सुक्ष्म सिंचनाची व्यवस्था उपलब्ध तर झालीच याच्या बरोबरीने भूजल पातळी वाढण्याच्या दृष्टीकोनातून याचा मोठया प्रमाणावर फायदा शक्य झाला.

याला लाभलेला प्रतिसाद बघून 2016-17 मध्ये 169 गावांची निवड करण्यात आली. यात 4592 कामे प्रस्तावित करण्यात आली. कृषी विभागाचा यामध्ये मोठा वाटा आहे. या विभागाच्या कामांची संख्या 3111 इतकी आहे. 15 ऑक्टोबर पर्यंत यातील 2264 कामे सुरु झाली. त्यातील 2010 कामे पुर्णत्वास गेली आहेत.

याच वर्षासाठी जिल्हा परिषदेमार्फत मनरेगा अंतर्गत 536 कामे प्रस्तावित करण्यात आली. यापैकी 463 कामे पुर्ण झाली. वन विभागाची 714 कामे प्रस्तावित असून यातील 685 कामे पूर्ण झाली आहेत.

या कालावधीत एकूण 4592 कामे प्रस्तावित करण्यात आली. त्यापैकी 3708 कामे सुरु झाली. पूर्ण झालेल्या कामांची संख्या 3114 आहे.

2016-17 मधील कामांमध्ये लोकसहभाग असावा या दृष्टीकोनातून एकूण 169 गावांपैकी 111 गावांमध्ये आता पाणलोट विकास पध्दतीवर भर देण्यात आला आहे. तसे प्रशिक्षणही गावकऱ्यांना देण्यात आलेले आहे.

पाणलोट विकासामध्ये ' माथा ते पायथा ' सर्वच ठिकाणी वेगवेगळ्या पध्दतीचे बांध-बंदिस्ती यातून पाणी कसे व किती अडविणे शक्य आहे. याचा गावकऱ्यांनी अभ्यास करावा तसेच गावाच्या पाण्याचे अंदाजपत्रक तयार करावे ज्यात पेयजल, जनावरांना लागणारे पाणी तसेच सिंचनासाठी असणारी पाण्याची गरज या सर्वांचा अभ्यास करुन या 111 गावांमध्ये प्रशिक्षण देण्यात आले आणि त्यानंतर शिवार फेरीच्या माध्यमातून साधने आणि साध्य यांची सांगड घालत आता जलयुक्त शिवार नव्या वळणावर पोहचले आहे.

लेखक - प्रशांत दैठणकर,

जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 8/6/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate