অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पुसला 'अवर्षणग्रस्त'चा शिक्‍का

नाला खोलीकरण, रुंदीकरण, तसेच त्यावर बंधारा, अशी जलसंधारणाची छोटी कामे मोठ्या परिवर्तनाचे निमित्त कशी ठरतात, याचा आदर्श बोदड (जि. वर्धा) या गावाने घालून दिला आहे. आतापर्यंत अवर्षणग्रस्त अशी ओळख असलेल्या या गावाने लोकसहभाग आणि स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून जलसंवर्धनाच्या कामांना प्राधान्य देत पाणीटंचाईमुक्‍तीकडे वाटचाल केली.
राज्यातील इतर गावांप्रमाणे वर्धा जिल्ह्यामधील आर्वी तालुक्‍यातील बोदड गावामध्येही पाण्याचा अनियंत्रित उपसाच होत होता. त्या तुलनेत जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांकडे मात्र गावकऱ्यांनी दुर्लक्ष केले. परिणामी, एक हजार लोकवस्तीच्या या गावाला उन्हाळ्यासोबतच पावसाळ्यातही पाणीटंचाईला सामोरे जावे लागत होते. गावाची पाणीसमस्या सोडविण्याची भिस्त गावापासून काही अंतरावर असलेल्या एका शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीवर होती. दर वर्षी ग्रामपंचायत या शेतकऱ्याची विहीर अधिग्रहित करायची. पावसाळा लांबल्यास या विहिरीचा अधिग्रहण कालावधीदेखील वाढविला जायचा. गेल्या अनेक वर्षांपासून या चक्रात बोदड ग्रामस्थ अडकले होते. खरे म्हणजे पूर्वी हे गाव पाण्याने समृद्ध होते, परंतु जलसंधारणाकडे दुर्लक्ष झाल्याने हळूहळू परिस्थिती बदलली. अवर्षणग्रस्त गावांच्या यादीमध्ये बोदडचाही समावेश झाला होता.

लोकसहभागातून केले नाल्याचे पुनर्जीवन


गावालगत वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण आणि रुंदीकरण आजपर्यंत कधीच झाले नाही. गाळ साचल्याने हा नाला आपले अस्तित्व हरवून बसला होता. नाल्यात पावसाचे पाणी साचल्यानंतर त्याचा नाल्याच्या काठावर असलेल्या विहिरीच्या पुनर्भरणास हातभार लागेल, असा विश्‍वास गावकऱ्यांना होता. त्यामुळेच एक हजार लोकवस्तीच्या या गावाला पाणीपुरवठा करण्याकरिता असलेल्या योजनेची विहीर नाल्यापासून काही अंतरावर घेण्यात आली, परंतु नाल्यात पाणी साठत नसल्याने ग्रामपंचायतीचा नाल्याकाठी विहीर घेण्याचा हेतू मात्र साध्य झाला नाही. दरम्यान, याच कालावधीत अवर्षणग्रस्त व पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या गावांमध्ये जलसंधारणाच्या कामाची हाक उद्योगपती राहुल बजाज यांचे मार्गदर्शन असलेल्या जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेकडून देण्यात आली. गावकऱ्यांच्या कानावर ही बातमी आली आणि गाव जागे झाले.

लोकवर्गणीतून झाले काम


1) जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेने सामाजिक जाणिवेतून पाणलोटाच्या कामाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता. जलसंधारणाचे महत्त्व प्रत्येकाला पटावे, असा हेतूही त्यामागे होता. बोदड ग्रामस्थांनीदेखील आपल्या गावात जलसंधारणाची कामे होण्याचा प्रस्ताव संस्थेकडे दिला. संस्थेचे समन्वयक विनेश काकडे यांनी गावाला भेट देऊन जलसंधारणाची कोणती कामे करता येतील, याचा आढावा घेतला. जलपुनर्भरणाच्या विविध उपचार पद्धतीची माहिती ग्रामस्थांना समजावून दिली.
2) संस्थेने गावातील पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागाचे आवाहन केले. या आवाहनाला बोदडवासीयांचाही सक्रिय सहभाग मिळाला. पहिल्या टप्प्यात गावालगत वाहणाऱ्या नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरणाचे काम करण्याचे ग्रामस्थांनी ठरविले.
3) हजार लोकवस्तीच्या या गावातून केवळ 35 हजार रुपयांची लोकवर्गणी या कामाकरिता लागणार होती. अल्पावधीतच या निधीची तरतूद झाल्यानंतर ट्रॅक्‍टर आणि जेसीबीच्या मदतीने प्रत्यक्ष कामास सुरवात झाली. साडेतीन लाख रुपयांच्या निधीची तरतूद संस्थेने या कामाकरिता केली. त्यातून दहा फूट खोल आणि 600 मीटर लांब नाला रुंदीकरण आणि खोलीकरण झाले. या कामासाठी गावातील पाणीपुरवठा आणि स्वच्छता समितीची मदत झाली. सन 2112 मध्ये नाला रुंदीकरण आणि खोलीकरणाचे काम पूर्ण झाले.

गावाने अनुभवले परिवर्तन

1) रुंदीकरण व खोलीकरण झालेल्या नाल्यावर यापूर्वीच एक बंधारा आहे. त्यामुळे पाणी अडून ते जमिनीत जिरू लागले. या परिसरात नाला सखल भागात, तर शेतजमिनी उंच भागात आहेत. त्यामुळे नाल्यापासून काही अंतरावरील शेतकऱ्यांनाच या नाल्यातील पाणी पिकासाठी वापरता येत होते. मात्र परिसरातील अनेक विहिरींच्या पुनर्भरणाला नाल्यातील पाण्यामुळे मदत झाली.
2) गावशिवारात 75 पेक्षा अधिक विहिरी आहेत. त्या विहिरींतील पाण्याच्या बळावर शेतकऱ्यांनी विविध पिकांच्या लागवडीस सुरवात केली. या गावात कपाशी, तूर, सोयाबीन पिकाची लागवड शेतकरी करतात. शाश्‍वत पाण्याची सोय झाल्याने शेतकरी सुधारित पद्धतीने पीक व्यवस्थापनाकडे वळले. शेतकऱ्यांनी पाणीबचतीसाठी ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाच्या वापरास सुरवात केली आहे. काही शेतकऱ्यांनी संत्रा, मोसंबी लागवड केली आहे. काही शेतकरी पशुपालनाकडे वळले आहेत. शेतकऱ्यांचे गटही गावात तयार झाले आहेत.
3) शेतीच्या बरोबरीने ग्रामस्थांना घरोघरी पुरेसे पिण्याचे पाणी मिळू लागले आहे. पूर्वी आठ दिवसांनी पाणीपुरवठा होत होता. आता दररोज पाणी मिळण्यास सुरवात झाली आहे.

परिसरातील गावेही आली पुढे

1) बोदडसह वर्धा जिल्ह्यातील गणेशपूर, साखरदरा, लोणी, टाकळी चना, चिंचाळा, सोनेगाव स्टेशन, आचगाव, दिवापूर, भोजनखेडा, तरोडा, रसुलाबाद, गारपीट, डवलापूर, कोसूरला, खातखेडा, नागठाणा या गावांमध्येही लोकसहभाग व जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या पुढाकारातून जलसंधारणाची कामे पूर्ण झाली आहेत. जलसंधारणाची ही कामे छोटी असली तरी त्यातून घडणारे परिवर्तन निश्‍चितच मोठे आहे.
2) विदर्भात सिंचनसुविधांचा अभाव असला तरी पावसाळ्यात हमखास पडणारे पाणी जमेची बाजू आहे. मात्र हवामान बदलांमुळे विदर्भही आता अवर्षणाच्या उंबरठ्यावर येऊन पोचला आहे. त्यामुळेच जलसंधारणाच्या छोट्या छोट्या कामांसाठी आताच पुढाकार घेतला तरच परिस्थिती बदलेल, असे जलतज्ज्ञ सांगतात.

आम्ही आहोत बदलाचे साक्षीदार

जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेचा 90 टक्‍के संस्था निधी व दहा टक्‍के लोकवर्गणी या माध्यमातून नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्यात आले. परिणामी, गावाचा पाणीप्रश्‍न निकाली निघाला. नाल्यामध्ये पाणी साचून जमिनीत जिरत असल्याने परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढली. नाल्याला पाणी आल्यानंतर काही तासांतच गावाच्या पाणीपुरवठा योजनेची विहीर तुडुंब भरते.
रत्नाकर काळे, सरपंच, बोदड

बोदड येथून उगम पावणारा हा नाला तीन किलोमीटर अंतरावरील रोहणा गावापर्यंत आहे. नाल्यात वर्षानुवर्षे गाळ साचल्याने गावाला पावसाळ्यात पुराचा धोका राहत होता. खोलीकरण व रुंदीकरणानंतर ही समस्या सुटली. गावाचे पुराच्या पाण्यापासूनही संरक्षण झाले. त्यासोबतच पाणीपुरवठा योजनेची विहीर व इतर जलस्रोतांचे बळकटीकरणासही हातभार लागला. गावात वृक्ष लागवड व संवर्धनाचे काम हाती घेण्यात आले आहे.
अशोक कालोकार
ग्रामस्थ, बोदड, ता. आर्वी, जि. वर्धा

बोदड आणि कोहळ या दोन शेजारी गावांना पाणीटंचाईच्या झळा बसत होत्या. विहिरीचे अधिग्रहण करूनही या दोन्ही गावांतील ग्रामस्थांची तहान भागविणे शक्‍य होत नव्हते. नाला खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामानंतर या वर्षी चित्र पालटले आहे.
विक्रम लोहे
ग्रामसेवक, बोदड
संपर्क - 9850485653, विनेश काकडे
(समन्वयक, जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्था, वर्धा.)

---------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate