पाणलोट क्षेत्रातील डोंगराच्या उताराहून खालील भागात वेगात वाहत येणारे पाणी समपातळी चरामध्ये अडविले जाते, त्यामुळे पाण्याचा वेग कमी होतो. तसेच पाण्याबरोबर वाहत आलेली माती चरामध्ये साठून राहिल्यामुळे झाडांची वाढ जोमाने होते. समपातळी चरामध्ये साठलेली माती ही दर तीन वर्षांनी काढून टाकून चर पुन्हा पूर्वीप्रमाणे होतील याप्रमाणे व्यवस्थापन ठेवावे.
2) नालाबांध :
जलसंधारणाच्या दृष्टीने नालाबांध महत्त्वाचा आहे. नाल्यातून वाहून येणारे पाणी पावसाळ्यानंतर येथे साठून राहते. हे पाणी जमिनीत मुरल्यामुळे बांधाच्या खालच्या भागातील विहिरीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होते. दर दोन ते तीन वर्षांनी नालाबांधामधील गाळ काढावा. त्यामुळे पाणीसाठवण क्षमता कायम राहील. नाला बंधाऱ्याच्या एका बाजूला सांडवा दिलेला असतो. जास्तीचे पाणी या सांडव्याद्वारा वाहून जात असते; परंतु काही ठिकाणी सांडवे फुटलेले असतात. ते दर दोन-तीन वर्षांनी दुरुस्त करावेत.
3) वनराई बंधारा ः
हा बंधारा नदी-ओहोळांवर बांधला जातो. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन हा बंधारा घातला जातो. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरून, पिशव्या शिवून बंधाऱ्यासाठी वापरल्या जातात. नदीपात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहास आडव्या अशा रीतीने सांधेमोड पद्धतीने पिशव्या रचाव्यात.
4) कोकण विजय बंधारा ः
नालापात्रात उपलब्ध असलेल्या दगडांचा वापर करून कोकण विजय बंधारा बांधता येतो. यासाठी कुशल कारागिरांची गरज भासत नाही. बंधारा बांधल्यानंतर त्याच्या वरच्या बाजूस म्हणजेच पाण्याकडील बाजूस प्लॅस्टिक अस्तर केल्यास दगडांच्या पोकळ्यांतून होणारी पाण्याची गळती कमी करता येते. ज्या नाल्यावर बंधारा बांधावयाचा आहे, त्याचा उतार तीन टक्क्यांपेक्षा कमी असावा. बंधाऱ्याच्या खालच्या व वरच्या बाजूस नाला सरळ असावा. नाल्यास सुस्पष्ट काठ असावेत. नाल्याची उंची एक ते दोन मीटर असावी.
5) अनघड दगडी बांध ः
पाणलोट क्षेत्रातील वरच्या भागात घळी नियंत्रणासाठी अनघड दगडी बांध परिणामकारक आहेत. यामुळे वाहत्या पाण्याची गती कमी होते. पाण्याबरोबर वाहून आलेली माती बांधाच्या वरच्या बाजूला साठविली जाते, त्यामुळे जमिनीच्या होणाऱ्या धुपेस प्रतिबंध निर्माण होतो. बांध घालावयाची जागा खडकाळ असू नये, तसेच दगडी बांधासाठी स्थानिक स्तरावर दगड उपलब्ध असणे आवश्यक आहे. दगडी बांध बांधताना पाया चांगला खोदून घ्यावा. दगड सांधमोड पद्धतीने रचावेत, त्यामुळे दगड मजबूत बसतील. दोन दगडांतील पोकळ्या लहान दगडांनी भरून काढाव्यात.
6) गॅबियन बंधारा ः
गॅबियन बंधारा बांधावयाच्या नाल्याची रुंदी दहा मीटरपेक्षा अधिक असू नये. नाल्याच्या वळणावर हा बंधारा बांधू नये. गॅबियन बंधाऱ्याची उंची एक मीटरपेक्षा जास्त नसावी. ज्या ठिकाणी खडक, मुरूम आहे, अशा ठिकाणी गॅबियन बंधारा बांधू नये. नाल्याच्या पात्रात ज्या ठिकाणी बंधारा बांधावयाचा आहे, त्या ठिकाणी दोन्ही बाजूंकडील काठ चांगले खोदून घ्यावेत. नंतर बांध बांधावयाच्या जागेवर योग्य आकाराची लोखंडी जाळी अंथरावी, नंतर त्यात दगड रचून घ्यावेत. मोठ्या दगडांमधील पोकळ्या लहान दगडांनी भरून घ्याव्यात. दगड रचून झाल्यानंतर जाळी तारेने बांधून घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत पुरामुळे बांध वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. ज्या ठिकाणी दगड उपलब्ध आहेत, अशा ठिकाणी गॅबियन बंधारा बांधावा. गॅबियन बंधाऱ्यामुळे पाण्याबरोबर वाहून येणारी माती बंधाऱ्याच्या वरच्या बाजूला अडविली जाते.
संपर्क : 02426- 243861
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी