অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

निचरा प्रणालीचे नियोजन

निचरा प्रणालीचे नियोजन

जमिनीची कमी निचरा क्षमता, भूपृष्ठापासून कमी खोलीवर अभेद्य थर, पाण्याचा अनियंत्रित वापर, खारवट पाण्याचा शेतीसाठी वापर, कॅनॉल, तलावातून पाण्याचा पाझर, फेरपालटीचा अभाव, सेंद्रिय खतांचा कमी वापर, विस्कटलेली नैसर्गिक निचरा पद्धती यांसारख्या कारणांमुळे भारी काळ्या जमिनीमध्ये क्षार आणि पाण्याचे प्रमाण वाढत आहे. या जमिनींची सुपीकता कायम ठेवण्यासाठी सामूहिक पद्धतीने पाणी निचरा प्रणालीचा वापर करणे आवश्‍यक आहे.

सध्याच्या काळात क्षारपड व पाणथळ जमिनींच्या सुधारणेसाठी निचरा पद्धतीचा वापर महत्त्वाचा आहे. जोपर्यंत जमिनीत निचऱ्याचे प्रमाण वाढणार नाही तोपर्यंत कोणतीही भूसुधारके वापरून क्षारपड जमिनी लागवडीखाली आणणे शक्‍य होणार नाही. यासाठी निचरा पद्धतीची आखणी ही तांत्रिकदृष्ट्या व्यवस्थित करावी लागते. ही आखणी करताना क्षारपड क्षेत्राची सर्वेक्षण, कंटूर नकाशा, निचऱ्याचे पाणी निर्गमित करण्याची व्यवस्था, मातीतील क्षारांची संलग्न असणारे भौतिक व रासायनिक गुणधर्म, सच्छिद्रता, भूमिगत जलाची पातळी, पाण्याची क्षारता, जलीय संचालकता, पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आणि पीक पद्धती आदी बाबींचा विचार करावा.


निचरा पद्धतीमुळे फायदे :


1) विविध पद्धती पिकांच्या वाढीसाठी योग्य असे जमिनीत वातावरण तयार करते. जमिनीत हवा खेळती राहण्यास मदत करते. जमिनीत असणाऱ्या पोषक जिवाणूंची वाढ होते. 
2) पिकाच्या कार्यक्षम मुळांची खोली वाढली जाऊन त्यामुळे पीक जोमदार वाढते. 
3) जमिनीचा पोत सुधारून पाणी मुरण्याच्या प्रक्रियेमध्ये वाढ होते. 
4) प्रमाणशीर मशागत करण्यास सोईस्कर जाते. 
5) जमिनीचे तापमान पिकास योग्य असे राखले जाते. 
6) जमिनीच्या भूपृष्ठावर क्षार साठवण्याची क्रिया मंदावते, जमीन लागवडीस योग्य होते. 
7) वाफसा लवकर आल्यामुळे लागवड लवकर करता येते, बीजांकुरण वाढण्यास मदत होते.


...अशी आहे निचरा प्रणाली


निचरा पद्धतीमध्ये मुख्यतः जमिनीवरील उघडे चर निचरा पद्धत व भूपृष्ठाखालील (भूमिगत) निचरा पद्धत या दोन पद्धतींचा समावेश होतो. भूमिगत निचरा पद्धतीचे जमिनीवरील उघडे चर निचरा पद्धतीपेक्षा खालीलप्रमाणे अनेक फायदे मिळतात. 

निचरा पद्धती :


उघडे चर निचरा पद्धती :
1) जमिनीमधील पाण्याच्या प्रवाहाची दिशा साधारणतः उंच भागाकडून सखल भागाकडे असल्यामुळे उताराला आडवे चर काढावेत. हे उघडे चर काढत असताना खाली तांत्रिक बाबी विचारात घेणे आवश्‍यक आहे. 
2) उघड्या चरांचा शेवट ओढ्याला, मोठ्या नाल्याला व नदीला करण्यासाठी सर्व आडवे चर उभ्या चराला जोडून घ्यावेत. चराला 0.10 टक्का उतार द्यावा. 
3) या चरांना कार्यक्षमपणे चालू ठेवण्यासाठी याच साठवलेला गाळ, वाढलेले तण, पाणकणीस, वेळोवेळी काढून चर स्वच्छ ठेवावेत. या पद्धतीसाठी हेक्‍टरी 10,000 ते 15,000 खर्च येतो. 
4) उघड्या चरीमध्ये दगड-गोटे, मुरूम किंवा वाळू वापरून 1 ते 1.5 फूट जाडीचा थर देऊन या चरी मातीने बुजवून घेतल्यास ही पद्धत भूमिगत निचरा पद्धतीसारखी वापरता येते. असे केल्याने उघडे चर पद्धतीतील वारंवार दुरुस्ती, पाणकणीस काढणे, जमीन वाया जाणे, चरीच्या कडा ढासळणे यांसारख्या येणाऱ्या अडचणीवर मात करता येते.


भूमिगत/ बंदिस्त सच्छिद्र पाइप निचरा पद्धत :


1) भूपृष्ठापासून 0.9 ते 1.8 मीटर खोलीचे चर काढून त्यामध्ये सच्छिद्र पीव्हीसी निचरा पाइप उताराला आडवे टाकून त्या पाइपभोवती गाळप (फिल्टर) म्हणून 7.5 ते 10 सें.मी. जाडीचा आकाराचा चाळ वाळूचा थर किंवा सिंथेटिक फिल्टर पाइपभोवती गुंडाळून हे पाइप जमिनीमध्ये विशिष्ट उतार देऊन गाडावेत. 
2) या पद्धतीत लॅटरल (उपनळ्या) पाइप, कलेक्‍टर (उपमुख्य नळी) पाइप आणि मेन पाइप (मुख्य नळी) एकमेकांना अशा पद्धतीने जोडल्या जातात, की जेणेकरून पिकांच्या मुळांच्या कक्षेतील क्षार व अतिरिक्त पाणी मातीतून पाझरून प्रथम लॅटरल पाइपमधून वाहत येणारे पाणी आणि क्षार कलेक्‍टर पाइपमध्ये येऊन कलेक्‍टर पाइपमधून मुख्य पाइपवाडे शेवटी नैसर्गिक ओढा, नाला किंवा नदीमध्ये सोडावे. 
3) ज्या ठिकाणी नैसर्गिक उगमस्थान नसेल त्या ठिकाणी मुख्य नळीतून निचरा होणारे पाणी संपवेल (विहीर) किंवा तलावामध्ये साठवून उपसा करून शेताबाहेर काढावे. 
4) या भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा पद्धतीसाठी हेक्‍टरी 75,000 ते 80,000 रुपये खर्च येतो. हा खर्च अधिक वाटत असला तरी या पद्धतीचे आयुष्य कमीत कमी 20 ते 25 वर्षे असते.


भूमिगत/ बंदिस्त सच्छिद्र पाइप निचरा पद्धतीचे फायदे :


1) भूमिगत निचरा पद्धत पूर्णतः जमिनीखाली 0.9 चे 1.8 मीटर खोलीवर असल्यामुळे जमिनीवरील उघड्या चरीप्रमाणे जमीन वाया जात नाही. 
2) उघड्या चरीप्रमाणे कडा ढासळणे, पाणकणीस वाढणे, वारंवार देखभाल व दुरुस्तीचा खर्च येत नाही. 
3) उघड्या चरीप्रमाणे यांत्रिक मशागत, आंतरमशागत, अवजारे वाहतूक इ. कामांना अडथळे येत नाही. 
4) मातीची धूप होत नाही. 
5) उघड्या चरीपेक्षा 20 ते 25 वर्षे अधिक कार्यक्षमतेने चालू राहते.


भूमिगत निचरा पद्धतीसाठी लागणारे साहित्य :


1) सच्छिद्र बांगडी पीव्हीसी निचरा पाइप : हे पाइप 80, 100, 160, 200, 294, 355, आणि 455 मि.मी. लांब आणि 0.8 ते 2.0 मि.मी. रुंदीची चौकोनी छिद्रे असतात. चौकोनी छिद्रांची संख्या एक मीटर पाइप लांबीमागे 100 ते 120 असते. 
2) गाळाची (फिल्टर) पाण्याबरोबर मातीचे सूक्ष्म कण पाइपमध्ये जाऊ नयेत म्हणून पाइपच्या वर 7.5 ते 10 सें.मी. जाडीच्या सिंथेटिक फिल्टरचा वापर सर्रास केला जात आहे. कारण यामुळे वाहतुकीचा, मजुरीचा खर्च कमी येतो. तसेच चरीमध्ये पाइप अंथरताना त्रास होत नाही. पाइपची छिद्रे बंद होण्याचा धोका नाही.


पाइप जोडकामांसाठी लागणारे इतर साहित्य :


> टी (T) ः लॅटरल्स 90 अंशात कलेक्‍टर पाइपला जोडण्यासाठी याचा उपयोग होतो. 
> कपलर ः दोन पाइपचे तुकडे एकमेकांना जोडण्यासाठी कपलरचा उपयोग होतो. 
> एन्डकेर ः पाइपचे एका बाजूचे तोंड बंद करण्यासाठी वापरले जाते. 
> वाय (Y) सांधा ः लॅटरल 90 अंश कोनापेक्षा कमी कोनामध्ये कलेक्‍टर पाइपला जोडताना याचा वापर होतो. 
4) इन्स्पेक्‍शन चेंबर : प्रत्येक चार लॅटरल नंतर एक इन्स्पेक्‍शन चेंबर कलेक्‍टर पाइपवर बसवावा, यासाठी साडेतीन फूट व्यासाचे आणि आठ फूट खोलीचे सिमेंटचे चेंबर वापरावे. निचरा पद्धत व्यवस्थित चालू आहे का? याची तपासणी करण्यासाठी याचा उपयोग होतो.

निचरा पद्धतीचे आराखडे :


भूपृष्ठाचा उंच- सखलपणाचा विचार करून आराखड्याचे प्रकार पडतात. आपल्या शेतीनुसार निचरा पद्धतीचा अवलंब करावा. 
1) रॅन्डम निचरा पद्धत : 
जमिनीच्या उंच-सखलपणामुळे संपूर्ण शेतजमिनीवर पाणथळ क्षारपडीची समस्या उद्‌भवत नाही. त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी जमीन क्षारपड- पाणथळ झालेली असले अशाच ठिकाणी निचरा पद्धत बसवावी. त्यामुळे कमी खर्चात निचरा आणि जमीनही सुधारते. यालाच रॅन्डम निचरा पद्धत म्हणतात. 
2) समांतर निचरा पद्धत ः 
ज्या जमिनी सपाट आणि नियमित आकाराच्या असतात. अशा जमिनीत उपनळ्या एकमेकींस समांतर आणि उपमुख्य नळीस काटकोनात जोडल्या जातात. या पद्धतीत उपनळ्या उताराला आडव्या तर उपमुख्य नळ्या उताराच्या दिशेने बसवाव्यात. त्यामुळे उतारावरील पाणी पाझरून उपनळी, मिळते आणि उपनळीतील पाणी उपमुख्य नळीत जाऊन मुख्य पाइपद्वारे शेवटी ओढ्यात किंवा संपवेलमध्ये जाते. 
3) हेरिगबोन पद्धत ः 
ही पद्धत माध्यम ते जास्त उताराच्या साधारणतः व्ही किंवा यू आकाराच्या जमिनीत उपनळ्या एकमेकींस समांतर, परंतु मुख्य उपमुख्य नळीस एका बाजूने किंवा दोन्ही बाजूंनी 45 अंशांनी जोडल्या जातात. 
4) इंटरसेप्टर निचरा पद्धत ः 
कॅनॉल, तलाव यामधून पाझरून येणारे पाणी तसेच जास्त उताराच्या जमिनीकडून सखल भागाकडे येणाऱ्या पाण्यास अडवून जमीन क्षारपड पाणथळ होण्यापासून वाचविण्यासाठी इंटरसेप्टर निचरा पद्धत वापरावी. 

निचरा पाइपची खोली :


निचरा पाइपची खोली, पिकांचा प्रकार व कार्यक्षम मुळाची खोली, जमिनीचा प्रकार, अभेद्य थराची खोली, नाल्याची खोली इ, बाबीवर अवलंबून असते. तसेच खोली ठरविताना विविध पिकांचे चांगले उत्पादन घेण्यासाठी आवश्‍यक असणारी कमीत कमी भूजल पातळी खालीलप्रमाणे योग्य राखली जाईल याची दक्षता घ्यावी.


दोन निचरा पाइपमधील अंतर :


दोन निचरा पाइपमधील अंतर, मातीची जलसंचालकता, निचरा सच्छिद्रता, अभेद्य थराची खोली, सध्याची जमिनीतील पाण्याची खोली आणि निचरा पद्धतीनंतरची पाण्याची पातळी इ. बाबीवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे भारी जमिनीसाठी हे अंतर 10 ते 15 मीटर, मध्यम जमिनीसाठी 15 ते 30 मीटर, तर वालुकामय जमिनीसाठी 30 ते 60 मीटर ठेवावे.


लॅटरल व कलेक्‍टर पाइपसाठी ढाळ :


सपाट जमिनीत निचराप्रणाली वापरताना लॅटरल व कलेक्‍टरला जास्त ढाळ द्यावा, जेणेकरून पाण्याचा निचरा लवकर होईल. त्याचबरोबर निचरा पाइपची खोली 80 सें.मी.पेक्षा कमी होणार नाही, याचीही काळजी घ्यावी. निचरा पाइपला जास्तीत जास्त दोन टक्के ढाळ द्यावा. पण कमीत कमी ढाळ देताना वेगवेगळ्या व्यासाच्या पाइपसाठी खालीलप्रमाणे ढाळ द्यावा.


लॅटरल व कलेक्‍टर पाइपची कमीत कमी व जास्तीत जास्त लांबी :


सर्वसाधारणपणे निचरा पाइपची कमीत कमी लांबी ही नेहमी त्या दोन निचरा पाइपमधील अंतराच्या दुप्पट ठेवावी. तर जास्तीत जास्त लांबी 600 मीटरपर्यंत ठेवू शकते. कारण ढाळ देताना येणाऱ्या अडचणी व आऊटलेटची स्थिती यावरून लॅटरलची जास्तीत जास्त लांबी ठरवावी.


निचरा पद्धतीची आऊलेटसंबंधी घ्यावयाची काळजी :


आऊटलेटमधून नाल्यामध्ये पडणाऱ्या पाण्याला अडथळा होऊ नये म्हणून हे आऊटलेट नाल्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या पातळीमध्ये नेहमी 30 ते 45 सें.मी. वर असावे. आऊटलेट पाइपच्या टोकाला जाळी असलेले टोपण बसवावे, त्यामुळे उंदीर, बेडूक, साप पाइपमध्ये शिरणार नाहीत.


निचरा पाइपची कमीत कमी खोली :


मशागतीसाठी वापरल्या जाणाऱ्या यांत्रिक साधनामुळे सच्छिद्र पाइपला धोका होऊ नये यासाठी ते पाइप कमीत कमी 80 सें.मी, खोलीवर गाडावेत.


मोल निचरा पद्धत :


1) ज्या जमिनीमध्ये चिकणमातीचे प्रमाण 35 टक्केपेक्षा जास्त आहे, अशा जमिनीच्या निचऱ्यासाठी कमी खर्चिक मोल निचरा पद्धत आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते. 
2) मोल निचरा पद्धतीमध्ये मोल नांगराद्वारे जमिनीपासून 40 ते 75 सें.मी. खोलीवर पाइपसारखे पोकळ आडवे छिद्र पाडले जाते यालाच मोल असे म्हणतात. हे मोल नेहमी जमिनीच्या उताराला समांतर काढावेत. जमिनीत हे मोल पाडत असताना जमिनीच्या पृष्ठभागापासून मोलपर्यंत जमिनीचा भाग हा मोल नांगराच्या पातळ प्लेटद्वारे कापले जाऊन एक पोकळ फट तयार होते. 
3) मोल तयार झाल्यानंतर 10 ते 15 दिवसांनी मशागत करावी जेणेकरून मोल वाळण्यास अवधी मिळून ते टणक बनतील. पिकाला पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस पडल्यानंतर जमिनीवरील पाणी हे मोल नांगराद्वारे जमिनीमध्ये पडलेल्या फटीतून मोलमध्ये जमा होते. 
4) जमिनीमध्ये मुरलेले जास्तीचे पाणी सुद्धा मोलमध्ये जमा होऊन जमिनीच्या उताराच्या दिशेने जमिनीबाहेर जाते. अशा प्रकारे जमिनीतील पाण्याचा निचरा होतो.
5) या पद्धतीत साध्या नांगरटीप्रमाणे मोल नांगर ट्रॅक्‍टरला जोडून वापरले जाते. तसेच प्रत्येकी चार मीटर अंतरावर हे नांगर वापरायचे असल्याने नांगरटीपेक्षाही कमी खर्च येतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची भूमिगत सच्छिद्र पाइप निचरा वापरण्याइतकी आर्थिक परिस्थिती नाही अशा शेतकऱ्यांना कमी खर्चिक मोल निचरा पद्धतीचा वापर करून क्षारपड-पाणथळ जमिनीमध्ये पिकांचे उत्पादन वाढविता येईल.


मोल निचरा पद्धत वापरण्यापूर्वी घ्यावयाची दक्षता :


1) जमिनीमध्ये चिकण मातीचे प्रमाण 35 टक्केपेक्षा जास्त असावे. 
2) जमीन नैसर्गिक उताराची असावी. उतार कमीत कमी 0.2 टक्का असावा. साधारणतः 1 ते 1.5 टक्का उतार असलेली जमीन मोल निचरा पद्धतीसाठी उत्कृष्ट असते. 
3) मोल करताना 40 ते 75 सें.मी. खोलीवर मातीमध्ये ओलाव्याचे प्रमाण 20 ते 25 टक्के असावे. या खोलीवरील माती कोरडी असेल तर तयार होणाऱ्या मोलच्या कडा कोसळतात. तर ओलावा जास्त असेल तर नांगर ओढण्यासाठी वापरलेला ट्रॅक्‍टर जमिनीमध्ये रुतू शकतो. यासाठी मोल नांगर वापरण्याचे वेळी ज्या खोलीवर नांगर वापरायचा आहे. त्या खोलीवर मातीतील ओलावा साधारणतः 20 ते 25 टक्के असावा. 
4) मोल मधून निचरा होणारे पाणी शेताबाहेर काढण्यासाठी शेताजवळ 75 ते 90 सें.मी. खोलीची उघडी वर असावी. 
5) दोन मोलमध्ये सर्वसाधारणपणे चार मीटर अंतर ठेवावे. 
6) मोलाची खोली 40 ते 75 सें.मी. ठेवावी. 
7) मोलाची लांबी सामान्यतः 20 ते 100 मीटर ठेवावी. 
8) मोल निचरा करण्यासाठी साधारणतः 75 किंवा त्यापेक्षा जास्त हॉर्सपॉवरचा ट्रॅक्‍टर वापरावा. 
9) मोल करत असताना ट्रॅक्‍टरचा वेग सामान्यतः एक कि.मी. प्रति तास किंवा कमी ठेवावा. 
10) मोल निचरा पद्धतीसाठी साधारणतः हेक्‍टरी 3000 ते 4000 रुपये इतका खर्च येतो. 
11) मोल निचरा पद्धत योग्य पद्धतीने केल्यास तीन ते पाच वर्ष टिकू शकते. 

संपर्क : श्री. कांबळे : 8275376948 
(लेखक कृषी संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली येथे कार्यरत आहेत.)

 

माहिती संदर्भ : अॅग्रोवन

 

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate