অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

गवते लावण्याची आवश्यकता

गवते लावण्याची आवश्यकता

वनीकरणामध्ये केवळ झाडे लावून भागणार नाही. फक्त झाडे लावली तर त्यांच्यामधून ज्या मोकळ्या जागा राहतात त्यातून जमिनीची धूप होत राहील, मातीतील ओलावा उडून जाईल. निसर्गात बर्‍याच वेळी अशा ठिकाणी कोणती ना कोणती गवते व इतर लहान वनस्पती उगवतात. पण तण काढायचे म्हणून किंवा साफसफाईच्या नावाखाली सर्व काही उपटून फेकून दिले जाते. कोरड्या, रुक्ष प्रदेशात जवळपास गवते असतील तर झाडांच्या रोपांना ऊनपावसापासून संरक्षण मिळते. पण गवत काढून टाकले की जमीन उघडी पडते. कडक ऊन, मुसळधार पाऊस, सोसाट्याचे वारे यांच्या मार्‍याने ती धूपत जाते. तेव्हा सर्व ठिकाणी जमीन लवकरात लवकर झाकण्यासाठी गवताचा उपयोग करून घेता येईल.

सपुष्प वनस्पती जातींमध्ये सर्वात मोठ्या कुलांपैकी गवताचे कुल आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले तर तृणजाती सर्व जगभर पसरलेल्या आहेत. नदीकाठाने गवते खूप उंच व दाटीने वाढतात. हिमालयाच्या पायथ्याशी तराईध्ये उंच गवतांचे वर्चस्व आहे. कुरणांचे बरेच प्रकार आहेत. काही कुरणांध्ये गवताचे आधिराज्य असते; तर काहींमध्ये झाडांचे प्रमाण जास्त असते. बहुतेक ठिकाणी बहुवर्षायू गवतांची बेटे असतात. त्यामधून दुसरी बहुवर्षायू गवते, शिंबी वनस्पती, वर्षायु गवते व इतर लहान वनस्पती असतात. या गवताळ प्रदेशात ऋतूनुसार बदल होत असतात.काही तृणजाती पावसाळ्याच्या सुरुवातीस वाढतात तर दुसर्‍या काही पावसाळा सुरू होऊन बराच काळ लोटल्यावर वाढू लागतात. उन्हाळ्यात काही गवतांची वाढ भराभर होते तर त्यावेळी इतर काही जाती सुप्तावस्थेत असतात.

गवतांच्या शेकडो जाती आहेत. कोणत्याही पर्यावरणाशी त्या जुळवून घेतात. त्यांची तंतुय मुळे जमिनीच्या वरच्या थरात पसरतात. सूर्यप्रकाश, भुईतील ओलावा आणि पाऊस यांचा उपयोग करून घेण्यात तृणजाती अतिशय कार्यक्षम असतात. अवर्षण, वणवा, चरणे, तुडवणे यांसार‘या प्रतिकूल गोष्टींना त्या चांगले तोंड देतात. काही तृणजाती सावलीत चांगल्या वाढतात. त्या बहुधा पाण्याच्या काठाने वाढलेल्या दिसतात. परंतु गवताच्या बहुतेक जातींना सावली चालत नाही. साधारणपणे गवतांना भरपूर सूर्यप्रकाश लागतो. सावलीत ती मरतात. काही तृणजाती कोरड्या, रेताड जमिनी पसंत करतात तर दुसर्‍या काही चिकण, भारी जमिनीवर, तर काही चुनखडीयुक्त पांढर्‍या मातीवर येतात. काही तृणे सर्वत्र दिसतात तर दुसरी काही विरळ आढळतात.

गवताच्या काही जाती उष्ण, दमट हवेत, सपाट जमिनीवर फोफावतात तर दुसर्‍या काही जातींना डोंगरावरची थंड हवा मानवते. तेव्हा कोणत्याही पर्यावरणात प‘त्येक ठिकाणी भुई आच्छादण्यासाठी कोणती ना कोणती तृणजाती असणारच. आहे त्या जातींचे रक्षण करण्याची व नसतील तेथे नव्याने गवते लावण्याची आवश्यकता आहे. झाडांच्या मानाने गवतांविषयी फारच थोडी माहिती उपलब्ध आहे. त्यांच्या जाती, गुणधर्म, उपयोग व लागवडीविषयक गरजा याविषयी अधिक संशोधन व प्रयोग करण्याची गरज आहे. जमिनीची धूप थांबवण्याचे अत्यंत महत्त्वाचे कार्य गवते करतात. परंतु याशिवाय त्यांचे अनेक उपयोग आहेत. गुरेढोरे, शेळ्या-मेंढ्या हे पाळीव प्राणी मु‘यत: गवतांवरच जगतात. माणसाला या प्राण्यांपासून दूध, दही, लोणी, तूप, मांस मिळते; कातडे आणि लोकर मिळते. गेली काही दशके सोडली तर सर्वत्र शेती बैलांच्या मदतीने केली जाई. लोकांची व मालाची वाहतूक करण्यासाठी बैल व घोडे वापरले जात. पाळीव प्राण्यांप्रमाणे वन्य पशुपक्षीही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या गवतांवर जगतात.

काही गवतांपासून धागे मिळतात. त्यांच्यापासून दोर, दोरखंडे तयार करतात . चटया, पडदे, पंखे, टोपल्या विणतात. वाळा, रोशा, गवती चहा या गवतांपासून सुंगधी उडाऊ तेल काढतात. शेतीमध्ये लावणार्‍या पिकांध्ये तृणधान्ये महत्त्वाची आहेत. सध्या आपल्या जनावरांची परिस्थिती अतिशय दयनीय आहे. त्यांचे मांस मोठ्या प्रमाणावर निर्यात केले जात आहे. त्यासाठी त्यांची हत्या होत आहे. तर दुसरीकडे संकरित जातींचा प्रसार करण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे आपल्याकडील गुरांच्या पुष्कळ चांगल्या जाती नाहीशा होण्याच्या मार्गावर आहेत. भविष्यात शेतकर्‍यांना पूर्वीप्रमाणे बैलांवर अवलंबून राहावे लागणार आहे. विजेचे, डिझेलचे दर वाढत आहेत. शेतीसाठी लागणार्‍या इतर गोष्टींचे भावही वाढत आहेत. त्यामुळे अशी वेळ येणार आहे (किंंवा आत्ताच आली आहे) की शेतकर्‍यांना शेतीकामासाठी बैलांचा उपयोग करणे अपरिहार्य ठरणार आहे. म्हणुनच आहे त्या जनावरांची नीट काळजी घेणे जरुरीचे आहे. त्यासाठी त्यांच्या चार्‍याची व्यवस्था सर्वप्रथम करावी लागेल. हिरवा चारा व वैरणीसाठी मागणी व पुरवठा यात प्रचंड तफावत आहे. चार्‍याची प्रत निकृष्ट व पोषकता कमी असल्यामुळे जनावरांना अपुरा व निकस आहार मिळतो. त्याचा परिणाम दूध उत्पादनावर होतो.

पाश्‍चात्त्य देशात दूधदुभत्याचा धंदा कुरणातील चार्‍यावर विशेष अवलंबून आहे. तिकडे गुराढोरांसाठी कुरणे मुद्दाम राखली जातात. त्यांची चांगली निगा ठेवली जाते. फक्त कुरणातील चार्‍यावर तिकडची दुभती जनावरे खुराक दिलेल्या गुरांइतकेच दूध देतात. या चार्‍यावर मेंढ्यादेखील चांगल्या पोसतात. आपल्याकडे बहुतेक ठिकाणी कुरणांची स्थिती खालावली आहे. गवताचे उत्पादन व कस कमी झाला आहे. जमिनीतील अन्नद्रव्ये व ओलावा कमी झाल्याने निकृष्ट प्रतीची गवते येतात. त्यासाठी कुरणांची स्थिती सुधारणे जरुरीचे आहे. आहे ती कुरणे राखली पाहिजेत. त्यांचा उपयोग शेती व अन्य कारणांसाठी केला जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. तसेच कुरणांप्रमाणे शेतजमिनीवर, पडीक जमिनीवर चांगल्या जातीची गवते व इतर शिंबी कुलातील वनस्पती-चार्‍यासाठी लावल्या पाहिजेत. चार्‍याचे उत्पादन वाढले आणि त्याची प्रत सुधारली तर आपल्या गुराढोरांचे आरोग्यही सुधारेल. साधारणपणे चार्‍याची चांगली वन्य गवते कुरणात लावावीत आणि शेतजमिनीवर लागवडीची चार्‍याची गवते लावावीत. प्रत्येक गावाने आपल्या आसपासच्या सर्व पडीक जमिनीचे रूपांतर कुरणात करावे. कुरणात चार्‍याची गवते, शिंबी कुलातील वनस्पती आणि वैरणवृक्ष असे मिश्रण असावे. नदीकाठी, टेकडीवर, कालवे व पाटांच्या कडेने, पडीक, खार्‍या किंवा नापीक जमिनीवर कुरणे तयार करता येतील.

 

माहिती लेखन : वनराई संस्था

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate