६ लक्ष २ हजार घनमीटर गाळाचा उपसा
शासन, प्रशासन व सर्वसामान्य जनता एकत्र आले, तर काय चमत्कार घडू शकतो याचा सुखद प्रत्यय जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार मोहिमेतून येत आहे. सध्या जिल्ह्यातील १४० लघु प्रकल्प व तलावांतून एकाचवेळी दररोज हजारो घनमीटर सुपीक गाळाचा उपसा करण्यात येत आहे. जिल्ह्यात गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.
प्रकल्पांमधून काढण्यात आलेल्या गाळाची वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर व अन्य वाहनांच्या प्रकल्प क्षेत्रात लांबच लांब रांगा लागत आहेत. जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते जिल्ह्यात या मोहिमेचा शुभारंभ झाला. तसेच जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे, आरडीसी नरेंद्र टापरे, उपविभागीय अधिकारी, १३ तहसीलदार व पाटबंधारे विभाग यांच्या मदतीने सुयोग्य नियोजन करण्यात आले. या नियोजनाची तंतोतंत अंमलबजावणी करण्यात आल्यामुळे व शेतकऱ्यांचा भरीव प्रतिसाद मिळाल्यामुळे ही मोहिम एक लोकचळवळ बनली आहे. सध्या जिल्ह्यातील १४० लघु प्रकल्प, गाव तलाव यांच्यामधून गाळाचा उपसा करण्यात येत आहे. खामगाव तालुक्याने यामध्ये आघाडी घेतली असून तालुक्यात २३ प्रकल्पांमधून गाळ काढण्यात येत आहे. मेहकर तालुक्यात १९, चिखलीमध्ये १७, बुलडाणा १६, दे.राजा १२, लोणार व सिंदखेड राजा तालुक्यात प्रत्येकी १२ प्रकल्पांमधून गाळ काढण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे जळगांव जामोद तालुक्यात ८, नांदूरा ८, शेगांव ४ व मोताळा तालुक्यात ४ प्रकल्पांमध्ये हे काम चालले आहे. या तालुक्यांमध्येही मोहिमेने वेग घेतला आहे. जिल्ह्यात या मोहिमेला प्रारंभापासूनच उत्साही प्रतिसाद मिळत आहे. सुरूवातीला ५२ प्रकल्पांमधून गाळाचा उपसा सुरू झाला. त्यानंतर पाच दिवसातच हा आकडा ७१ वर गेला. तर पंधरवड्यातच ११७ प्रकल्पांवर गेला आहे. यात वेगाने भर पडत गेल्यामुळे सध्या प्रकल्पांची संख्या तब्बल १४० वर गेली आहे. आज अखेरीस या प्रकल्पांमधून ६ लाख २ हजार घनमीटर गाळ उपसण्यात आला आहे. या गाळाला शेत शिवारात टाकण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे. पावसाळ्याला सुरूवात होत असल्यामुळे धरणातून उपसलेल्या गाळाचा सकारात्मक परिणाम दिसायला लागणार आहे. जलसाठ्यात मोठी वाढ होणार आहे. तसेच विहीरी, विंधन विहीरी व एकूणच भूजल पातळीत वाढ होईल. आगामी काळात यामुळे सिंचनाची भक्कम सोय निर्माण होणार असून शेतकऱ्यांना पीक वाढीस लाभ मिळणार आहे. पावसाच्या ताणाच्या काळात शेतकरी आपल्याकडे असलेल्या जलस्त्रोतांमधून पिकांना पाणी देऊ शकणार आहे.
गाळमुक्त धरणामुळे पिण्याच्या पाण्याचीही मोठी सोय होणार आहे. जलसाठ्यात वाढ होणार असल्यामुळे जीवंत साठ्याचे प्रमाण वाढणार आहे. परिणामी उन्हाळ्याच्या काळात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. अशा सर्व सकारात्मक परिणामांचे दृष्य लवकरच पाहायला मिळेल. लोकसहभागाने मिळालेले बळ या मोहिमेला अधिकाधिक यशस्वी बनवित आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या मोहिमेचा लाभ घेऊन जमिनीची सुपिकता वाढवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
निलेश तायडे,
माहिती सहायक, बुलडाणा
माहिती स्रोत: महान्युज
अंतिम सुधारित : 6/5/2020
आपत्तीच्या काळात लोकप्रतिनिधींना पार पाडावी लागणार...