অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

पावसाळ्यात वीज जाते....वीज येते...

पावसाळ्यात वीज जाते....वीज येते...

विजेशिवाय जगण्याची कल्पना देखील करू शकत नाही इतके विजेचे महत्त्व आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे विजपुरवठा खंडित होतो. विजपुरवठा खंडित झाला की, आपल्या संतापाचा पारा चढतो. परंतु वीज जाते हे वास्तव आहे. विशेषत: पावसाळ्याच्या सुरुवातीला विजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार जास्त होतात. विजपुरवठा खंडित झाला की आपण वीज वितरण कंपनीला दोष देऊन मोकळे होतो. त्याच्या बातम्याही येतात. परंतू वीज का गेली? का जाते, या प्रश्नाचे उत्तर बहुतांश जणांना माहिती नसते आणि हेच समजून घेण्याची गरज आहे.

रात्री-अपरात्री वीज गेल्यानंतर काही वेळातच ती परत येते. विजेची यंत्रणा अशी यंत्रणा आहे की, ती चालू अथवा बंद करण्यासाठी व्यक्तीची गरज लागते. शिवाय या यंत्रणेत जिवाला धोका असतो. मोबाईल किंवा टेलिफोनचे तसे नाही. त्याचे एकदा कनेक्शन घेतले की, त्याची सेवा संबंधित कंपनीला एका ठिकाणी बसून चालू अथवा बंद करता येते. तिही कोणत्याही जोखमीशिवाय. वीज यंत्रणा त्याला अपवाद आहे. जर रात्री-अपरात्री गेलेली वीज काही वेळात परत येत असते तेव्हा कुणीतरी त्या पावसात किंवा अंधारात स्वत:चा जीव धोक्यात घालून पोलवर चढलेला असतो. तेव्हा कुठे वीज येते. त्यामुळे वीज यंत्रणेवर निव्वळ दोषारोप करण्यापेक्षा त्याच्यातील गुंतागुंत समजून घेतली पाहिजे.

पारंपरिक किंवा अपारंपरिक स्रोतांपासून देशाच्या कानाकोपऱ्यात निर्माण झालेली वीज ग्राहकांच्या दारात आणणे तेवढे सोपे नाही. त्यासाठी लाखो किलोमीटर वीज वाहिन्यांचे जाळे देशात सर्वदूर पसरलेले आहे. त्याला ग्रीड म्हणतात. हा सारा पसारा उघडा आहे. नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींचा या यंत्रणेवर परिणाम होऊन त्यात बिघाड होण्याची शक्यता असते. चक्रीवादळ, पूर, रस्ते अपघात यामुळे यंत्रणा कधी-कधी ठप्प होते. एखादी उच्चदाब वाहिनी कोसळली, तर कधी एखादा जिल्हा किंवा काही तालुके अंधारात जातात, तर हा बिघाड गाव किंवा काही भागापुरताही मर्यादित असतो. पावसाळ्याच्या सुरुवातीला वादळवारा आणि आकाशातील विजेचा कडकडाट सर्वांनीच अनुभवलेला आहे. तारेच्या जाळ्यातून घरात आलेली वीज असो की आकाशात लखलखणारी वीज असो, दोन्हीमध्ये प्रचंड ऊर्जा असते. आकाशात विजेचा कडकडाट सुरू झाला की, घरातील वडीलधारी माणसे वीज उपकरणे बंद करतात. कारण उच्च दाबामुळे ती जळण्याची शक्यता असते. दोन विद्युत चुंबकीय क्षेत्र एकत्र आल्याने दाब वाढतो आणि यंत्रणा बंद पडते. नव्हे, तशी सोयच यंत्रणा वाचविण्यासाठी केलेली असते.

दुसरी बाब म्हणजे वीज खांबात वीजप्रवाह उतरू नये, यासाठी चॉकलेटी रंगाचे चिनी मातीचे इन्सुलेटर खांबावर बसविले जातात. बहुधा हे इन्सुलेटर उन्हामुळे किंवा वीजप्रवाहामुळे गरम होतात आणि त्यावर पावसाचे थेंब पडताच त्याला तडे जातात, ज्यामुळे वीजप्रवाह खांबातून वीजप्रवाह खांबातून जमिनीतून उतरतो अन् लागलीच आपत्कालिन यंत्रणा कार्यान्वित होऊन फीडर (वीज वाहिनी) बंद पडतो. जर हा फीडर बंद पडला नाही तर जीवित वा वित्त हानी होण्याची शक्यता अधिक असते.

जेव्हा-केव्हा वीजपुरवठा अचानक खंडित होतो, तेव्हा वीज उपकेंद्रातील कर्मचारी जवळच्या उपकेंद्राशी संपर्क साधून त्यांच्याकडे वीज पुरवठा आहे की नाही याची खात्री करत असतात. वीज पुरवठा असल्याची खातरजमा झाल्यानंतर फीडर चालू केला जातो. जर फीडर पुन्हा ट्रिप झाला (बंद पडला) तर मात्र बिघाड झाल्याचे घोषित करण्यात येते. बिघाड शोधणे जिकिरीचे असते. ऊन-वारा, पाऊस किंवा अंधाराची तमा न करताही शोधमोहीम हाती घेतली जाते. कधी बंद पडलेल्या वाहिनीवरील सर्व खांब तपासावे लागतात. तर कधी हा बिघाड काही खांबादरम्यान सापडतो.

वीजकामगार रोज तसे युद्धावर असतात. चूक झाली की जीव जाणार, याची खूणगाठ बांधूनच त्याला खांबावर चढावे लागते. सर्व प्रकारची काळजी घेऊनही वीजकर्मचाऱ्यांना प्राणांतिक अपघाताच्या घटना अधूनमधून घडत असतात. वीज कर्मचारी देखील कुणाचा मुलगा, भाऊ, वडील आणि आपल्यातीलच एक असतो. परंतु मानवी संवेदना इतक्या क्षीण झाल्या आहेत की, एखाद्याच्या जीवाचे मोलही आपण ध्यानात घेत नाही. वीज जाते अन् येते यादरम्यान काय होते, याचा विचार आपण जेव्हा करू त्यावेळी आपण महावितरण किंवा कोणत्याही वीज कर्मचाऱ्याला दोष देणार नाहीत हे मात्र नक्की.

वीज गेल्यास काय करावे अन् काय करू नये

आपल्या घरात ईएलसीबी (अर्थ लिकेज सर्किट ब्रेकर) असणे गरजेचे आहे, जेणेकरून घरातील वीज यंत्रणेत बिघाड झाला तर वीज पुरवठा बंद होऊन जीवितहानी टाळता येईल.

1. अर्थिंग सुस्थितीत असली पाहिजे. गरजेनुसार त्याची तपासणी करावी.

2. वीज उपकरणे किंवा वायरिंग ओलाव्यापासून किंवा पत्र्यापासून सुरक्षित असावी.

3. वीज उपकरणे हाताळताना पायात स्लिपर घालावी आणि वीजपुरवठा बंद झाल्याची खात्री करावी.

4. विद्युत खांब आणि ताणाला जनावरे बांधू नयेत.

5. वीजपुरवठा खंडित झाल्यास 15 ते 20 मिनिटे थांबूनच वीज कंपनीला संपर्क करावा.

6. बिघाड नेमका कोठे झाला याची माहिती असल्यास वीज कंपनीला संपर्क करावा.

7. विजेच्या तारा तुटल्यास त्याला हात लावू नये. तातडीने महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाला त्याची माहिती द्यावी.

लेखक - फुलसिंग राठोड,

जनसंपर्क अधिकारी, महावितरण अमरावती परिमंडळ

माहिती स्रोत : महान्यूज

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate