অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलयुक्त शिवारला मिळाले गाळमुक्त धरणाचे पाठबळ

जलयुक्त शिवारला मिळाले गाळमुक्त धरणाचे पाठबळ

तलावांचा जिल्हा म्हणून गोंदियाची ओळख आहे. सिंचनाची व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी पूर्वजांनी बांधलेले तलाव आज गाळाने मोठ्या प्रमाणात भरल्यामुळे या तलावांची साठवण क्षमता कमी झाली आहे. 2019 पर्यंत दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वप्न जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून पुर्णत्वाकडे वाटचाल करीत आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करताना जलसंधारणाच्या सर्व योजना एकात्मिक पद्धतीने राबविणे लोकांचा व सेवाभावी संस्थांचा सहभाग घेऊन पिकांना संरक्षीत पाण्याची व्यवस्था आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था निर्माण होण्यास जलयुक्त शिवार अभियान मैलाचा दगड ठरत आहे.

जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा चरितार्थ हा शेतीवरच अवलंबून आहे. जिल्ह्यात 2 लाख 35 हजार 476 हेक्टर जमीन लागवडीलायक आहे. यामध्ये खरीप क्षेत्र 1 लाख 97 हजार 700 हेक्टर, रब्बी क्षेत्र 28 हजार 40 हेक्टर तर उन्हाळी क्षेत्र 18 हजार 770 हेक्टर इतके आहे. लागवडीलायक शेतीला मागील अडीच वर्षात जलयुक्त शिवार अभियानाचा मोठा लाभच झाला आहे.

जलयुक्त शिवार अभियानामुळे पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावशिवारात अडविण्यात आले. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. शेतीसाठी संरक्षीत पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ झाली. पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती व ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणीपुरवठा योजनांचे पुनर्जीविकरण करण्यास मदत होत आहे. विकेंद्रीत पाणीसाठे निर्माण होत आहे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेण्यात आली आहे. अस्तीत्वात असलेले व निकामी झालेल्या जलस्त्रोतांची साठवण क्षमता वाढण्यास मदत झाली आहे. पाण्याच्या टाळेबंदाबाबत जनतेत जाणीव जागृती निर्माण करण्यात येत आहे. शेतीसाठी पाण्याचा कार्यक्षम वापर करण्यात येत असून पाणी अडविणे, पाणी जिरविणे याबाबत लोकांना प्रोत्साहित करण्यात येत असून लोकांचा या अभियानात सहभाग वाढला आहे.

शाश्वत पाणीसाठे निर्माण करण्यासाठी उपयुक्त असलेल्या जलयुक्त शिवार अभियानाला पाठबळ लाभले आहे ते गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेमुळे. तलावांचा जिल्हा असलेल्या गोंदियात बाघ इटियाडोह हे मोठे प्रकल्प, 10 मध्यम प्रकल्प, 19 लघु प्रकल्प आणि 1788 माजी मालगुजारी तलाव आहेत. जिल्ह्यातील धरणात आणि मोठ्या संख्येने असलेल्या तलावात गाळाचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे पाण्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. हा गाळ काढून शेतात टाकल्याने पाण्याची साठवण क्षमता वाढेलच सोबत शेतीच्या मातीच्या प्रजनन क्षमतेत वाढ होण्यास मदत होईल. गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनमुळे शेतकऱ्यांचा खतावर होणारा खर्च 50 टक्के कमी होण्यास मदत होणार आहे.

जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गाळयुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेची सुरुवात आमदार आदर्श गाव योजनेअंतर्गत पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी दत्तक घेतलेल्या सडक/अर्जुनी तालुक्यातील कनेरी/राम या गावापासून पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आली. जिल्ह्यातील आठही तालुक्यातून प्रत्येकी 50 तलावांची निवड करण्यात आली असून या तलावातील खत म्हणून उपयुक्त असलेला गाळ शेतात टाकण्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज सुध्दा मागविण्यात आले आहे. गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजनेत ग्रामसभेचा वाटा महत्त्वपूर्ण असून ही योजना गावाचे चित्र बदलणारी आहे. त्यामुळे दुष्काळमुक्ती सोबतच शेतीची उत्पादन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.

गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना पुढील 4 वर्ष टप्प्याटप्प्याने राबविण्याचे नियोजन आहे. या योजनेत 250 हेक्टर पर्यंत सिंचन क्षमता असलेल्या आणि 5 वर्षापेक्षा जास्त जुने असलेल्या धरणांचे काम प्रथम प्राधान्याने केली जाणार आहे. या योजनेमुळे शेतीचे उत्पादन व धरण-तलावातील पाणीसाठा वाढविण्यास मदत होईल.

या योजनेत स्थानिक शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतामध्ये स्वखर्चाने गाळ वाहून नेण्यास तयार असणे ही प्राथमिक स्वरुपाची अत्यावश्यक अट आहे. गाळ उपसण्यासाठी आवश्यक असलेली यंत्रसामुग्री व इंधनावरील खर्च शासनाकडून तसेच उद्योगांच्या सामुदायिक सहभाग अर्थात सीएसआरच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या निधीतून करण्यात येणार आहे. 250 हेक्टर पेक्षा कमी लाभक्षेत्र असलेल्या व 5 वर्षापेक्षा जुन्या तलावांना प्राधान्यक्रम राहणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात येणाऱ्या कामांचे जीओ टॅगींग, योजनेची संगणक प्रणालीवर माहिती संकलीत करण्यात येणार आहे. सनियंत्रण व मुल्यमापन या योजनेअंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांचे स्वतंत्रपणे त्रयस्थ यंत्रणेमार्फत मुल्यमापन करण्यात येणार आहे. केवळ गाळ उपसा करण्यास परवानगी राहणार असून वाळू उत्खननास पूर्णत: बंदी राहणार आहे. या योजनेचे अंमलबजावणी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी हे काम पाहणार आहे.

गाळ साचलेल्या धरणालगतच्या क्षेत्रातील गाळ स्वयंसेवी संस्थांनी स्वखर्चाने काढून व शेतकऱ्यांच्या शेतात वाहून नेण्याचे कार्यवाही करण्याची सूचना कामाच्या वेळापत्रकांचा तपशील नमूद करून संबंधित तहसीलदार/तलाठी/धरण यंत्रणा उपअभियंता यांना द्यावी. 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या धरणातील गाळ काढण्याच्या सूचनेसोबत जोडण्यात येणारे वेळापत्रक हे किमान 48 तास कालावधीनंतर काम सुरू करणारे असावे. 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमतेच्या धरणातील गाळ काढण्याचे वेळापत्रक हे किमान तीन दिवसाच्या कालावधीनंतर काम सुरू करणारे असावे. 0 ते 100 हेक्टर सिंचन क्षमतेच्या तलावाच्या भिंतीपासून 5 मीटर व 101 ते 250 हेक्टर सिंचन क्षमता असलेल्या धरणाच्या भिंतीपासून 10 मीटर अंतरापर्यंत गाळ काढण्यास निर्बंध राहणार आहे. ज्या तलावांच्या क्षेत्राची मालकी खाजगी शेतकऱ्यांची असेल किंवा ज्या तलावांच्या मालकीबाबत स्पष्टता नाही तेथील गाळ काढता येणार नाही.

दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न आणि शेतीच्या उत्पादकता वाढीसाठी शासनाचा जलयुक्त शिवार अभियान व धरणमुक्त गाळ व गाळयुक्त शेती योजना महाराष्ट्राला जल व कृषिसंपन्न करण्यास निश्चितच उपयुक्त ठरणार आहे. या अभियानात व योजनेत लोकांचा सहभाग मोलाचा ठरणार आहे.

जिल्हा माहिती कार्यालय

गोंदिया

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate