অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पीकपद्धतीसुधार प्रकल्प

बारामती तालुक्‍यातील (जि. पुणे) कडे पठार गावात राबवलेल्या निक्रा प्रकल्पातून गावातील दुष्काळाची तीव्रता कमी होण्यास मदत मिळाली आहे. जलसिंचन प्रकल्प, पीक पद्धती व जनावरे आरोग्य सुधार आदी उपक्रमांतून शेतकरी सक्षम होण्यास मदत मिळाली आहे.

पुणे जिल्ह्यातील जळगाव कडेपठार हे बारामतीपासून 20 किलोमीटर अंतरावरील सुमारे तेराशे लोकवस्तीचे गाव अनेक वर्षांपासून अवर्षणाशी दोन हात करीत आले आहे. गावातील सरासरी पर्जन्यमान 537 मि.मी. आहे. गावात वहितीखालील एकूण क्षेत्र सुमारे 1100 हेक्‍टर असून, खरिपात बाजरी तर रब्बीत ज्वारी पीक घेतले जाते. जनावरे पालन हा येथील शेतकऱ्यांचा आर्थिक उत्पन्नाचा हुकमी पर्याय आहे. गावात पशुधन सुमारे 900 च्या आसपास असून संकरीत गाई व त्या खालोखाल शेळ्यांची संख्या जास्त आहे.
गावाच्या उत्तरेस कऱ्हा नदी तर दक्षिणेस एक लहानसा बेन्दीचा ओढा वाहतो. गावच्या हद्दीत कऱ्हा नदीवर दोन कोल्हापुरी पद्धतीचे तर बेन्दीच्या ओढ्यावर तीन कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे व एक सिमेंट बंधारा असे काम कृषी विभागाने केले आहे. गावात विहिरींचे पाणी खारट, क्षारयुक्त आहे. उन्हाळ्यात ते जास्त क्षारयुक्त बनते व पिण्यासाठी आणि शेतीसाठी वापरता येत नाही. पाण्याचा सरासरी सामू 8.5 च्या दरम्यान आहे. गावातील जमिनींत स्फुरद, लोह व मंगल या अन्नद्रव्यांचे कमी प्रमाण आहे. अवर्षण परिस्थीतीमुळे गावातील सुमारे 25 हेक्‍टर जमीन पडीक होती. नदीकाठच्या जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण जास्त असल्याने त्या वाफसा स्थितीत लवकर येत नव्हत्या. या जमिनीतून पिकांचे उत्पादन तुलनेने कमी होते.

निक्रा प्रकल्पांतर्गत घडले बदल

सध्या भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत क्रीडा या हैदराबाद संस्थेच्या अधिपत्याखाली देशभरात हवामान बदलावर आधारित कृषी तंत्रज्ञान प्रकल्प (निक्रा) प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत कृषी विज्ञान केंद्र बारामतीद्वारा जळगाव कडेपठार गावाची निवड करण्यात आली. त्यानंतर गावाचे सर्वेक्षण करून अवर्षणावर मात करावयाच्या उपाययोजना व खालील कामे करण्यात आली.

  1. गावातील सहा बंधाऱ्यांतील गाळ काढण्यात आला. तो गावातील सुमारे 25 हेक्‍टर पडीक व नापीक जमिनीवर टाकण्यात आला. गाळ माती टाकण्यापूर्वी केंद्राने या मातीचे परीक्षण केले. त्याचा सरासरी सामू 7.97 तसेच सरासरी विद्युत वाहकता 0.26 मिली म्होज होती. गाळमाती सुपीक असल्याने जमिनीची उत्पादकता वाढण्यास मदत झाली. गावात सुमारे 2.5 कि.मी. लांबीचे शेतरस्तेही करण्यात आले.
  2. मूलस्थानी जलसंधारणाची प्रात्यक्षिके ज्वारी पिकात घेण्यात आली, त्यामुळे पावसाच्या पाण्याचा सक्षम वापर होऊन पिकांची उगवण, उत्पादन चांगले मिळाले.
  3. प्रकल्पांतर्गत तुषार सिंचन संच शेतकऱ्यांना देण्यात आले. गावातील सामूहिक अवजारे केंद्रातही तुषार सिंचन संच ठेवण्यात आला. कमी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणी ज्वारी पिकात त्याचा वापर करता आला. ज्वारीपासून उत्पादन व जनावरांसाठी कडबा मिळण्याची खात्री त्यामुळे झाली.
  4. गावातील एका शेतकऱ्याने शेततळे उभारले. त्यास प्रकल्पांतर्गत प्लॅस्टिक कागदाचे अस्तरीकरण केले. त्यात मत्स्यसंगोपनही केले आहे.
  5. गावातील क्षारयुक्त जमिनी सुधारण्याकरिता सामूहिक अवजारे केंद्रावर उपलब्ध केलेल्या मोल नांगराचा उपयोग 2011-13 मध्ये सुमारे 30 शेतकऱ्यांनी आपल्या शेतात केला. सरासरी 25 टक्के पीक उत्पादनवाढ त्यांना मिळाली.
  6. लेझर तंत्रज्ञानावर आधारित यंत्राद्वारा गावातील 26 हेक्‍टर क्षेत्रावर सपाटीकरण करण्यात आले, त्यामुळे पावसाचे पाणी जागच्या जागी मुरण्यास मदत झाली. जमिनीत सर्वत्र सारख्या प्रमाणात वाफसा तयार झाला. पिकांची उगवण एकसमान झाली. जास्त पाऊस पडल्यामुळे जमिनीची धूप होण्यास प्रतिबंध झाला.
  7. गावातील बहुतांश विहिरींच्या पाण्याची क्षारता एक मिली म्होजपेक्षा जास्त असून, असे पाणी पिकांना दिल्यास पिकांची वाढ खुंटते. उत्पादनात घट येते. हे टाळण्यासाठी गावातील दोन विहिरींवर प्रायोगिक तत्त्वावर वॉटर कंडिशनर बसविण्यात आले आहेत. त्याचे प्राथमिक निष्कर्ष उत्साहवर्धक आहेत.

पीक प्रात्यक्षिके व पीक पद्धती सुधार

  1. कमी पाण्यावर येणाऱ्या बाजरीच्या आयसीटीपी 8203, ज्वारीच्या फुले अनुराधा, गव्हाच्या नेत्रावती वाणांची प्रात्यक्षिके घेतली.
  2. जिरायतेत हलकी जमीन असलेल्या व पाणी देण्याची सोय होऊ शकत नसलेल्या ठिकाणी ज्वारीचे फुले अनुराधा वाण शेतकऱ्यांना लागवडीसाठी देण्यात आले. मध्यम स्वरूपाची जमीन व पाण्याच्या 12 पाळ्या देण्याची सोय असलेल्या क्षेत्रासाठी ज्वारीचा फुले वसुधा तर मध्यम ते भारी जमीन, पाण्याच्या किमान 2 पाळ्या देण्याची सोय आहे अशा क्षेत्रावर ज्वारीचा फुले रेवती वाण देण्यात आला.
  3. आता फुले अनुराधा वाणाचे एकरी 8 ते 11 क्विंटल, फुले वसुधा या जातीचे 12 ते 15 क्विंटल तर फुले रेवती वाणाचे एकरी 18 क्विंटलपर्यंत उत्पादन शेतकऱ्यांना मिळत आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने शेतकरी ज्वारीच्या सुधारित वाणांचे बीजोत्पादन घेत आहेत. यामध्ये 2012-13 या वर्षी फुले अनुराधा या जातीचे 17 क्विंटल बियाणे तयार करून गावातच चालू वर्षी विकले.

  4. बाजरी अधिक तूर, बाजरी अधिक मूग, सोयाबीन अधिक तूर आदी पीक पद्धतींची प्रात्यक्षिकेही घेण्यात आली.
  5. आपत्कालीन पीक व्यवस्थापनात सूर्यफूल, मका, उशिरा येणारा खरीप कांदा आदी पिकांची लागवड केल्यास खरीप वाया जात नाही. चालू वर्षी त्याअंतर्गत 16 हेक्‍टर क्षेत्रावर कांदा, 10 हेक्‍टर क्षेत्रावर सूर्यफूल, सहा हेक्‍टरवर मका पिकाची लागवड करण्यात आली.
  6. पिकावरील अवर्षणाचा ताण सहन करण्याकरिता शेतकऱ्यांना पिकांवर फवारणीकरिता रासायनिक खते देण्यात आली. त्याचे दृश्‍य परिणाम बाजरी, ज्वारी व मका या पिकांत दिसून आले.
  7. कृषी विज्ञान केंद्राने एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची 30 मका पिकांत तर 15 प्रात्यक्षिके कांदा पिकात घेण्यात आली. यामध्ये माती परीक्षणाआधारे पिकांना रासायनिक खते देण्यात आली. शिफारशीप्रमाणे सूक्ष्म अन्नद्रव्ये, पेरणीच्या वेळेस जीवाणू खतांचा वापर झाला. प्रात्यक्षिकांमुळे कांदा पिकात सुमारे 23 टक्के उत्पादन वाढ दिसून आली.

अवर्षण परिस्थितीत जनावरांचे व्यवस्थापन


  • जनावरांच्या संतुलित आहारासाठी स्टायलो सेब्रीना चारा पीक व लसूण घासाच्या आरएल 88 या जातीची प्रात्यक्षिके घेण्यात आली. त्यातून गावातील लसूण घासाखालील क्षेत्रात वाढ झाली. गावातील एका शेतकऱ्याने बीजोत्पादनाद्वारा अन्य शेतकऱ्यांना बियाणे उपलब्ध करून दिले.
  • केंद्राने विभाग निहाय खनिज मिश्रणांचे संशोधन करून त्यांची निर्मिती केली. सध्या गावातील 62 पशुपालक खनिज मिश्रणाचा संकरित गाईंसाठी वापर करीत आहेत.
  • परसबागेतील कुक्कुटपालनासाठी केंद्राने गावातील 100 महिलांना वनराजा या सुधारित जातीचे पक्षी दिले.
  • गावातील जमिनीचे माती परीक्षण करून गावाच्या सुपीकता निर्देशांकाचा फलक गावात लावला आहे. या त्यानुसार विविध पिकांना द्यावयाच्या खत मात्रांची शिफारस करण्यात आली आहे.

नीरा प्रकल्पातून घडलेले काही प्रमुख बदल

  1. बंधाऱ्यातील गाळ काढल्यामुळे गावातील बंधाऱ्यांची एकूण पाणी साठवण क्षमता 40 टक्‍क्‍यांनी वाढली.   सन 2011 ते 2013 पर्यंत गावात सरासरी पेक्षा खूप कमी पाऊस पडूनही गावातील विहिरींची पाणीपातळी सन 2009-10 पेक्षा 7 ते 10 फुटांनी वाढली.
  2. साहजिकच गावातील ज्वारीखालील क्षेत्राच्या सुमारे 75 टक्के क्षेत्रावर सुधारित जातींची लागवड झाली आहे.
  3. गावात 2010 च्या तुलनेत 22.72 टक्‍क्‍यांनी दूध संकलनात वाढ झाली आहे.
  4. सन 2012 या वर्षी गावातील एकही जनावर चारा छावणीवर नेण्यात आले नाही.


लेखक कृषी विज्ञान केंद्र बारामती येथे कार्यरत आहेत.
संपर्क- 02112 255207, 255227.

------------------------------------------------------------------------------------------------

स्त्रोत: अग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate