অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पाण्याची प्रत व सिंचन

पाण्याची प्रत व सिंचन

पाण्याचे परीक्षण न करता सिंचनासाठी वापरलेल्या पाण्याचे दुष्परिणाम पिकांच्या वाढीवर, जमिनीच्या गुणधर्मावर, तसेच उत्पादन क्षमतेवर दिसून येतात. अनेक ठिकाणी जमिनी क्षारयुक्त होत असून, जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत आहे. त्यात मध्यम काळ्या, तसेच काळ्या जमिनीत पाण्याचे अयोग्य व्यवस्थापन, पाण्याचे गुणवताविषयक ज्ञान, कालव्यांचे सदोष व्यवस्थापन या बाबींची भर पडली आहे. ही समस्या मुख्यत्वे पश्‍चिम महाराष्ट्रामध्ये ऊस पट्ट्यामध्ये भेडसावत आहे. चिकणमाती असणाऱ्या जमिनीत ही समस्या तीव्र प्रमाणात भेडसावत आहे.

क्षारयुक्त पाणी ठिबक सिंचन पद्धतीमध्ये वापरल्याने लॅटरल व त्यावरील छिद्रे क्षारामुळे बंद होता

पाणी

    पावसाच्या पाण्यात सर्वसाधारण नत्र, अरगॉन, ऑक्‍सिजन, कार्बन- डाय- ऑक्‍साइड व अमोनियाचे प्रमाण असते.

    नद्या, तलाव, धरणे, भूगर्भातील पाणी सिंचनासाठी वापरल्यास त्यात विद्राव्य क्षार, वायू, तरंगणारे तंतू व सूक्ष्म सेंद्रिय आणि रासायनिक पदार्थ आढळतात.

पाण्यामध्ये क्षार का वाढतात

पाणी वाहताना मातीतून, झिरपताना खडकामधून जात असते. मातीतील क्षार पाण्यात विरघळतात. साधारणतः क्‍लोरीन, बायकार्बोनेट, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, सोडियम, बोरॉन व लिथियम यासारखे क्षार पाण्यात मिसळले जातात.

अधिक क्षारांमुळे होणारे दुष्परिणाम

  • शेतीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्यात वरीलप्रमाणे विद्राव्य घटक असल्यास वनस्पतींच्या वाढीस नुकसान पोचवू शकतात.
  • जमिनीचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म खालावतात.
  • मातीमध्ये क्षारांचे प्रमाण वाढल्यास वनस्पतीस पाण्याची उपलब्धता कमी होते.

पाण्याची प्रत ठरणारी प्रमाणके

सर्वसाधारणपणे पाण्यातील क्षारांची तीव्रता, पाण्यातील एकूण क्षारांचे प्रमाण, सोडिअम स्थिरीकरणाचे गुणोत्तर, पिकांची विम्लता सहन करण्याची शक्ती, जमिनीची रासायनिक व भौतिक गुणधर्म, या सर्व गोष्टींचा पाण्याची उपयुक्तता ठरविताना विचार केला जातो.
1. क्षारता किंवा विद्राव्य क्षार
2. सोडियम स्थिरीकरणाचे गुणोत्तर
3. रेसिड्युअल सोडियम कार्बोनेट
4. बोरॉनचे प्रमाण
5. क्‍लोराइडचे प्रमाण
6. नायट्रेटचे प्रमाण
7. लिथियमचे प्रमाण

पाण्याचा नमुना घेण्याची पद्धत

सिंचनासाठी पाण्याचे परीक्षण करताना प्रातिनिधिक पाण्याचा नमुना घेणे आवश्यक असते. पाणी नदी, विहीर, तलाव किंवा कालवा- कोणत्याही स्रोतातील असला तरी नमुना घेताना योग्य पद्धतीने घेणे आवश्यक असते.

पाण्याचा नमुना घेण्यासाठी स्वच्छ प्लॅस्टिक बादलीचा वापर करावा

  • पंप असल्यास तो चालू करून थोडा वेळ पाणी जाऊ द्यावे. नंतर पाण्याचा नमुना घ्यावा.
  • पंप नसल्यास पाण्यावरील काडीकचरा बाजूला करून विहिरीच्या किंवा तलावाच्या आतील भागातून पाण्याचा नमुना घ्यावा.
  • नदी, कालवे यातून पाणी घेताना वाहत्या पाण्यातून नमुना घ्यावा. सर्वसाधारणपणे १ लिटर पाण्याचा नमुना पुरेसा होतो.
  • हा नमुना स्वच्छ धुतलेल्या काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या बाटलीत भरून स्वच्छ बूच बसवून तो प्रयोगशाळेत पाठवावा. त्यावर शेतकऱ्याचे नाव, पाणी घेतल्याची तारीख, पाण्याचा स्रोत (विहीर, नदी किंवा तलाव इ.), गावाचे नाव, संपूर्ण पत्ता, पाण्याचा रंग व वास, यासोबतच पाण्याखाली भिजणारे क्षेत्र व पाण्याच्या वापराने समस्या निर्माण झालेली असल्यास त्याचा उल्लेख जरूर करावा.
  • पाण्याचा नमुना घेतल्यानंतर तो २४ तासांच्या आत प्रयोगशाळेत पोचेल, याची काळजी घ्यावी. अन्यथा पाण्यात भौतिक, रासायनिक व जैविक बदल घडण्याची शक्‍यता असते.

पाण्यातील निरनिराळे घटक आणि त्यांची तीव्रता

क्षारतेवर आधारित सिंचनाच्या पाण्याची प्रतवारी

पाण्यातील क्षारांच्या प्रमाणानुसार आणि पिकांच्या क्षार सहनशक्तीनुसार वेगवेगळी पिके घ्यावीत. आपल्याला अशा पिकांची वर्गवारी खालीलप्रमाणे करता येईल-
पिकांची क्षारता सहन करण्याची क्षमता लक्षात घेऊन त्यानुसार त्यांचे वर्गीकरण खालील प्रकारे करता येईल-

अ) सोडियम स्थिरीकरणाचे गुणोत्तर = सोडियम

(कॅल्शियम + मॅग्नेशियम)/2

रेसिड्युअल सोडियम कार्बोनेटवर आधारित पाण्याची प्रत

क्‍लोराइड मूलद्रव्यावर आधारित सिंचनाच्या पाण्याची प्रत

अन्य मुलद्रव्यांचे सिंचनाच्या पाण्यात योग्य प्रमाण

सहनशीलतेनुसार पिकांचे वर्गीकरण

  • संत्री, मोसंबी, कोबी, उडीद, मूग, हरभरा, वाटाणा, घेवडा, भेंडी, चवळी ही पिके क्षारयुक्त पाणी सहन करू शकत नाहीत.
  • गहू, ज्वारी, बाजरी, लसूण, मका, भात, ऊस, करडई, फुलकोबी, रताळी, कांदा, बटाटा ही पिके मध्यम क्षारयुक्त पाणी सहन करणारी पिके आहेत.
  • पेरू, ओट, बार्ली ही जास्त क्षारयुक्त पाणी सहन करणारी पिके आहेत.

बोरॉनची सिंचनाच्या पाण्यात प्रतवारी (मि.ग्रॅ./लि.)

कारखान्यांचे टाकाऊ पाणी आणि सिंचन

भारतात साधारणतः कारखान्यापासून मिळणारे टाकाऊ पाणी ६६ टक्के इतके आहे. या टाकाऊ पाण्यापासून साधारणतः नत्र, स्फुरद व पालाश मिळण्याची क्षमता ५ हजार टन प्रति वर्ष इतकी आहे. कागदाचा कारखाना, युरिया बनविण्याचा कारखाना, वनस्पती तूप व साखर कारखाना यांच्यापासून निघालेले टाकाऊ पाणी हे योग्य व्यवस्थापनानंतर सिंचनासाठी वापरू शकतो, असे निष्कर्ष निघाले आहेत. मात्र कारखान्याच्या टाकाऊ पाण्याचा अयोग्य पद्धतीने वापर केल्यास माती व भूजल प्रदूषित होऊ शकते.
१) कारखान्यानजीकच्या प्रवाही पाण्याचे प्रदूषण -नदी, ओढे इ.
२) भूगर्भातील पाण्याचे प्रदूषण - झिंक स्मेंलटर कारखान्याच्या टाकाऊ पाण्यामुळे १ कि.मी. पासून १० कि.मी.पर्यंत भूजलाचे प्रदूषण झाल्याचे आढळले आहे. ३) मातीचे प्रदूषण - तमिळनाडूमध्ये शेतकऱ्यांनी कागदाच्या कारखान्यांचे सांडपाणी १५ वर्षे वापरल्यानंतर मातीच्या गुणधर्मात हानिकारक बदल आढळले.

पीकसंवर्धनासाठी कारखान्याचे टाकाऊ पाणी

  • साखर कारखाना, कागदाचा कारखाना, वनस्पती तूपनिर्मितीचा कारखाना, युरिया खत बनविणारा कारखाना यांचे टाकाऊ पाणी योग्य रीतीने वापरल्यास फायदेशीर ठरू शकते. मात्र अयोग्य व अतिरिक्त पाण्याचा वापर झाल्यास जमिनीमध्ये क्षारतेची समस्या वाढू शकते. जमिनीत जड मुलद्रव्यांचे प्रमाण वाढेल. कृषिशास्त्रज्ञांनी वरील नमूद कारखान्याच्या पाणी सिंचनासाठी वापरण्यास अनुकूलता दर्शवलेली आहे.

पाणी तपासणी कोठे करता येईल?


  • महाराष्ट्रात विभागवार पाणी परीक्षणाच्या प्रयोगशाळा आहेत. त्यामध्ये पुणे, सोलापूर, सातारा, ठाणे, लातूर, धुळे, नागपूर, नगर, सांगली, रत्नागिरी, अलिबाग, ठाणे, औरंगाबाद, परभणी, जळगाव, गडचिरोली, अमरावती, यवतमाळ, अकोला यांचा समावेश आहे.


- डॉ. शशिशेखर जावळे - ७५८८१५५४४९

(लेखक डॉ. शशिशेखर जावळे हे जालना कृषी विभागात, तर डॉ. सुनील जावळे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे संशोधक विद्यार्थी आहेत.)
------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate