অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

कामे करा जलसंधारणाची

कोरडवाहू शेतीमध्ये जमिनीवर पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब मुरविल्यास जमिनीमध्ये ओलावा दीर्घकाळ टिकून राहण्यास मदत होते. पीक उत्पादनासाठी त्याचा फायदा होतो. मशागत करताना जल, मृद्‌संधारणाच्या खालील उपाययोजनांचा अवलंब करणे आवश्‍यक आहे.

भूजल पुनर्भरणाच्यादृष्टीने मूलस्थानी जलसंधारणामध्ये समतल मशागत व पेरणी, आंतरपीक पद्धती, जैविक बांध, जलसंधारण सरी, ठराविक ओळींनंतर सरी, सरी- वरंबा, बंदिस्त सरी, रुंद वरंबा- सरी व बंदिस्त बांधाचा समावेश होतो.


जमिनीची मशागत -


1) जमीन सपाटीकरण - उताराच्या जमिनीवरून पावसाच्या पाण्याबरोबरच मातीचे कण व पिकांचे अन्नांश वाहून जातात, त्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होते. जमीन समपातळीत असल्यास जमिनीची धूप कमी होऊन जमिनीत ओलावा साठविला जातो आणि त्याचा उपयोग पिकांच्या वाढीसाठी होतो. 
2) उताराला आडवी मशागत - नांगरणी, वखरणी, पेरणी, कोळपणी ही कामे जमिनीच्या उतारास आडवी केल्यास वाहणाऱ्या पावसाच्या पाण्याला अडथळा निर्माण होऊन जास्तीत जास्त पाणी मुरते. 
3) समतल मशागत - वहितीकरिता लागणारी मशागत, पेरणी व आंतरमशागत समपातळी रेषेला समांतर करण्याच्या पद्धतीला समतल मशागत असे म्हणतात. समतल मशागत सर्व प्रकारच्या मृद्‌ व हवामानविषयक भागांमध्ये उपयुक्त व प्रभावी आढळून आली आहे.


जमिनीची बांधबंदिस्ती करणे - आंतर्बाह्य व्यवस्थापन -


1) ढाळीचे बांध - ढाळीचे बांध केल्यास पावसाचे पाणी अडविले जाऊन जमिनीतील वाहून जाणारे मातीचे कण, अन्नांश, तसेच ओलावा जमिनीतच साठविण्यास मदत होते. 
2) जैविक बांध - 
विविध वनस्पतींच्या वापराने समपातळी रेषेवर अथवा उताराला आडवे अडथळे करणे म्हणजेच जैविक बांध होय. खस, सुबाभूळ, गिरिपुष्प, झुडूपवर्गीय उत्पादक वनस्पती किंवा चराऊ गवताचा उपयोग बांध निर्माण करण्यासाठी करता येतो. साधारणतः 25 ते 30 मीटर अंतरावर, 15 ते 20 सें.मी. अंतरावरील दोन ओळींमध्ये बांधाकरिता निवड केलेल्या वनस्पतींची पावसाळ्यात लावणी करण्यात येते. वनस्पतीच्या प्रकारानुसार एक ते दोन वर्षांत बांध निर्माण होतो. वेळोवेळी छाटणी करून जैविक बांधाची उंची 45 सें.मी., तर रुंदी 30 ते 40 सें.मी.पर्यंत राखण्यात येते. 
मूलस्थानी जलसंधारण साधण्याकरिता अल्प उतारावरील (एक टक्‍क्‍यापेक्षा कमी) क्षेत्रावर केवळ जैविक बांधाचा, तर मध्यम उताराच्या क्षेत्रावर बांधबंदिस्तीच्या जोडीने उपयोग करून परिणामकारक मृद्‌ व जलसंधारण करणे शक्‍य आहे.


बंदिस्त बांध -


ज्या क्षेत्रामध्ये जमिनीमध्ये पाणी मुरण्याचे प्रमाण भरपूर आहे, जमिनीला फारसा उतार नाही किंवा क्षेत्रफळ कमी आहे, अशा ठिकाणी परिघावर बांध घालून अथवा क्षेत्रात चौकोनी वाफे करून मूलस्थानी जलसंधारण करणे शक्‍य आहे. बंदिस्त बांध पद्धतीमध्ये जलसंधारणाकरिता एक मीटर उंचीपर्यंतचा बांध व आपत्कालीन परिस्थितीमध्ये अतिरिक्त पाणी क्षेत्राबाहेर काढण्याकरिता योग्य सांडव्यांची व्यवस्था असणे आवश्‍यक आहे.


जलसंधारण सरी -


आंतरबांध क्षेत्रात मूलस्थानी जलसंधारणाकरिता पेरणीपूर्वी उन्हाळ्यातील मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर, जमिनीच्या उताराप्रमाणे पाच ते दहा मीटर अंतरावर उताराला आडवी जलसंधारण सरी काढणे उपयुक्त आहे. 
- बैलाने चालणाऱ्या सरींच्या नांगराने अथवा कोळप्याच्या साह्याने साधारणतः 45 ते 60 सें.मी. रुंदी व 30 सें.मी. खोली असणारी सरी काढण्यात यावी. 
- दोन सरींदरम्यानच्या क्षेत्रातील पावसाचे पाणी सरीमध्ये साठविले जाते व जमिनीत मुरते. ही सरी पीक काढणीपर्यंत नियमित राखण्यात येते. 
- ओळीत पेरण्यात येणाऱ्या आंतरपीक पद्धतीकरिता ही पद्धत उपयोगी आहे. 
- दोन सरींमधील क्षेत्रात पेरणी करण्यात येते. 
- जलसंधारण सरी समपातळीवर घेण्याच्या ऐवजी सरीच्या लांबीवर 0.2 ते 0.4 टक्के उतार ठेवल्यास जास्त पर्जन्यमानाच्या काळात हीच सरी अतिरिक्त पाणी शेताबाहेर वाहून नेण्याचे कार्य करते व माती वाहून जाण्यापासून संरक्षण करते.


शेततळी -


एकूण पावसाच्या 20 ते 40 टक्के पाणी जमिनीच्या पृष्ठभागावरून वाहून जाते. पाणलोट क्षेत्राच्या खोलगट भागात शेततळे खोदून त्यात वाहून जाणारे पाणी साठविता येते. अशा प्रकारे शेतातील पाणी व माती शेततळ्यात जमा होते. शेततळ्यात जमा होणारी गाळाची माती शेतात टाकल्यास जमिनीची उत्पादनक्षमता वाढते. शेततळ्यातील पाण्याचा उपयोग रब्बी हंगामातील पिकास संरक्षित पाणी देण्यासाठी होतो.


सूक्ष्म सिंचनातून वाढेल पीक उत्पादन


सध्याची परिस्थिती पाहता उपलब्ध पाण्याचा काटेकोर वापर करणे आवश्‍यक आहे. पिकाच्या गरजेनुसार ठिबक किंवा तुषार सिंचनाने पाणी देणे आवश्‍यक आहे. पिकाची गरज न पाहता अति पाणी दिल्याने जमिनीच्या आरोग्यावर आणि पिकाच्या वाढीवरही परिणाम होतो. पाणी वाया जाते. त्याचा फायदा पीक वाढीसाठी होत नाही. ठिबक सिंचनाने पाणी दिल्याने किमान 70 टक्के पाण्यात बचत होते, पीक उत्पादनात वाढ होते. ठिबक सिंचनातून विद्राव्य खते दिल्याने पिकाला गरजेनुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा होतो. खतांच्या खर्चात बचत होते. येत्या काळातील शेतीसाठी पाण्याची उपलब्धता आणि पीक उत्पादन वाढविण्याची गरज पाहता सूक्ष्म सिंचनाचा अवलंब सर्व शेतकऱ्यांनी केला पाहिजे. पिकांचे नियोजन, पाणी व्यवस्थापन, खतांचा योग्य वापरातून अपेक्षित उत्पादन वाढविणे शक्‍य आहे.

- सतीश एस. शेकडे 
व्यवस्थापक, निंबस पाइप्स लि., जयपूर

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate