भारत हा शेती प्रधान देश असून खेड्यातील सर्व अर्थव्यवस्था शेती या उद्योगावरच अवलंबून आहे आणि शेती ही प्रामुख्याने निसर्गावर अवलंबून आहे. महाराष्ट्रातील काही क्षेत्र आणि ग्रामीण जनता सतत अवर्षणाच्या खाईत असते. हे विचारात घेता त्यांच्या अपेष्टा दूर करण्यासाठी काही कायम स्वरुपाचे उपाय योजने किती महत्वाचे आहे ते सहज लक्षात येण्यासारखे आहे. बालाघाट पर्वताच्या रांगेत वसलेल्या उदगीर तालुक्यातील शेती म्हणजे हंगामातील पावसावर अवलंबून असलेला एक जुगार आहे. तथापि या तालुक्यातील लोकांना शेतीपासून पूर्णपणे गुंतविणे हे देखील तितकेच सोपे नाही. भूपृष्ठातील व भूगर्भातील पाण्याचा सुयोग्य व दृष्टतम वापर करुन येथील कोरडवाहू शेतीला सिंचनाचा आधार देणे व आधुनिक सिंचनावर आधारीत नवीन यंत्राच्या साहाय्याने कृषी उत्पादनामध्ये लक्षणीय सुधारणा घडवून आणणे हेच येथील शेतीच्या समस्येवरील परिणामकारक उत्तर आहे.
महाराष्ट्र राज्यातील कुठल्याच जिल्ह्याचे पूर्णपणे जलसिंचन जिल्हा असे वर्णन करता येणार नाही. प्रत्येक जिल्ह्यात काही क्षेत्र, काही तालुके दुष्काळप्रवण आहेतच, गेल्या काही वर्षाची पावसाची सरासरी तपासली असता दरवर्षी पावसाचे प्रमाण वरचेवर कमी होत चाललेले दिसून येत आहे. याला काही घटकाबरोबरच वृक्षतोड, बिघडलेले पर्यावरणाचे संतुलन हे महत्वाचे कारण म्हणता येईल. यासाठी वृक्ष संगोपन व वृक्ष संवर्धनाबरोबरच पाण्याचे संवर्धन करणे ही आता काळाची गरज आहे. कमी पडणाऱ्या पावसामुळे दुष्काळी परिस्थिती उद्धभवू नये. पावसाळ्यात जो काही पाऊस पडतो. त्या पाण्याचा थेंब न थेंब उपयोगात आणला गेला पाहिजे. यासाठी भूगर्भात पाणी साठविणे आवश्यक आहे. हा दृष्टीकोन समोर ठेवून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात जलयुक्त शिवार अभियान राबविण्याची मोहीम सुरु केली. शिवाय दरवर्षी 1 जुलै रोजी राज्यात शतकोटी वृक्ष लागवड करण्याची मोहीमही सुरु केली, या दोन्ही मोहीमेस उत्स्फुर्त असा प्रतिसाद मिळत असल्यामुळे टँकर सक्तीची गावे आता टँकरमुक्त झाली आहेत.
गावच्या शिवारात ना नदी ना तलाव दुष्काळ तर पाचवीला पुजलेला, डिसेंबर उजाडला की, सारे गाव पाण्यासाठी टाहो फोडायचे. प्रशासनाला पाझर फुटलाच तर गावाला टँकर सुरु व्हायचा. ही बाब लक्षात घेऊन सताळा (बु) ता.उदगीर येथील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवार अभियानाचे काम लोकसहभागातून हाती घेतले. लातूर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, सरपंच शिवलिंग जळकोटे यांच्यासह गावातील नागरिकांनी पुढाकार घेवून पाण्याचा दुष्काळ कायमचा हटविण्याचा निर्धार केला. गावातील नागरिकांनी तब्बल 2 लाख 89 हजार 100 रुपये जमा केले.शिवाय आमदार निधी, जि.प.चा शेष निधी व 13 व्या वित्त आयोगाच्या निधीतून 220 मीटर लांबीचे नाला सरळीकर झाले, जवळपास 16 लाख रु.खर्चून झालेल्या कामाचे फलित निसर्गाने पहिल्याच पावसाळ्यात दिले. नाला तुडुंब भरुन वाहू लागला, सताळा (बु) शिवारातील 900 हेक्टर शेतीला या नाल्यात साठलेल्या पाण्याचा उपयोग झाल्याचे जि.प.चे उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके म्हणाले, तर पाण्यामुळे सताळा (बु) शिवारातील बागायती शेतीचे क्षेत्रही दुप्पटीने वाढल्याचे शेतकरी अमृत देशपांडे यांनी सांगितले.
जलयुक्त शिवार योजनेमुळे विहीरीत पाणी साठण्यास मदत झाली, गावाशेजारी असलेल्या बंधाऱ्यात 1 कि.मी. लांब पाणी साठल्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला असल्याचे हेर (ता.उदगीर ) येथील शेतीनिष्ठ शेतकरी बाबासाहेब पाटील म्हणाले. रोहिणा-हेर शिव ते, लोहारा–हेर शिव पर्यंत 6 कि.मी. लांबीचा नाला सरळीकरण व खोलीकरणचे काम लोकसहभागातून झाले आहे. या कामामुळे गोविंद घोगरे, नामदेव गुरमे, शिवाजी मगर, उमाकांत मिटकारी यांच्या विहिरी पाण्याने तुडुंब भरल्या असून, बोअरच्याही पाण्यात वाढ झाल्यामुळे सिंचनाचे क्षेत्र ही दुप्पटीने वाढल्याचे हे शेतकरी सांगतात. माजी आ. गोविंदराव केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली हेर (ता. उदगीर) येथील ग्रामस्थांनी जलयुक्त शिवाराचा धडक कार्यक्रम राबविला. शासनाकडून कसलीच मदत न घेता लोकसहभागातून 23 लाख रु. खर्चून नाल्याचे खोलीकरणामुळे व सरळीकरण केले. या परिसरात दोन वेळा ढगफुटी होऊनही नाला सरळीकरणामुळे शेतात पडलेल्या पाण्याचा निचरा झाला. पाणी शेतात थांबल्यामुळे पिके पिवळी पडून वाया जातात. मात्र नाला खोलीकरणामुळे पिकात पाणी न थांबता खोलीकरण व सरळीकरण केलेल्या नालीत निघून गेल्यामुळे या परिसरातील पिके मात्र जोमात असल्याचे हेर येथील शेतकरी सांगतात.
पाणी बचतीचा व जलसमृद्धी शिरपूर पॅटर्न महाराष्ट्रभर गाजत असला तरी पॅटर्न ची खरी समृद्धी उदगीर तालुक्यातील कुगठा खूर्दचे ग्रामस्थ 25 वर्षा पासून अनुभवत आहेत. अशातच या गावाला जलयुक्त शिवार अभियानाची जोड मिळाल्याने गावातील लोकांनी शेती व्यवसायात मोठी प्रगती केली आहे. कुमठ्याची शाळा ते नरसिंगवाडी पाटी सहा कि.मी. च्या नाल्याचे सरळीकरण व रुंदीकरण केल्यामुळे या नाल्याकाठची तीनशे एकर पडीक जमीन वहिती खाली येऊन गावातील कोरडवाहू क्षेत्र ओलिताखाली आले आहे. नाला सरळीकरणामुळे दादाराव केंद्रे, शंकर केंद्रे, नागनाथ केंद्रे, उद्धव केंद्रे, यांची जवळपास 60 एकर पडीक जमीन ओलिताखाली आली आहे. शिवाय या भागात ऊस लागवडीचे क्षेत्रही दुप्पटीने वाढले आहे. शेतकऱ्यांनी नवनवे यशस्वी प्रयोग ही केले आहेत. याचाच परिणाम म्हणून कुमठा गावाची टँकरमुक्त गाव म्हणून नवी ओळख निर्माण झाली आहे.
मातीचा कण न कण आणि पाण्याचा थेंब न थेंब अडविण्याचा गावकऱ्यांनी प्रयत्न करुन स्वत:च्या गावाच्या नावाला अर्थ प्राप्त करुन दिल्यामुळे जलयुक्त शिवार अभियानाची कामे झालेल्या गावात हिरवे गार गालिचे, हरित तृणाच्या मखमलीचे या बालकवींच्या काव्यपंक्ती मूर्त स्वरुपात अवतरण्याचे चित्र दिसत आहे. शिवाय या कामामुळे काळ्या जमिनीतसुद्धा जसे पीक येणार नाही तसे पीक या डोंगरमाथ्यावर आलेले पाहून अनेकजण अचंबित झालेले असून जलयुक्त मुळे गावगाड्याचे चित्र बदललेले दिसत आहे.
लेखक -व्ही. एस. कुलकर्णी
पत्रकार, उदगीर.
माहिती स्रोत : महान्यूज
अंतिम सुधारित : 7/13/2020