অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

‘जलयुक्त’मुळे धुळवडच्या खडकाळ डोंगरांवर बागायती शेती

‘जलयुक्त’मुळे धुळवडच्या खडकाळ डोंगरांवर बागायती शेती

सिन्नर तालुक्यातील धुळवड गावात जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत गावनाल्यावर साखळी बंधारे बांधल्याने सिंचनासाठी शाश्वत पाणीसाठा निर्माण झाला आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे इथल्या शेतकऱ्यांनी खडकाळ डोंगरावर कष्टाने जिरायतीचे रुपांतर बागायती शेतीत केले आहे.

सिन्नरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेले हे गाव डोंगरावर वसलेले आहे. अवघ्या काही इंचाच्या मातीच्या थरानंतर इथे खडक लागतो. पाऊस चांगला होऊनही पाणी डोंगरावरून वाहून जात असल्याने पावसाळ्यानंतर टंचाई जाणवत असे. अशा परिस्थितीत केवळ खरीप हंगामात भात किंवा बाजरीचे पीक घेतले जात असे. उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठीदेखील गावाला टँकरवर अवलंबून रहावे लागे. एकात्मिक पाटणलोट विकास कार्यक्रमांतर्गत बंधारा बांधल्याने काही भागात पाण्याची उपलब्धता झाली. मात्र जलयुक्त शिवार योजना राबविण्यास सुरवात झाल्यानंतर गावाची पाणीसमस्या दूर झाली.

आमदार राजाभाऊ वाजे यांनी गावात ही योजना सुरू करण्यासाठी विशेष सहकार्य केले. उपविभागीय अधिकारी महेश पाटील आणि तालुकास्तरीय समितीच्या अधिकाऱ्यांनीदेखील वेळोवेळी मार्गदर्शन केले. सरपंच इंदुबाई आव्हाड आणि गणपत सांगळे यांनी योजनेअंतर्गत कामे करण्यासाठी पुढाकार घेतला. गावात शिवारफेरीद्वारे कामांची निश्चिती करण्यात आली आणि गावाचे ‘वॉटर बजेट’ तयार करण्यात आले. लोकसहभागामुळे कामांना चांगली गती मिळाली. नाल्यातील गाळ काढणे, सिमेंट बंधाऱ्याला क्युरींग करणे आदी विविध कामात ग्रामस्थांनी उत्स्फुर्तपणे सहकार्य केले.

आराखड्यानुसार विविध यंत्रणांकडून जलसंवर्धनाची कामे पावसाळ्यापूर्वी करण्यात आल्याने गाव जलसमृद्ध झाले आहे. गावात मोठ्या प्रमाणात टोमॅटो, मेथी, मिरची, कांदा आदी भाजीपाला आणि डाळींबाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. कृषी पर्यवेक्षक आर.पी.बिन्नर यांनी जलयुक्तच्या कामांना गती देण्याबरोबरच शेतकऱ्यांना पीक पद्धतीबाबत चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही वाढ झाली असून शेतमजुरांचे स्थलांतराचे प्रमाण कमी झाले आहे.

नोव्हेंबर महिना सुरू असताना नाल्यातील सर्व सिमेंट बंधाऱ्यात पाणी भरलेले होते. गावात ‘मागेल त्याला शेततळे’ योजनेअंतर्गत सहा शेततळे तयार करण्यात आले असून काही शेतकऱ्यांनी पाण्याची उपलब्धता असल्याने खासगी शेततळे तयार केले आहे. त्यामुळे या गावातून दररोज टोमॅटो व इतर भाजीपाला सिन्नरच्या बाजारात जात आहे. शेतकऱ्यांनी जमीन कसताना केलेल्या कष्टाचा लाभ त्यांना जलयुक्तमुळे मिळाला आहे.

कृषि विभागामार्फत एक कोटी 18 लाखाची 12 कामे करण्यात आली आहे. त्यात नाल्यावर सिमेंटचे सहा साखळी बंधारे बांधण्यात आले आहेत. जिल्हा परिषद ल.पा.उपविभाग दोन, जलसंधारण विभाग एक आणि पंचायत समिती कृषी विभागाने आठ अशी एकूण 1 कोटी 51 लाखाची 23 कामे पुर्ण करण्यात आली आहेत. तर लोकसहभागातून चार ठिकाणचा एकूण सुमारे तीस हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. त्यासाठी शासनातर्फे डिझेलसाठी तीन लाख 22 हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले.

वॉटर बजेटनुसार गावातील माणसे आणि जनावरांच्या पिण्यासाठी एकूण 32.74 टीसीएम पाण्याची गरज आहे. तर पिकासाठी 632.8 टीसीएम पाण्याची गरज आहे. गावात केलेल्या जलसंधारणांच्या कामामुळे एकूण 788 टीसीएम पाणी अडविण्यात आले आहे. एकूण गरजेपेक्षा हे पाणी जास्त असल्याने गावातील शेतकरी बागायतीकडे वळले आहेत.

इंदुबाई आव्हाड, सरपंच-जलयुक्त शिवारमुळे शिवारातील चित्रच बदलले आहे. खडकाळ डोंगरावर जिथे गवत दिसायचे तिथे बागायती शेती फुलली आहे. गावाचे अर्थकारणच जलयुक्तच्या कामांमुळे बदलले आहे.

-डॉ.किरण मोघे

माहिती स्रोत: महान्युज

अंतिम सुधारित : 6/5/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate