অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

जलसंधारणाचे 'भगीरथ' प्रयत्न

प्रस्तावना

दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या चिखली तालुक्‍यात (जि. बुलडाणा) भगीरथ जलसंजीवनी योजना प्रकल्पांच्या माध्यमातून नदी खोली व रुंदीकरण, बंधारे उभारणीची कामे करण्यात येत आहेत. तालुक्‍यात लोकसहभागातून जलक्रांतीच्या दिशेने टाकलेले हे आश्‍वासक पाऊल आहे. तालुक्‍यात 22 ठिकाणी प्रकल्पांचे काम पूर्ण झाले असून परिसरातील गावे कायमस्वरूपी पाणी टंचाईमुक्त होण्यास मदत मिळणार आहे. अलीकडे राज्याला दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील चिखली तालुक्‍यात परिस्थितीही वेगळी नाही. अलीकडील काळात झालेल्या अत्यल्प पर्जन्यमानामुळे तालुक्‍याला मोठ्या प्रमाणात दुष्काळाचा दाह सहन करावा लागत आहे. मात्र दुष्काळाला इष्टापत्ती समजून मोठ्या प्रमाणात जलसंधारणाची कामे या तालुक्‍यात सुरू झाली आहेत. जेणे करून भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही. आमदार राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका प्रशासन आणि चिखली येथील "अनुराधा मिशन'च्या सहकार्याने विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे त्यातील लोकसहभाग महत्त्वाचा ठरला आहे. 

पाणी पिण्यासाठी अन्‌ शेतीलाही...

चिखली तालुक्‍यातील मोठी नदी असलेल्या हातणी येथील राम नदीच्या रुंदीकरण, खोलीकरण आणि बंधाऱ्यांच्या निर्मितीच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरवात केली आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर बंधाऱ्याच्या माध्यमातून परिसरातील सात ते आठ किलोमीटर परिसरातील गावांत पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत मिळत आहे. तसेच शेतीला मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध होऊन सुमारे 1800 हेक्‍टर जमिनीला सिंचनाचा लाभ होत आहे. या ठिकाणी निर्माण झालेल्या बंधाऱ्यामध्ये जवळपास आठ कोटी लिटर पाणी साठविण्यात आले आहे. 

शेतकऱ्यांत आनंदी वातावरण

केवळ उन्हाळ्यातच नव्हे तर बारमाही टॅंकरग्रस्त असा लौकिक असलेल्या हातणीला पाण्याची टंचाई यंदा जाणवलीच नाही तसेच पाण्याच्या उपलब्धेतमुळे शेतीत विविध पिकांचे नियोजन करणे शक्‍य होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
याच प्रकल्पाच्या धर्तीवर चिखली तालुक्‍यात आमदार बोंद्रे यांच्या पुढाकारातून चिखली अर्बन बॅंकेच्या वतीने चांधई येथे जांबुवंती नदी तर बालाजी अर्बन क्रेडिट को-ऑप. सोसायटी, श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था, आर्यनंदी अर्बन पतसंस्था यांच्या संयुक्त सहभागाने चिखली शहराजवळ जांबुवंती नदीवर जलसंधारण प्रकल्प राबवण्यात आले. त्याचबरोबर सकाळ माध्यम समूहाच्या सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून चिखली-बुलडाणा मार्गावर जांबुवंती नदीवर, दिवठाणा येथे रामगंगा नदी आणि शेलसूर येथे मन नदी, तर अंबिका अर्बन पतसंस्थेच्या वतीने अमडापूर येथे मन नदीवर भगीरथ जलसंजीवनी प्रकल्प राबविण्यात आले. त्याचे दृष्य परिणाम आता दिसू लागले आहेत. परिसरात गावांतील पाण्याची पातळी वाढल्याने आजूबाजूच्या विहिरी आणि बोअरवेल्सला मोठ्या प्रमाणात पाणी वाढले. यापूर्वी महिलांच्या डोक्‍यावर कायमस्वरूपी वाहून नेला जात असलेला पाण्याचा हंडा खाली उतरला. खऱ्या अर्थाने या प्रकल्पामुळे सर्वांत जास्त समाधान कोणाला मिळाले असेल तर ते शेतकरी आणि महिला वर्गाला. गेल्यावर्षी चिखली तालुक्‍यातील 144 गावांपैकी जवळपास 98 गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहावे लागले होते. मात्र या प्रकल्पामुळे तालुक्‍यातील 22 ठिकाणी नदी खोलीकरण आणि रुंदीकरण प्रकल्प राबविण्यात आला. परिणामी पिण्याच्या पाण्याची टंचाई यंदा जाणवली नाही म्हटले तर वावगे ठरणार नाही. 

प्रकल्पाचे स्वरूप

राज्यात सर्वत्र जलसंधारणाचा "शिरपूर पॅटर्न' लोकप्रिय झाला आहे. याच पॅटर्नच्या धर्तीवर नदीमधील गाळ काढून त्या नदीचे पात्राचे खोलीकरण आणि रुंदीकरण करण्यात येत आहे. नदीपात्रामध्ये पाणी साठवण क्षमतेमध्ये वाढ होण्यासोबतच पावसाळ्यात नदीत येणारे पाणी आजूबाजूच्या परिसरामध्ये जिरविण्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत होते. भगीरथ प्रकल्पांतर्गत जलसंधारणाच्या या कामांत नदीपात्रामध्ये 500 मीटर लांब, 50 मीटर रुंद आणि 15 मीटर खोल असे बंधारे बांधण्यात आले. प्रत्येक बंधाऱ्यामध्ये सुमारे साडेसात ते आठ कोटी लिटर पाणी साठविण्याची क्षमता आहे. या बंधाऱ्यामध्ये पाणी साठविण्यापूर्वी डिसेंबर महिन्यापर्यंत नदी वाहत असते. त्यामुळे कितीतरी पाणी जमिनीमध्ये झिरपून आजूबाजूच्या परिसराचा जलस्तर वाढतो आहे. त्यामुळे बारमाही टॅंकरग्रस्त असलेल्या हातणी सारख्या गावांचा पिण्याचा पाण्याच्या प्रश्न आता सुटतो आहे. सोबतच परिसरातील जलस्तर वाढल्याने शेतकऱ्यांच्या शेतीलाही हंगामी पाण्याची सोय होत आहे. 

भगीरथ प्रकल्पाचे लाभ

1) भगीरथ प्रकल्पात राम नदी विस्तारीकरणानंतर हातणी परिसरात 11 ठिकाणी 500 मीटर लांब 50 मीटर रुंद आणि 15 मीटर      खोल बंधारे बांधले. 
2) प्रत्येक बंधाऱ्यात सुमारे साडेसात ते आठ कोटी लिटर पाणी साठवणक्षमता 
3) अकरा बंधाऱ्यांचा विचार करता सुमारे 82 कोटी 50 लाख लिटर पाणी साठविले जाणार. नदी वाहती आहे तोवर जमिनीत पाणी    झिरपत राहून आजूबाजूच्या परिसराचा जलस्तर वाढणार. यामुळे गावांच्या पिण्याच्या पाण्यासोबत शेतीलाही पाणी मिळणार. 

सकाळ रिलीफ फंडाची मदत

गेल्या वर्षी राज्यात पडलेला भीषण दुष्काळ पाहता सकाळ माध्यम समूहाच्या वतीने अनेक ठिकाणी सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी निधी देण्यात आला. या धर्तीवर या भगीरथ जलसंजीवनी प्रकल्पाच्या उभारणीसाठीही सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून मदत करण्यात आली. चिखली तालुक्‍यात चिखली, दिवठाणा आणि शेलसुर येथील नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामासाठी प्रत्येकी दोन लाख याप्रमाणे एकूण सहा लाख रुपयांची मदत केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही चिखली येथे जांबुवंती नदीवर सुरू असलेल्या खोलीकरण आणि रुंदीकरण प्रकल्पाला भेट देऊन माहिती घेतली. 

शिरपूर पॅटर्नच्या धर्तीवर उभा करण्यात आलेल्या या प्रकल्पासाठी अनुराधा मिशनच्या वतीने तीन लाख रुपयांचा प्रारंभिक निधी मिळाल्यानंतर या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. नदी परिसरातील नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या प्रकल्पाचा लाभ होणार असून तालुक्‍यात अशा उपक्रमांसाठी लोकसहभागाची चळवळ उभी राहत आहे. चिखली तालुक्‍यामध्ये आत्तापर्यंत 22 ठिकाणी हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यंदा तालुक्‍यामध्ये पळसखेड जयंती आणि सावरगाव डुकरे या गावांत नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाच्या कामांना लोकसहभागातून सुरवात झाली आहे. या प्रकल्पासाठी शहरातील विविध बॅंका पतसंस्था आणि सकाळ माध्यम समूहाने सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून केलेली मदत ही निश्‍चित स्पृहणीय आहे. यामुळे कामाचा वेग वाढविण्यासाठी मदत होते. हा प्रकल्प संपूर्ण मतदारसंघात राबविण्याचा मानस आहे. 

राहुल बोंद्रे- 9822224100 
आमदार, चिखली, जि. बुलडाणा

लेखक : संजय खेडेकर

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate