शासनाने नुकताच एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. गाळयुक्त धरण आणि गाळयुक्त शेती हा तो निर्णय होय. एखादा मोठा प्रकल्प ज्यावेळी पाण्यासाठी बांधला जातो त्यावेळी त्याची क्षमता निश्चित करण्यात येत असते. मात्र कालानुरुप ही क्षमता सातत्याने सारखी राहत नाही. याला प्रमुख कारण अर्थातच पावसाच्या पाण्यासोबत वाहत येणारी माती हेच असते.
पाण्यासोबत येणारी माती धरणाच्या तळाशी जमायला सुरुवात होते. पाणी आणि माती यांची घनता वेगवेगळी आहे. हा भौतिकशास्त्राचा नियम आहे. यामुळे तळाशी माती जमा होत राहणं सुरु असतं. त्यावर असणारे पाणी प्रचंड वजनाने दाब निर्माण करते. परिणामी तो गाळ अधिक घट्ट व्हायला सुरुवात होते. साधारणपणे पावसाच्या पाण्यासोबत वाहून येणारी माती ही आसपासच्या शेतांमधील सुपीक माती असते. ही माती धरणात वर्षानुवर्षे पाण्याखाली दबून राहते. त्यावेळी पाण्यात असणारे पोषणमूल्य क्षार त्यात शोषले जाऊन ही माती ज्याला आपण गाळ म्हणतो हा गाळ अतिशय सुपीक बनत असतो. या रुपाने गाळ स्वत: उत्पादन क्षमता संपन्न बनत असला तरी त्यामुळे धरणाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
साठणाऱ्या गाळाची उंची प्रत्येक पावसाळ्यात इंचा-इंचाने वाढत जाते. परिणामी धरणात बांधकाम करताना अपेक्षित धरण्यात आलेला पाणीसाठा आणि प्रत्यक्षात जमा होणारा पाणीसाठा यामध्ये तफावत निर्माण होते. धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे, असे चित्र आपणास दिसत असले तरी त्यात पाणीसाठा मात्र अपेक्षेपेक्षा कमी असतो. ही स्थिती काही वर्षांनी सर्वच धरणांमध्ये निर्माण झालेली आपणास दिसते. जमा होणारा हा गाळ दाबामुळे कणा कणाने सारे भूक्षेत्र व्यापतो. त्यामुळे जमिनीची सच्छिद्रता कमी होते. धरण बांधण्याचा जो दुसरा उद्देश असतो तो जमा पाणीसाठ्यापैकी काही पाणी भूजल फेरभरण करण्याचा असतो. मात्र जमिनीवर दाटपणे साठलेला हा गाळाचा थर (Silt) हा उद्देश देखील पूर्ण होऊ देत नाही. परिणामी धरणात अपरिहार्यपणे साठत जाणारा गाळ धरणाचा जीव संपवायला सुरुवात करतो. धरण असेल किंवा पाण्याचे इतर साठे ज्यात पाझर तलाव, साठवण तलाव आणि मामा तलाव या सर्वांमध्ये ठराविक काळानंतर क्षमता कमी होवून धरण आणि तलावांचा श्वास कोंडायला लागतो.
साधारणपणे सुपीक अशी शेतीयोग्य जमीन अर्थात माती तयार होण्यासाठी नैसर्गिक प्रक्रियेत दोन कोटी वर्ष लागतात असं विज्ञान सांगते. धरणांमधील आणि तलावांमधील ही सुपीक अशी गाळाची माती शेतात टाकल्यास ती शेतासाठी संजीवनी ठरु शकतो. सर्व नैसर्गिक घटकांनी संपन्न झालेला हा गाळ धरणातून उपसून शेतात टाकल्यास एका बाजूला जितका गाळ काढला तितके घनमीटर पाण्याची क्षमतावृद्धी होत असते. दुसऱ्या बाजूला शेतात कोणत्याही खताशिवाय उत्पादन क्षमतेत वाढ होते.
धरणांचा प्रकल्पखर्च आता खूप मोठा झाला आहे. याला केवळ केली तरतूद आणि बांधले धरण इतक्या मर्यादीत स्वरुपात बघता येत नाही. धरण बांधल्यावर त्याचे धरणक्षेत्र आणि बॅक वॉटर खाली अनेक गावे बुडू शकतात. त्यामुळे त्या विस्थापितांचे पुनर्वसन आणि पर्यावरणविषय नियमांचे पालन यामुळे नवी धरणे सध्या तरी विचारात घेणे शक्य नाही. मात्र सध्या असणाऱ्या धरणांमधील गाळ काढल्यास एकप्रकारे त्या धरणांना आणि तो गाळ शेतात टाकल्याने त्या सर्व शेतांना नवसंजीवनी मिळणार आहे. या पार्श्वभूमीवर "गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शेत " ही आजची काळाची गरज बनली आहे.
शेतीसाठी मूल्यवान अशी सुपीक माती उपलब्ध झाल्यास सध्याच्या जलयुक्त शिवार अंतर्गत निर्माण झालेल्या पाणी साठ्यांच्या माध्यमातून संरक्षित सिंचन उपलब्ध आहे. त्यामुळे ही मोहीम शेतकऱ्यांनाही लाभदायक ठरणारी मोहीम आहे.
-प्रशांत अनंतराव दैठणकर, जिल्हा माहिती अधिकारी, गडचिरोली.
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020
गाळमातीचा वापर करताना फक्त हलक्या आणि कमी पाणी सा...
सहकाराचं मोठं जाळं असलेला महाराष्ट्रातील अहमदनगर ज...
बळीराम जैतू उघडे हे कल्याण तालुक्यातील कांबा येथील...
तलावात जमा झालेल्या गाळमातीत पिकांना पोषक अन्नद्रव...