অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलयुक्त शिवार योजनेची कोकणातील फलश्रुती

जलयुक्त शिवार योजनेची कोकणातील फलश्रुती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून महत्त्वाकांक्षी योजना म्हणून जलयुक्त शिवार अभियान या योजनेकडे पाहिले जाते. टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 हे उद्दिष्ट आहे. गेल्या तीन वर्षात जलयुक्त शिवार अभियान ही लोकचळवळ बनली आहे. या योजनेत लोकांचा सहभाग वाढल्यामुळे योजनेला शाश्वत स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळेच कोकण विभागात सन 2015-16 मध्ये निवडण्यात आलेल्या 203 गावांपैकी 203 गावे जलपरिपूर्ण झाली आहेत.

शाश्वत शेतीसाठी पाणी व पिण्याच्या पाण्याची उपलब्धता याद्वारे करण्यात येते. जलसंधारण अंतर्गत एकात्मिक पद्धतीने सर्व विभागाच्या समन्वयाने नियोजनबद्ध आराखडा तयार केला जातो. पिण्याचे पाणी व पिकास संरक्षित सिंचन देण्याची व्यवस्था निश्चित करता येते. ही बाब लक्षात घेऊन टंचाईमुक्त महाराष्ट्र 2019 अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरुपी मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान राबविण्याबाबत शासनाने निर्णय घेतला. या अनुषंगाने अभियान राबविण्याबाबत सर्वंकष सूचना दि.5 डिसेंबर 2014 च्या शासन निर्णयाने निर्गमित करण्यात आल्या. त्यामध्ये प्रामुख्याने अभियानाचा उद्देश, अभियानाची व्याप्ती, अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी यंत्रणा म्हणून विभागीय समन्वयक समिती तसेच जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय समिती अभियानांतर्गत हाती घ्यावयाची कामे, अभियान कालावधी, निधीची उपलब्धता, गावासाठी पाण्याचा ताळेबंद तयार करणे, अभियानाचा आराखडा करणे, अभियानाचे संनियंत्रण, प्रगती व फलनिष्पती इत्यादी बाबींचा समावेश आहे. राज्यात जवळजवळ 82 टक्के क्षेत्र कोरडवाहू व 52 टक्के क्षेत्र अवर्षणप्रवण आहे. ही बाब पाहता जलयुक्त शिवार अभियानाचे महत्व अधोरेखित होते. गेल्या तीन वर्षात योजना अधिक यशस्वी ठरली आहे.

कोकण विभागाची पावसाची सरासरी 3035 मि.मी. असून प्रत्यक्षात दि.1 जून ते 30 सप्टेंबर अखेर 3317 मि.मी. पाऊस पडला. म्हणजेच 108 टक्के पाऊस झालेला आहे. मात्र पावसात असलेला खंड, अनियमितता, उशिर तसेच तो सर्वत्र सारखा नसल्यामुळे कोकण विभागात या अभियानाची गरज लक्षात घेऊन कार्यक्रम निश्चित करण्यात आला.

कोकण विभागात एकूण 5 जिल्हे असून 23 उपविभाग व 46 तालुके आहेत. कोकण विभागात एकूण 3064 ग्रामपंचायती व 6278 गावे आहेत. विभागामध्ये जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन 2015-16 मध्ये 203 सन 2016-17 मध्ये 136 व सन 2017-18 मध्ये 274 गावे निवडण्यात आलेली आहेत. असे एकूण आज अखेर 613 गावांची निवड करण्यात आली आहे.

जलयुक्त शिवार अभियानांतर्गत विभागात सन 2015-16 मध्ये एकूण 203 गावांमध्ये 8194 कामे पूर्ण आहेत. सन 2015-16 मध्ये लोकसहभाग व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यातील 6.51 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला. सन 2015-16 करीता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत नोव्हेंबर अखेर 157 कोटी 73 लाख खर्च करण्यात आले आहे. निवडलेली सर्व गावे जलपरिपूर्ण झालेली आहेत. सन 2015-16 मध्ये झालेल्या जलयुक्त शिवार अभियान कार्यक्रमाची फलनिष्पती म्हणजे विविध उपचारामुळे 14979 सहस्त्र घ.मी. (TCM) एवढा पाणीसाठा निर्माण झालेला असून त्यातून 29958 हेक्टर क्षेत्र दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचनाखाली आलेले आहे.

सन 2016-17 मध्ये एकूण 136 गावांमध्ये 4300 विविध जलसंधारण कामाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. नोव्हेंबर अखेर 3610 कामे पूर्ण असून प्रगतीत 343 आहेत. उर्वरित 347 कामांचे नियोजन 31 मार्च 2018 अखेर पूर्ण करण्यात येईल. सन 2016-17 लोकसहभागातून व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून तलाव व नाल्यातील 2.08 लक्ष घन मीटर गाळ काढण्यात आला आहे. सन 2016-17 करीता जलयुक्त शिवार अभियानाचा आराखडा 130.25 कोटीचा तयार करण्यात आला असून नोव्हेंबर अखेर 77.65 कोटी खर्च करण्यात आला आहे. 136 गावापैकी 68 गावामध्ये आराखड्याप्रमाणे 100 टक्के कामे पूर्ण करण्यात आली असून 34 गावांमध्ये 80 टक्के कामे, 21 गावांमध्ये 50 टक्के, 13 गावांमध्ये 30 टक्के पेक्षा जास्त कामे करण्यात आलेली आहेत. पूर्ण झालेल्या विविध उपचारामुळे 9102 सहस्त्र घ.मी. (TCM) एवढा पाणीसाठा निर्माण झालेला असून त्यातून 18204 हेक्टर क्षेत्र दोन पाणी देण्यासाठी संरक्षित सिंचनाखाली आलेले आहे.

अभियान वर्ष 2017-18

सन 2017-18 करीता कोकण विभागात 274 गावांची निवड करण्यात आली असून गावस्तरीय क्षेत्राचे पाणलोट नकाशे तयार करण्यात आलेले आहेत. ग्रामस्तरावरील प्रशिक्षण दि.15 जुलै 2015 ते सप्टेंबर 2017 अखेर पूर्ण करण्यात आलेले असून सदरच्या प्रशिक्षणास गावस्तरावरील सरासरी सहा प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात आले.

जलयुक्त शिवार अभियान 2015-16 व 2016-17 या वर्षात टंचाई सदृष्य गावांची निवड करून निवडलेल्या गावांच्या शिवारातच जलयुक्त शिवार अभियानाची कामे घेण्यात येत होती. जलयुक्त शिवार अभियानाची कामे करतांना निवडलेले गाव हे घटक होते. त्यानुसार कामे झाली आहेत.

सन 2017-18 पासून निवडलेल्या गावाचे शिवाराच्या ऐवजी निवडलेल्या गावाचे पाणलोट क्षेत्र हे घटक ठरविण्यात आले असून ह्या निवडलेल्या गावांच्या संपूर्ण पाणलोट क्षेत्राचा विकास, माथा ते पायथा या तत्वावर करण्यात येत आहे. त्यामुळे वरच्या भागात 70 टक्के क्षेत्र विकासाची कामे (Area Treatment) च्या कामांसोबतच्या खालच्या भागात 30 टक्के Drainage Line Treatment ची कामे हाती घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. जेणेकरून सिमेंट नाला बांध व इतर जलसाठा निर्माण होणाऱ्‍या कामांत गाळ साचू नये. याची काळजी घेण्यात आली.

यंदाच्या वर्षी देखील जलयुक्त शिवारची काम लोकसहभागातून कशी होतील याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे. यामध्ये बंधाऱ्यांची उंची वाढविणे, गाळ काढणे, गळती रोखण्यासाठी दुरुस्ती करणे, तलावाचे खोलीकरण ही कामे सुरु झाली आहेत. जलयुक्त शिवार अभियानामुळे कोकण विभागात फळबाग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून उन्हाळी भातक्षेत्रात वाढ झाली आहे. एकूणच जलयुक्त शिवार अभियान कोकण विभागात यशस्वीपणे राबविण्यात आले आहे.

- शैलजा देशमुख-पाटील

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate