অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जिरवण नाला उभारणी

अवर्षणप्रवण क्षेत्रातून वहातळीच्या पावसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहून जात असते. या क्षेत्रातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे आता "जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्याचे काम सामुदायिक पद्धतीने हाती घेणे आवश्‍यक आहे.

योग्य पद्धतीचे नियोजन व व्यवस्थापन करून उपाय केले तर दुष्काळातही पाणी समस्या कमी करणे शक्‍य होईल. त्यासाठी आपल्या पावसाची, जमिनीची वैशिष्ट्ये, पाणी व जमीन यांचा संबंध, आपला पाणलोट विकास कार्यक्रम, पाणीप्रश्‍न सोडविण्याचा सोपा उपाय, पावसाची बदललेली प्रवृत्ती, नाला रुंदीकरण व खोलीकरणाचे निकष या सर्व बाबींचा तपशीलवार विचार करावा लागणार आहे.


आपल्या पावसाची वैशिष्ट्ये -


-आपल्याकडे सुमारे 150 वर्षांच्या पावसाचा तपशील आहे, त्यावरून आपल्या पावसाची वैशिष्ट्ये समजावून घेऊन त्यांचा वापर करता येईल. आपल्या पावसाची वैशिष्ट्ये अशी आहेत. 
-पावसाळ्याचे 120 दिवस असतात, पैकी 50 ते 80 दिवसच पावसाचे असतात. एखाद्या क्षेत्रात जेवढे सेंटिमीटर पाऊस पडतो, तेवढे पावसाचे दिवस असतात. पाऊस- कोरडे दिवस असे चक्र पावसाळ्याच्या 120 दिवसांत सुरू राहते. 
-पावसाचे सात वर्षांचे चक्र असते, पैकी तीन वर्षे कमी पावसाची, दोन वर्षे मध्यम पावसाची व दोन वर्षे अतिवृष्टीची असतात. 
-कमी पाऊस व अति पाऊस यांत सरासरीपेक्षा 25 टक्‍क्‍यांपर्यंत कमी किंवा जास्त पावसाची नोंद होते. 
-पडणाऱ्या पावसापैकी 50 टक्के पाऊस रिमझिम स्वरूपाचा व 50 टक्के जमिनीवरून पाणी वाहणारा असतो. ताशी अर्धा सें.मी. वेगाने पाऊस पडला तर पाणी जमिनीवरून उताराकडे वाहू लागते. 
-50 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात 25 सें.मी. पाऊस वहातळीचा असतो, म्हणजे एकरी दहा लाख लिटर पाणी जिरवण्यासाठी उपलब्ध होते. ते अडवून जिरविले नाही, तर जमिनीवरून वाहून निघून जाते. हे पाणी जिरविले तर आपला प्रश्‍न सुटू शकतो.


आपल्या जमिनीची वैशिष्ट्ये -


पाणी जमिनीत जिरविण्यासाठी जमिनीची वैशिष्ट्ये समजावून घेणे जरुरीचे आहे. 
अवर्षणप्रवण क्षेत्रात जमीन खोल आहे, त्यामुळे या जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता चांगली आहे. 
विदर्भ, मराठवाड्यातील काळ्या जमिनी 15-20 टक्के फुगणाऱ्या व त्यामुळे पाणी जिरण्यास प्रतिबंध करणाऱ्या आहेत, त्यामुळे विशेष रचना केल्याशिवाय येथे पावसाचे पाणी जमिनीत जिरू शकत नाही. मुरमाड जमिनीत पाणी मुरू शकते; मात्र अनेक ठिकाणी मुरमाड जमिनी काळ्या मातीच्या खाली आहेत. यासाठी जमिनीवरून नव्हे तर कडेने पाणी जमिनीच्या आत जाईल अशी व्यवस्था सर्व ठिकाणी करणे आवश्‍यक आहे.


पाणी- जमीन यांचा संबंध व पाणलोट विकास कार्यक्रम -


-आपल्या पाणलोट विकास कार्यक्रमात माथा ते पायथा असा विचार झाला; मात्र सपाट माळावरील वाहणारे पाणी जिरविण्याचा फारसा विचार झाला नाही. हे सपाटीचे क्षेत्र फार मोठे आहे, त्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रातून वहातळीच्या पावसाच्या वेळी मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर वाहून जाताना आढळते. 
-वहातळीच्या पावसाचे पाणी जमिनीत साठवू शकलो, तर वार्षिक 50 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात आपण 25 सें.मी. म्हणजे दहा लाख लिटर पाणी प्रति एकर दरवर्षी जमिनीत साठवू शकू. 
-एक सेंटिमीटर रिमझिम पाऊस जमिनीचा पाच सें.मी. भाग भिजवू शकतो. सलग दोन- तीन दिवस पडणाऱ्या रिमझिम पावसाने, तसेच पाणलोट विकास कार्यक्रमातील प्रचलित एक फूट खोलीच्या चरांमुळे जमिनीचा कमाल एक मीटर खोलीपर्यंतचा भाग भिजू शकतो. त्यानंतर खंडित पावसाच्या दोन- तीन दिवसांतील ऊन व वाऱ्याच्या प्रभावाने पाणी केशाकर्षणाने वर येऊन बाष्पीभवनाने निघून जाते, त्यामुळे जमिनीत पाणी साठविण्यासाठी रिमझिम पाऊस किंवा एक फूट खोलीच्या चराचा फारसा उपयोग होत नाही असा अनुभव आहे.


पाणीप्रश्‍न सोडविण्याचा सोपा उपाय -


-आपला पाणीप्रश्‍न सोडविण्यासाठी वहातळीच्या पावसाचे सर्व पाणी आपल्या जमिनीत खोलवर जिरविता आले पाहिजे. 
-प्रत्येक माळावर किंवा शेतजमिनीवर पावसाचे पाणी वाहून नेणारे लहान- मोठे नाले नैसर्गिकरीत्या तयार झालेले असतात. पावसाचे वाहणारे पाणी सर्व बाजूने त्या नाल्यांत येऊन त्या क्षेत्राच्या बाहेर निघून जात असते. हे पाणी जमिनीत जिरवले नाही, तर उन्हाळ्यात पाणीप्रश्‍न तयार होतो. 
-या "पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे' आपण "पाणी जिरविणाऱ्या नाल्यांत' रूपांतर करायला पाहिजे, त्यासाठी प्रत्येक नाला रुंद व खोल करायचा. उताराचे प्रमाण लक्षात घेऊन नाल्यात ठराविक अंतरावर पाच ते दहा मीटर रुंदीची माती तशीच ठेवायची. त्याच्या उताराच्या बाजूला आधार म्हणून 50 सें.मी. रुंदीचा दगड, सिमेंट, रेतीचा बांध घालायचा. जादा असलेले पाणी त्या दगड, सिमेंट, रेतीच्या बांधावरून पुढील खड्ड्यात जाईल, अशा प्रकारे खड्डे व दगड, सिमेंट, रेती बांध यांची मालिका करून सर्व नाला खोदून व बांधून काढायचा. याला "पाणी जिरवण नाला' असे म्हणता येईल. 
-शिरपूर (जि. धुळे) येथे तालुक्‍यातील 35 गावांत असे "पाणी जिरवण नाले' तयार केले आहेत, त्यामुळे परिसरातील गावे बारमाही बागायतीची झाली आहेत. जमिनीतील पाणीपातळी 150-200 मीटर खोलीवरून 10-12 मीटरवर आली आहे. या क्षेत्रात केवळ 50 सें.मी. पाऊस पडतो. शिरपूर तालुक्‍याला भेट देऊन कोणीही या जिरवण नाल्यांचा अभ्यास करू शकतो. या कामासाठी प्रति हेक्‍टरी एकदाच तीन हजार रुपये खर्च आला आहे (धरणे बांधून कालव्याने पाणी शेतीपर्यंत पोचविण्यासाठी हेक्‍टरी तीन ते चार लाख रुपये खर्च येतो). 
-जिरवण नाल्याच्या पाणलोट क्षेत्रात वहातळीचा पाऊस झाल्यावर हे पाणी स्वाभाविक नाल्यात येते. तेथे थांबून राहून जिरते. वाहतळीच्या पावसामुळे हेक्‍टरी केवळ दहा सें.मी. पाणी नाल्यात आले तरी ते दहा लाख लिटर होते आणि सर्वच्या सर्व जमिनीत जिरते, त्यामुळे जमिनीतील पाणीपातळी हळूहळू वर येते. 
वार्षिक 50 ते 60 सें.मी. पाऊस पडणाऱ्या क्षेत्रात बागायतदारांना आवश्‍यक पाण्यासाठी आपल्या क्षेत्राच्या बाहेर जाण्याची जरुरी नाही. जंगलांमुळे पाणी मुरविण्याचे जे काम होते ते आपल्या पाणलोट क्षेत्रात जिरवण तलावामुळे होईल.


नाला रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे निकष -


नाले कित्येक वर्षे त्यांच्या पाणलोट क्षेत्रातील पाणी वाहून नेत आहेत. या काळात या क्षेत्रात काही वेळा अतिवृष्टी होऊन ते पाणी नाल्यांतून वाहून गेलेले असते. असे जास्तीत जास्त किती पाणी नाल्यातून वाहून गेले हे नाल्याच्या आकारावरून कळते, कारण असे जोरदार वाहून जाणारे पाणी नाल्याच्या दोन्ही बाजू व तळ घासून काढते. याच्या 15 ते 18 पट पाणी साठेल अशाप्रकारे नाला खोल व रुंद करावा लागत असतो. अशा प्रकारचा जोरदार पाऊस 15 ते 20 मिनिटेच पडतो. एक एकरावर एक सें.मी. वहातळीचे पाणी पडले तर ते 40 हजार लिटर होते. एका वेळी जास्तीत जास्त दोन सें.मी. पाऊस पडेल असे गृहीत धरून पाणलोट क्षेत्र मोजावे. त्यावरून नाल्यात किती पाणी साठविले पाहिजे हे कळू शकते; परंतु नाल्याच्या आकाराच्या 15-18 पट पाणी साठविण्याचा निकष हिशेबाला सोपा आहे.

अतिवृष्टीच्या 15 ते 18 पट पाणी साठविण्यासाठी नाल्याच्या रुंदीच्या सहापट रुंदी वरच्या बाजूस ठेवावयाची व तळात तीनपट रुंदी ठेवावयाची. म्हणजे माती ढासळत नाही. नाल्याच्या खोलीच्या चार पट इतकी या खड्ड्याची खोली करावयाची. असे केल्याने 18 पट पाणी साठवणक्षमता तयार होते. 
नाल्यात एवढ्या खोलीनंतर दोन्ही बाजूच्या काठांच्या भिंतीत अनेक ठिकाणी पाणी जिरण्याच्या जागा उपलब्ध होतात. साठलेले पाणी त्या भेगांतून जमिनीत मुरते. जमिनीत उताराच्या दिशेने काळ्या दगडांपर्यंत जाऊन प्रति घनमीटर मातीत सुमारे 200 लिटर या प्रमाणात साठते. कालांतराने जोरदार वहातळीच्या पावसाच्या वेळी या जिरवण नाल्यातील खड्डे भरतात. हे पाणी जमिनीतच जाते. अशाप्रकारे चार ते पाच वेळा हे नाले भरून पाणी जिरले तर जमिनीत ठिकठिकाणी पाणी उपलब्ध होऊ लागते. या जिरलेल्या पाण्यातील पाणी उपसून काढले जात नाही, त्याचा जमिनीत साठा राहतो. ज्या वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडतो (सात वर्षांत अशी किमान दोन वर्षे असतात), त्या वर्षी हा साठा आणखी वाढतो. शिरपूर येथे गेल्या पाच वर्षांत 40 ते 50 सें.मी. प्रमाणात वार्षिक पाऊस पडला आहे. तेथे "नाला रुंदीकरण आणि खोलीकरण' केलेल्या 35 गावांत 10 ते 15 मीटर खोलीवर पाणी उपलब्ध आहे.


पावसाची बदललेली प्रवृत्ती


पावसाची प्रवृत्ती बदलली असल्याचे यंदा तरी प्रकर्षाने जाणवले. खरीप पिकांना उपयोगी पडणारा पाऊस फारसा झाला नाही; परंतु अवर्षणप्रवण क्षेत्रात पडणारा वहातळीचा पाऊस (जो नेहमी 24-27 सें.मी. इतका पडतो) मात्र दरवर्षीइतकाच ऑक्‍टोबरच्या पहिल्या आठवड्यात पडला. या क्षेत्रातील नाले अजूनही "जिरवण नाले' झाले नसल्याने हे सर्व पाणी या क्षेत्राच्या बाहेर निघून गेले आहे. "जिरवण नाले' असते तर इतका कमी पाऊस पडूनसुद्धा पाण्याची जमिनीतील पातळी वाढली असती, त्यामुळे अवर्षणप्रवण क्षेत्रातील पाणी वाहून नेणाऱ्या नाल्यांचे आता "जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेणे आवश्‍यक आहे. या नाल्यांचे "जिरवण नाल्यांत' रूपांतर करण्यासाठी हे नाले रुंद व खोल करावे लागतील. नाल्यांच्या परिसरात पडणारे सर्व पाणी या खड्ड्यांतून साचून राहून ते जमिनीत जिरावे, पाणलोट क्षेत्राच्या बाहेर निघून जाऊ नये इतकी साठवण क्षमता तयार करणे आवश्‍यक आहे, त्यासाठी नाला रुंदीकरणाचे व खोलीकरणाचे काही निकष आहेत. 
( लेखक जलव्यवस्थापन विषयातील तज्ज्ञ आहेत)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate