पाण्यासाठी भ्रमंती करणारे गाव, सिंचनाचा भरवसा नसणारे मौजे शिरूर अनंतपाळ हे तालुक्याचे गाव (जि. लातूर) पाण्याबाबत आज स्वयंपूर्ण झाले आहे. लोकसहभाग व श्रमदानातून उभारलेला गॅबिया, तसेच भूमिगत बंधारा अशा जल- मृद् संधारणाच्या उपचारांमुळे "गाव करी ते राव न करी' या उक्तीप्रमाणे तेथे आज बदल घडला आहे. लातूर जिल्ह्यात मौजे शिरूर अनंतपाळ हे तालुक्याचे ठिकाण आहे. गावची लोकसंख्या सुमारे 18 हजार आहे. घरणी नदीच्या काठी गाव असूनही पिण्याच्या पाण्याची समस्या येथील गावकऱ्यांना नेहमी भेडसावत असे. पावसाळा कमी झाला की ग्रामपंचायतीच्या विंधन विहिरी कोरड्या पडतात आणि पाण्यासाठी भटकंती सुरू होते. अनेक वर्षांपासून हे चित्र असेच सुरू होते.
गावापासून सहा किलोमीटरवर घरणी नदीवरील मध्यम सिंचन प्रकल्प आहे. या धरणावरूनच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने 17 गावांसाठी पाणीपुरवठा योजना चालू केली आहे. मात्र वीजबिल थकले की "कनेक्शन' कट होई आणि पाण्यासाठी भटकंती सुरू राही. पाऊस कमी पडला तर मग धरणातच पाणी नसे. या योजनेत सर्वांत मोठे गाव म्हणजे शिरूर अनंतपाळ. पाणीपुरवठा योजनेतून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने तेथील ग्रामपंचायतीने नदीकाठी 18 विंधन विहिरी घेतल्या आहेत. प्रत्येक विहिरीतील थोडे थोडे पाणी एकत्र केले जाई. कोणतीच विंधन विहीर पूर्ण क्षमतेने चालत नव्हती. सुमारे 250 ते 500 फुटांपर्यंत या विंधन विहिरींची खोली आहे. नदीलाही पाणी येऊन न गेल्याने बोअरलाही पाणी नव्हते.
आर्ट ऑफ लिव्हिंगने दिली स्फूर्ती
"आर्ट ऑफ लिव्हिंग' संस्थेच्या बंगळूर येथील आश्रमात फेब्रुवारी 2013 मध्ये पाण्याविषयी साक्षरता निर्माण करण्यासाठी शिबिर झाले. शिरूर अनंतपाळ येथील अनंत पंडितराव आचवले हेदेखील आपल्या तालुक्यातील 45 सहकाऱ्यांसमवेत तेथे गेले होते. शिबिरामध्ये आदर्श ग्राम योजनेचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्यासारख्या मान्यवरांनी प्रबोधन केले. शिबिरावरून आल्यानंतर लातूर येथे "आर्ट ऑफ लिव्हिंग'च्या या कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्या वेळी शिरूर अनंतपाळ येथील घरणी नदीवर जमिनीखाली भूमिगत बंधारा व त्याच्यावर गॅबियन बंधारा बांधण्याचे ठरले.
आणि कामांना झाली सुरवात
घरणी नदीवर धरण झाल्यामुळे नदीला पूर कधी तरी येई. त्यामुळे पात्र उथळ झाले होते. नदीपात्रात झाडेझुडपे वाढली होती. नदीपात्रात गाळ साचल्याने जल पुनर्भरणाचे काम थांबले होते. त्यामुळे बोअरला पावसाळ्यातच थोडेफार पाणी राहायचे. यातून मार्ग काढण्यासाठी "आर्ट ऑफ लिव्हिंग'चे डॉ. शशी चौधरी, ऍड. त्रिंबकदास झंवर, मकरंद जाधव, महादेव गोमारे, कैलास जगताप, जयवंत कोनाळे यांनी पुढाकार घेत उपक्रमात मोलाचा वाटा उचलला. गावच्या नागरिकांना हिंमत दिली. त्यांचे मतपरिवर्तन करणे, काम सुरू असताना भेटी देऊन अडचणी सोडवणे, आर्थिक मदत करणे, अशी कामे केली. गॅबियन व भूमिगत बंधाऱ्यासाठी जागानिश्चितीचे काम पाटबंधारे विभागाचे उप-अभियंता प्रकाश फंड व बाळासाहेब शेलार व जीएसडीएचे श्री. शेख यांनी केले.
जागानिश्चितीनंतर बंधाऱ्याबरोबरच नदीचे पात्र रुंद व खोल करण्याचीही गरज होती. शिबिरातून परत आल्यानंतर नदीवर गॅबियन स्ट्रक्चर बांधण्यासाठी गावात बैठक घेण्यात आली. गावाजवळच पाणी लागत असल्यामुळे या परिसरात शेतकऱ्यांचे 300 बोअर आहेत. मात्र गॅबियन बंधारा झाला तर आम्हाला शेतात लांबून जावे लागेल, असे त्यांचे म्हणणे पडले. त्यानंतर घरोघरी जाऊन या उपक्रमाचे महत्त्व सांगण्यात आले.
हळूहळू विरोध मावळू लागला.
विरोध मावळू लागला तसतसे लोक एकत्र येऊ लागले आणि 32 हजार रुपयांची वर्गणी गोळा झाली. या पैशातूनच भाड्याने पोकलॅन यंत्र आणण्याची हिंमत केली. काम दिसू लागले तसतसे लोक पुढे येऊ लागले. कोणी वर्गणी देऊ लागला, कोणी श्रमदान करू लागला. काहींनी ट्रॅक्टर मोफत दिले, तर काहींनी आपल्या विहिरींवरील दगड मोफत दिले. गरीब-श्रीमंत असा भेद राहिला नाही. सर्वच जण आपल्या ऐपतीप्रमाणे मदत करत होते. ज्यांचे मजुरीवर पोट आहे अशा महिला सर्वांत आधी पुढे आल्या.
भूमिगत बंधारा
नदीपात्रात भूमिगत बंधारा बांधण्यासाठी प्रवाहाच्या आडव्या रेषेत 55 मीटर लांबीचा चर खोदण्यात आला. त्याची रुंदी सात फूट व खोली 10 फूट ठेवण्यात आली. हा चर चिकणमातीने भरून घेण्यासाठी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या शेतातून माती आणण्यात आली. काळ्या मातीचे थरावर थर रचत भूपृष्ठापर्यंत काम पूर्ण करण्यात आले. पाण्याचा निचरा थांबवणारी अभेद्य भिंत तयार झाली. काळ्या मातीमध्ये काडीकचरा, दगडगोटे जाणार नाहीत याची काळजी घेण्यात आली.
गॅबियन बंधारा
भूमिगत बंधाऱ्यापाठोपाठ गॅबियन बंधाऱ्याची रचनाही वैशिष्ट्यपूर्ण करण्यात आली. बंधाऱ्याचा पाया 9 फूट, उंची 4 फूट व माथा 6 फूट ठेवण्यात आला. बंधारा बांधताना भूपृष्ठावर लोखंडी जाळी अंथरण्यात आली. त्यावर जाड पॉलिथिन पेपर अंथरण्यात आला. नदीपात्राच्या वरच्या व खालच्या बाजूने तीन फूट रुंदीचे दगडी पिचिंग सांधेमोड करून करण्यात आले. पॉलिथिन शीट, मातीचा भराव यांच्या कामांनंतर खालील व वरील बाजूच्या दगडांच्या थरांचा एकजीव माथा तयार झाला. बंधाऱ्याच्या लोखंडी जाळीला फक्त 70 हजार रुपये लागले.
नदीपात्राचे खोलीकरण व रुंदीकरण
नदीपात्रातील झाडेझुडपे तोडून पोकलॅन यंत्राद्वारा काम सुरू झाले. नदीपात्रातील माती, रेती उचलून काठावर टाकण्यात आली. उत्तरेकडील भराव "लेव्हल' करून शेतकऱ्यांसाठी रस्ता तयार करून देण्यात आला. त्यासाठी 40 हजार रुपये खर्च आला. बंधाऱ्याच्या वर 1700 मीटरपर्यंत हे काम करण्यात आले. नदीपात्र 50 मीटर रुंद करण्यात आले व खोली दोन मीटर ठेवण्यात आली.
पैशाची जमवाजमव
भूमिगत व गॅबियन बंधारा, नदीपात्र खोलीकरण व रुंदीकरणासाठी 11.50 लाख रुपये खर्च आला. खर्चात काटकसर व श्रमदान केल्याने एवढी कमी रक्कम लागली. शासकीय दराने हिशेब केला तर हा आकडा दुप्पट ते तिप्पट होऊ शकतो. एकूण खर्चापैकी गावकऱ्यांनी 5.50 लाख रुपये वर्गणी जमा केली. आर्ट ऑफ लिव्हिंग ट्रस्टने चार लाख रुपये दिले. ग्रामपंचायतीने व पंचायत समितीने प्रत्येकी एक लाख रुपये दिले. नदीपात्र खोलीकरण व रुंदीकरणास सर्वांत जास्त म्हणजे 8.22 लाख रुपये खर्च झाला.
पाणीच पाणी
सर्व कामांचा फायदा शिरूर अनंतपाळ गावासह आजूबाजूच्या दगडवाडी, आनंदवाडी, लक्कडजवळगा, तुरुकवाडी, भिंगोली या गावांनाही झाला. नदीपात्रात तीन कि.मी. पर्यंत पाणीसाठा झाला. यामुळे तीन-चार कि.मी. परिसरातील विहिरी व बोअरचे पाणी वाढले आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बोअरचे पाणी तर जमिनीपासून पाच फुटांवर आले आहे. या बोअरला पूर्वी खारे पाणी यायचे. आता मात्र गोड पाणी येत आहे. परिसरातील गावचे लोक हे काम पाहायला येत असून, जल साक्षरतेचा धडा घेऊन जात आहेत. पंडित हत्तरगे, श्रीकिशन बंग, गावातील सिव्हिल इंजिनिअर उमाकांत सलगरे, पंचायत समितीचे उपअभियंता श्री. कानडे, गटविकास अधिकारी नितीन दाताळ यांचाही या उपक्रमात महत्त्वाचा वाटा राहिला. डॉ. टी. एस. मोटे, रमेश चिल्ले(श्री. मोटे लातूर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, तर चिल्ले निलंगा येथे कृषी पर्यवेक्षक आहेत.)
संपर्क : अनंत आचवले - ९४२३५५०६९७
माहिती संदर्भ : अॅग्रोवन